प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १० वें.
बुद्धापासून चंद्रगुप्तापर्यंतच्या काळची सामाजिक परिस्थिति.

महाराष्ट्राचें बुद्धकालीं स्वरूप.- दक्षिणापथ हें नांव अत्यंत प्राचीन बौद्ध ग्रंथांत (सुत्तनिपात ९७६) एकाच ठिकाणीं आढळतें व तेथें तें सबंध दक्षिणप्रांताला लावलेलें असावें असें दिसत नाहीं. गोदवरीच्या तीरावर जी एक वसाहत वसलेली होती तिला अनुलक्षून या ठिकाणीं या पदाचा उपयोग केलेला आहे. चार निकायांपैकीं कोणत्याहि निकायांत याचा उल्लेख नाहीं. पुढें विनयामध्यें याचा उल्लेख सांपडतो त्याहि ठिकाणीं वरील प्रांताला अनुलक्षून तो उल्लेख आहे; व तो अगदीं पुसट रीतीनें आहे.

दक्षिणापथ याचा अर्थ दक्षिणेकडील रस्ता असा असून हें नांव एका वसलेल्या प्रदेशास लावण्यांत यावें हें चमत्कारिक दिसतें. ॠग्वेदाच्या एका सूक्तांत एक हद्दपार झालेला मनुष्य दक्षिणेच्या मार्गानें जात आहे असें वर्णन आहे (१०. ६१,८). दक्षिणेकडचें बौद्ध ग्रंथांत आढळणारें सर्वांत दूरचें गांव म्हणजे पतिथ्यान (प्रतिष्ठान, पैठण) हें होय. आणि दक्षिणेच्या बाजूस पराकाष्ठा म्हणजे २० अंशांवर गोदावरीच्या कांठीं असलेल्या एका मठापर्यंत यांचीं मजल गेलेली होती.

दक्षिणेंत झालेल्या या प्रसाराखेरीज समुद्रप्रवासाचेंहि वर्णन निकायांमधून आढळतें. कलिंगारण्य आणि समुद्रकिना-यावरील वस्ती यांचाहि उल्लेख आहे. कलिंगांची राजधानी दन्तपूर होती असेंहि सांगितलें आहे. विनयामध्यें बहुतकरून भरुकच्छाला अनुलक्षून उल्लेख असावा असें वाटतें (३.३८). तसेंच उदानामध्यें सुपाकराचा (सोपाराचा) उल्लेख असावा असें वाटतें (उदान- १.१०). ह्या सर्व गोष्टी एकत्र केल्या तर तत्कालीन लोकांचें भूगोलविषयक ज्ञान बरेंच वाढलेलें होतें असें दिसून येते. परंतु रामायणांत ज्याचा संबंध अतिशय आलेला आहे अशा दक्षिणेकडच्या भागाचा व सिलोनचा उल्लेखहि यांत नाहीं ही गोष्ट ध्यानांत ठेवण्यासारखी आहे.

ह्या भूगोलविषयक परिस्थितीच्या ज्ञानाचा उपयोग वैदिक वाङ्‌मयाचा शेवटचा भाग व संस्कृत वाङ्‌मयाचा आरंभींचा भाग यांच्या इतिहासाच्या दृष्टीनें बराच महत्त्वाचा आहे. 'गुप्त' कालामध्यें ब्राह्मण वाङ्‌मयाची सररहा पुनर्रचना होत होती अशाबद्दल डॉ. भांडारकरांचीं जीं कांहीं मतें आहेत त्यांनां यामुळें बरीच बळकटी येते. आपस्तंब व हिरण्यकेशी यांचे ग्रंथ गोदावरीच्या खालीं दक्षिणेकडे लिहिले गेले हें बुहूलरचें म्हणणें खरें असेल तर, हे ग्रंथ प्रस्तुत ग्रंथांपेक्षां अर्वाचीन आहेत असें म्हटलें पाहिजे.