प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १० वें.
बुद्धापासून चंद्रगुप्तापर्यंतच्या काळची सामाजिक परिस्थिति.
भाषा.- राजसत्तेच्या केंद्राबरोबर भाषेच्या प्रभुत्वाचा केंद्रहि साहजिकच बदलत गेला. प्रथमतः हा केंद्र पंजाबांत होता. तेथून पुढें तो कोसलांत, व कोसलांतून मगधांत आला, आणि शेवटीं ज्या वेळीं संस्कृत ही सर्वसाधारण लेखनाची भाषा झाली, त्या वेळेस अत्यंत महत्त्वाची अशी देश्य भाषा पश्चिम हिंदुस्थानांत प्रचारांत होती.
वैदिक भाषेवर उच्चार व शब्दसमूह या बाबतींत द्रविड भाषांचा बराच परिणाम झाला होता. आर्यन् लोकांच्या प्रचारांतील पाली, प्राकृत किंवा संस्कृत या सर्व भाषांवर द्रविड भाषांचा थोडाबहुत परिणाम झालेला आहे. आणि हा परिणाम अनार्य लोक व आर्य लोक यांच्यांत जो वर्णसंकर झाला त्याच्या इतका तरी खास आहे. यावरून ब-याच गोष्टींचा बोध होईल.
गोदावरीच्या दक्षिणेस याच्या उलट प्रकार आढळतो; म्हणजे द्रविड भाषांवर आर्य भाषांचा परिणाम झालेला दिसतो. यावरून या भागांत आर्य लोकांची वस्ती उशिरां झाली व येथें आर्य फारसे आले नाहींत असें दिसतें. या भागांत ब्राह्मणांचें वर्चस्व प्रस्थापित होण्यास फार काळ लागला. मोठमोठे धनिक लोक, शेटसावकार व त्या काळचा सुशिक्षित समाज बुद्धानुयायी व जैनसंप्रदायी होता, व नंतर तो हिंदु बनला. कांची व तंजावर येथं पांचव्या किंवा सहाव्या शतकापर्यंतचीं पाली पुस्तकें सांपडतात; आणि बौद्ध संप्रदायाचा जसजसा -हास होत गेला तसतसें जैन संप्रदायानें आपलें डोकें वर काढलेलें आढळतें. उत्तर हिंदुस्थानांत ब्राह्मणधर्माचा उदय होऊन तेथें त्याचें वर्चस्व नीटपणें स्थापित झाल्यावर ब्राह्मणधर्माची दक्षिणेंत प्रस्थापना झाली. एकदां या स्थितीला येऊन पोंचल्यानंतर ब्राह्मणधर्माची विलक्षण भरभराट झाली व कुमारिलभट्टापासून तों शंकराचार्यापर्यंत (इ. स. ७००-८००) च्या काळांत तर त्या भरभराटीचा कळस झाला.