प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १० वें.
बुद्धापासून चंद्रगुप्तापर्यंतच्या काळची सामाजिक परिस्थिति.

संस्कृतीच्या व लोकांच्या प्रसाराचा मार्ग.- याचा विचार करण्यापूर्वीं एका समजुतीसंबंधानें विचार केला पाहिजे. कारण ही समजूत सर्वसाधारण असून वस्तुस्थितीशीं तिचा मेळ बसत नाहीं. लोकांच्या प्रसाराचा मार्ग यमुना व गंगा यांच्या खो-यांमधून होता अशी साधारण समजूत आहे. पण वस्तुस्थिति तशी असावी असें दिसत नाहीं. यापलीकडे दोन शाखा - एक सिंधुनदाच्या खालून, कच्छच्या आखाताला वळसा घालून अवंतीपर्यंत पोंचलेली व दुसरी काश्मीरपासून पर्वतांच्या पायथ्यापायथ्यानें कोसलाच्या मार्गानें शाक्य देशापर्यंत व तेथून ति-हूतमधून मगध व अंग येथपर्यंत गेलेली - अशा मानिल्या पाहिजेत. आजपर्यंत उपलब्ध असलेल्या पुराव्याहून बराचसा अधिक पुरावा, हिंदुस्थानांत निरनिराळ्या राष्ट्रजातींचें जें परिभ्रमाण झालें त्या बाबतींत, उपलब्ध होण्यासारखा आहे. उदाहरणार्थ, ग्रियरसननें एक महत्त्वाची गोष्ट लोकांच्या नजरेस आणिली आहे. ती ही कीं, राजस्थानांत बोलल्या जाणा-या ज्या भाषा आहेत त्या भाषा, व हिमालयाच्या बाजूनें नेपाळांतच नव्हे तर पश्चिमेच्या बाजूस चंबापर्यंत बोलल्या जाणा-या ज्या भाषा यांत बरेंच साम्य आहे. यावरून असें म्हणतां येईल कीं, या दोन्ही लोकांचे पूर्वज एके काळी एकत्र नांदत असून तेथून त्यांनीं अनुक्रमें पूर्वेस व दक्षिणेस परिभ्रमाण करण्यास सुरुवात केली असावी. दोघेहि पंजाबच्या उत्तरभागांतून निघाले आणि त्यांपैकीं एकानेंहि गंगेच्या मार्गाचा अवलंब केला नाहीं.