प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १० वें.
बुद्धापासून चंद्रगुप्तापर्यंतच्या काळची सामाजिक परिस्थिति.
वैचारिक चळवळ.- पूर्वीच्या काळांत निरनिराळ्या पंथांच्या अनुयायांमध्यें निरनिराळ्या प्रकारच्या वाङ्मयपद्धती असल्या पाहिजेत. या प्राचीन संप्रदायापैकीं कोणत्याहि संप्रदायानें दुस-या संप्रदायाचें वाङ्मय जतन करून ठेविलें आहे असें दिसत नाहीं. तथापि प्रत्येक संप्रदायाला दुस-या संप्रदायाची माहिती होती व दुस-या संप्रदायांच्या मतांवर प्रत्येक संप्रदाय विचार करीत असे. याप्रमाणें साधारणतः या लोकांनां निदान दोन प्रकारच्या वाङ्मयांची माहिती असे.
वसाहतीच्या शेजारीं अरण्यें असत, त्यांमध्यें निरनिराळ्या संप्रदायांचे शिष्य रहात. त्यांची रहाणी एकंदरीत बैराग्यासारखी असे. आपल्या संप्रदायांतील ध्यान, यज्ञ, हठयोग यांसारख्या कांहीं तरी विशिष्ट गोष्टींनीं हे शिष्य आपआपल्या संप्रदायाची परंपरा चालवीत; व अध्ययन आणि अध्यापन यांच्या द्वारानें आपल्या संप्रदायाचीं तत्त्वें ते लोकांनां शिकवीत. स्वतःच्या निर्वाहाकरितां फलमूळें जमविण्यामध्यें किंवा शेजारच्या गांवीं भिक्षेसाठीं जाण्यामध्यें यांचा बराच काळ जात असे.