प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १० वें.
बुद्धापासून चंद्रगुप्तापर्यंतच्या काळची सामाजिक परिस्थिति.
बौद्धकालीन शहरें.- बौद्धकालीन शहरांच्या बाह्य देखाव्याचें वर्णन केलेलें कोठेंहि सांपडूं नये ही खेदाची गोष्ट होय. उंच उंच भिंती, मजबूत तट, पहारेवाल्यांचे बुरूज, मोठमोठ्या वेशी, व या सर्वांच्या भोंवती एक खंदक, कित्येक ठिकाणीं एक पाण्याचा व एक चिखलाचा असे दोन खंदक, असलीं वर्णनें सांपडतात. इसवी सनापूर्वींच्या दुस-या किंवा तिस-या शतकांतील सांची येथील स्तूपावरील एका भागांत अशा त-हेच्या शहराच्या वेशींचीं चित्रें आहेत; व याच्या पूर्वींच्या काळांतहि तटबंदी वगैरे अशाच त-हेची असावी. या तटांची लांबी, रुंदी किंवा घेर कोठेंहि सांगितलेला नाहीं. हीं शहरें म्हणजे लहान लहान दुर्गच होत असें म्हणण्यास हरकत नाहीं. कारण, येथील राजा किंवा अधिकारी दुपारच्या वेळेस आरामाकरितां शहराबाहेर जात असे असें म्हटलें आहे.
घ रें.- तसेंच घरांच्या भोंवतीं मोकळी जागा बिलकुल नसे असें 'रस्त्यावरच्या गोष्टी घरांच्या खिडक्यांतून दिसत' असें म्हणतात त्यावरून दिसतें. घरांची वर्णनें देणारे लेख अनेक सांपडतात. त्यांवरून घरें बांधण्याच्या कामीं कोणत्या जिनसांचा उपयोग केला जात असें हें समजण्यास मार्ग आहे. शिवाय घरांच्या दर्शनी भागांची कल्पना आणून देणारीं चित्रेंहि आहेत. या बाबतींत महौषधानें आपल्या प्रसिद्ध बोगद्यांत बांधलेल्या जमिनीखालच्या राजवाड्याचें जें वर्णन आहे त्यावरून बरीच माहिती मिळण्यासारखी आहे [जातककथा ६.४३०]. घरांचीं जीं चित्रें सांपडतात, त्यांवरून त्यांचे खांब लांकडी असावे किंवा दगड लांकडासारखे कांतून तयार केलेले असावे याबद्दल अनुमान काढण्यास जागा नाहीं. परंतु ते दगडी कांतकामाचे असावे असें वाटतें. एका डोंगरी किल्ल्याभोंवतीं दगडी भिंत असल्याबद्दल ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकांतील उल्लेख सांपडतो. परंतु या कालाच्या संबंधानें जीं पुस्तकें लिहिलीं आहेत, त्यांत खांब किंवा जिने यांखेरीज इतरत्र दगडाचा उपयोग केला असल्याबद्दल उल्लेख नाहीं. अगदीं आरंभीं तरी घरांच्या वरचें बांधकाम विटांचे किंवा लांकडाचें असलें पाहिजे. लांकडी किंवा विटांचें बांधकाम असलें तरी त्याला आंतूनबाहेरून चुन्याचा गिलावा करीत व त्यावर उत्तम रंगांत छापाचीं चित्रें काढीत. विनयामध्यें हा गिलावा कसा करावा वगैरेबद्दल विस्तृत सूचना केलेल्या आहेत [विनय टेक्स्ट्स. ३. १७०-७२].
सत्तभूमक पासाद म्हणून वर्णिलेल्या इमारतींबद्दल जागोजाग लिहिलेलें आढळतें. परंतु यांतली एकहि इमारत आजला हिंदुस्थानांत शिल्लक नाहीं. नाहीं म्हणावयास सिलोनमध्यें पुलस्तिपुरामध्यें एक अशा त-हेची अर्वाचीन इमारत सांपडते. खाल्डिया देशाच्या इमारतींचा विशेष म्हणून प्रसि असलेल्या झिग्गरट नांवाच्या सात मजली इमारतींशीं हिचा संबंध असावा असें अनुमान यावरून र्हीस डेव्हिड्स काढतात. गंगेच्या खो-यांतील लोक व मेसापोटेमिया येथील लोक यांच्यामध्यें दळणवळण होतें ही गोष्ट दुस-या मार्गानें सिद्ध झालेली आहे, तेव्हां हिंदी लोकांनीं या इमारतीची कल्पना दुस-याची उचलली असावी असें दिसतें.
जु गा र व स र का र.- राजवाड्यामध्यें एका मोठ्या दिवाणखान्यांत द्यूतकारांचा सार्वजनिक अड्डाः असे हा अड्डा राजवाड्याच्या मोठ्या बसण्याउठण्याच्या दिवाणखान्याच्या एका भागांत असेल किंवा निराळा असेल. आपस्तम्बामध्यें [२.२५] अशा त-हेच्या जागेची सोय करणें हें राजाचें कर्तव्य होय असें म्हटलें असून पुढील एका ग्रंथांत या द्युतकारांच्या मिळकतीपैकीं कांहीं भाग राजाच्या खजिन्यांत जाई असें लिहिलें आहे.
तु र्की स्ना नां चें प्रा ची न भा र तां त अ स्ति त्व.- ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा असा इमारतींचा दुसरा नमुना म्हणजे बाष्पस्नानाकरितां बांधलेल्या इतर इमारतींचा होय. यांचीं वर्णनें विनयांत सांपडतात (३.१०५-११० व २९७) या इमारती उंच जोत्यांवर बांधलेल्या असत. या जोत्यांचा दर्शनी भाग विटांचा व दगडांचा असे. या इमारतींत जाण्या करितां दगडी जिने असत, व यांत एक लहानशी खोली व स्नानाकरितां एक हौद असे. उष्णवायुस्नानाच्या खोलीमध्यें मध्यभागीं एक आगटी पेटविलेली असून तिच्या सभोंवार बसण्याची व्यवस्था केलेली असे. घाम लवकर यावा म्हणून हें स्नान करतांना स्नान करणा-या इसमाच्या अंगावर कढत पाणी ओतीत. त्याच्या तोंडाला एक प्रकारची सुवासिक चुन्याची फकी लावलेली असे. हें स्नान आटपल्यानंतर संवाहनविधि व्हावयाचा व नंतर हौदांत स्नान करावयाचें अशी रीत असे. गंगा नदीच्या खो-यांतून इतक्या पुरातन काळीं 'टर्किश बाथूस' सारखीच हमामखान्यांची व्यवस्था आढळून येते हें बरेंच चमत्कारिक दिसते. तुर्क लोकांनीं ही पद्धत हिंदूंच्यापासून तर उचलली नसेलना असाहि प्रश्न उपस्थित करण्यांत आला आहे. दीघनिकाय नांवाच्या ग्रंथांत अशाच उघड्यावर बांधलेल्या हौदांचें वर्णन आहे. याला आंत उतरण्यासाठीं पाय-या केलेल्या असत. यांचा दर्शनी भाग दगडाचा असे, व यांजवर कांतकाम आणि नक्षी वगैरे कोरलेली असे. अशा या स्नानाच्या जागांपैकीं कित्येक अनुराधपूर येथें अद्यापहि शाबूत आहेत.
या प्राचीन शहरांतून मोठीं घरें अशीं फारशीं नव्हतीं. बहुतेक इमारती एक मजली व गवती छपराच्या असत.
न ग र र च ना.- हल्लीं जें कांहीं वाङ्मय उपलब्ध आहे त्यावरून पाहतां शहराच्या आरोग्याकडे विशेष लक्ष पुरविलेलें दिसत नाहीं. या बाबतींतल्या फारच थोड्या सोयी केलेल्या दिसतात. नहाणी घरें वगैरे ठिकाणच्या मो-यांचे नळ व किल्ल्यांतील पावसाचें पाणी बाहेर लावून देण्याकरितां केलेलीं गटारें यापलीकडे असल्या गोष्टींचा उल्लेख सांपडत नाहीं. किल्ल्यांतील यावर सांगितलेल्या गटारांतून लांडगे व कोल्हे आंत किल्ल्यांत येत व दरवाजे बंद असतांना माणसेंहि यांचा उपयोग किल्ल्याच्या बाहेर जाण्याकरितां करीत. एवढी हीं गटारें मोठीं होतीं.
मा र्ति का च्या भि न्न प द्ध ती.- मृतांची व्यवस्था लावण्याच्या बाबतींत सुद्धां कित्येक गोष्टी ब-याच चमत्कारिक असत. पैसेवाला म्हणून, सरकारी कामगार म्हणून, किंवा मोठ्या कुळांत जन्मलेला म्हणून असा जो जो कोणी मृत झालेला असेल, त्याचें प्रेत दहन करून टाकीत, व त्याच्या रक्षेवर एक स्तूप बांधीत. परंतु सामान्य लोकांचीं प्रेतें सीवथिका किंवा आमक सुसान नांवाच्या ठिकाणीं टाकून दिलीं जात. त्या ठिकाणीं पशुपक्षी तरी त्यांची वाट लावीत, अगर तीं कुजून जात.
कित्येक वेळां अशा त-हेच्या श्मशानांत स्तूप उभारीत. तथापि, सामान्यतः हे स्तंभ खासगी जागेंत असत. मृत मनुष्य तशाच योग्यतेचा असला तर त्याच्या नांवाचा स्तंभ एखाद्या चौकांत असे. हे स्तंभ बौद्ध काळांतले होत असें आपण सामान्यतः समजतों, परंतु वस्तुतः ते बौद्ध काळाच्याहि पूर्वींचे आहेत. आर्य लोक हे स्तंभ बहुधा वाटोळे बांधीत. आतांपर्यंत बांधलेले सर्व स्तूप - जे जे आजपर्यंत आढळून आले आहेत ते सर्व - तत्त्वज्ञान वगैरे बाबतींत ज्यांनीं विचारक्रांति घडवून आणिली अशाच लोकांच्या स्मरणार्थ बांधलेले आहेत, ही गोष्ट ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाची म्हणून लक्षांत ठेवण्यासारखी आहे.
जेतवन दागब या स्तूपाचा काल ख्रिस्ती शकाचें तिसरें शतक हा होय. परंतु, येथें जें एक तळें आहे तें हिंदुस्थानांतलें सर्वांत जुनें असावें. कारण, हें अशोकाच्याहि पूर्वीं बांधलेलें आहे.