प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १० वें.
बुद्धापासून चंद्रगुप्तापर्यंतच्या काळची सामाजिक परिस्थिति.
हिंदुस्थानचे राजकीय विभाग.- बुद्धाच्या धम्माच्या उदयाच्या वेळीं अगर त्याच्या कांहींसें अगोदर हिंदुस्थानचे राजकीय विभाग कोणते होते याची कल्पना तत्कालीन सोळा मोठ्या देशांची जी एक यादी प्रसिद्ध आहे तिजवरून येईल. या देशांचीं नांवें भूगोलविषयक परिस्थित्यनुरूप बसविलेलीं नसून त्या त्या ठिकाणच्या जातीच्या नांवांवर बसविलीं आहेत, हें लक्षांत ठेवण्यासारखें आहे. यावरून ही यादी ज्यांनीं तयार केली त्यांच्या काळांत जातींचे देशनामकारक महत्त्व अजीबात पुसून गेलें नव्हतें; इतकेंच नव्हे, तर देशाला नांव तो प्रदेश व्यापणा-या मुख्य राष्ट्रजातीवरून पडणें ही क्रिया कार्य करीत होती. ही याद पुढें दिल्याप्रमाणें आहे.
(१) अंग, (२) मगध, (३) कोसी, (४) कोसल, (५) वज्जि, (६) मल्ल, (७) चेति, (८) वंश, (९) कुरु, (१०) पांचाल, (११) मत्स्य, (१२) शूरसेन, (१३) अस्सक, (१४) अवंती, (१५) गांधार व (१६) कांबोज.
अंग.- अंग राजे मगधाच्या पूर्वेस रहात. यांची राजधानी चंदा ही असून ती अर्वाचीन भागलपूरच्या जवळ आहे. या देशाच्या चतुःसीमांविषयीं माहिती मिळत नाहीं. बुद्धाच्या वेळेस हें राज्य मगधाच्या मांडलिकत्वाखालीं होतें, व पुढें तें स्वतंत्र झाल्याचें कोठें आढळून येत नाहीं. तथापि पूर्वीं एके काळीं हें स्वतंत्र होतें, व याच्याशेजारच्या राज्यांशीं लढायाहि होत असत अशाबद्दल आख्यायिका आहेत. बुद्धाच्या काळीं अंगराज हा केवळ एक श्रीमंत सरदार होता व एका ब्राह्मणाला त्यानें नेमणूक करून दिली होती, या पलीकडे त्याची कांहीं माहिती मिळत नाहीं.
मगध.- मगध राजे ज्या प्रदेशावर राज्य करीत होते तो प्रदेश म्हणजे सध्यांचा बहार प्रांत होय, ही गोष्ट प्रसिद्धच आहे. याच्या चतुःसिमा बहुतकरून उत्तरेस गंदा नदी, पूर्वेस चंपा नदी, दक्षिणेस विंध्य पर्वत व पश्चिमेस शोण नद या असाव्यात. बुद्धकालांत या मगध राज्यांत अंग राज्यांतल्या गांवांसकट ८०,००० गांवें होतीं, व याचा परीघ सुमारें २,३०० मैल होता.
कासी.- हे लोक म्हणजे अर्थातच काशी नगरीभोवतालच्या प्रदेशांत वस्ती करून राहिलेले लोक होत. बुद्धकालीं हें राज्य राजकीय दृष्ट्या फारच खालावलेलें होतें; व त्याचा कोसलाच्या राज्यांत समावेश होत असे; हें राज्य या यादींत दिलें आहे ही गोष्ट ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाची आहे. कारण यावरून एका काळी या राज्याला स्वतंत्र अस्तित्व होतें ही गोष्ट लोकांच्या मनांतून गेली नव्हती एवढें स्पष्ट दिसतें. पुढें जातककथांत याचा उल्लेख आहे, व तेथें याचा परीघ २,००० मैलांहून अधिक होता असें म्हटलें आहे. यावरूनहि हीच गोष्ट सिद्ध होते. परंतु या राज्याचें स्वातंत्र्य एकदां गेलें तें गेलेंच. याच्या चतुःसीमा माहीत नाहींत.
कोसल.- हे लोक ज्या प्रदेशांत राज्य करीत होते त्याची राजधानी श्रावस्ती ही होती. हाच प्रदेश अलीकडे नेपाळ या नांवानें प्रसिद्ध आहे. ही श्रावस्ती नगरी गोरखपूरच्या वायव्ये ७० मैलांवर होती. या राज्यामध्यें बनारस व साकेत यांचा समावेश होत असे. बहुधा गंगा नदी ही त्याची दक्षिण मर्यादा, मंडक ही पूर्व मर्यादा व हिमालय पर्वतांतील डोंगर ही उत्तर मर्यादा असावी. शाक्य लोकांनीं यांचें स्वातंत्र्य ख्रि. पू. ७ व्या शतकांतच कबूल केलें होतें.
कोसल राज्याची भरभराट व पुढें लगेच झालेली कौसल व मगध यांच्यामधील भांडणें, हा बुद्धकालीन राजकारणाचा एक प्रधान भाग होता. ह्या कंटक पहाडी लोकांनी पर्वतांच्या रांगा व गंगा नदी यांच्या मधल्या प्रदेशांतले बहुतेक लोक आपल्या ताब्यांत आणिलेले होते. परंतु पूर्वेच्या बाजूस मात्र स्वतंत्र असे लोक रहात असल्यानें त्यांनां तिकडे अनिरुद्ध संचार करतां आला नाहीं. हिंदुस्थानच्या सार्वभौग सत्तेबद्दल कोसल व मगध यांच्यामध्यें जी चुरस लागली होती, तिचा लिच्छवी हें बलाढ्य कुल मगधाच्या बाजूस मिळाल्यानें बहुतांशीं निकाल लागलाच होता. वंक, दभ्भसेन, कंस वगैरे राजांच्या नेतृत्वाखाली कोसलांनीं काशी लोकांवर केलेल्या स्वा-या बुद्धकालापूर्वींच्या आहेत असा उल्लेख आहे.
वज्जि.- यांचा एक आठ कुलांचा संघ होता. या कुलांपैकीं लिच्छवी आणि विदेह हीं दोन कुलें मोठीं व महत्त्वाचीं होतीं. विदेह देशांत पुरातन काळीं राज्यसत्तात्मक शासनपद्धति प्रचलित होती असें जरी परंपरागत आख्यायिकांवरून दिसतें, तरी बुद्धकालांत हें राज्य प्रजासत्तात्मकच होतें. ह्या गोष्टीवरून बराच बोध होण्यासारखा आहे. स्वतंत्र राज्य या दृष्टीनें याचें क्षेत्रफळ वगैरे २३०० मैल असल्याचें लिहिलें आहे. याची राजधानी मिथिला ही लिच्छवींची राजधानी जी वैशाली तिजपासून वायव्येकडे सुमारें ३५ मैलांवर होती. याच ठिकाणीं, बुद्धधम्माचा उदय होण्याच्या पूर्वी प्रख्यात जनक राजा राज्य करीत होता. सध्या जनकपूर म्हणून जें गांव आहे त्यास याच जनक राजावरून नांव मिळालें असावें असें दिसतें. हा राजा क्षत्रिय असून एक विद्वान् तत्त्ववेत्ता होता.
मल्ल.- कुशिनार व पावा येथील मल्ल हीं दोन्ही स्वतंत्र कुलें होतीं. वज्जि लोकांचा जो कुलसंघ होता, त्याच्या उत्तरेस व शाक्य लोकांच्या पूर्वेस पर्वताच्या पायथ्याशीं या लोकांचा प्रदेश होता अशी माहती चिनी प्रवाशांच्या लेखांवरून मिळते. कांहीं लोक हा प्रदेश शाक्यांच्या दक्षिणेस व वज्जि लोकांच्या पूर्वेस होता असें मानितात.
चेति.- हे लोक बहुधा पूर्वीं ज्यांनां चेदि असें नांव आढळतें तेच असावेत. यांच्या दोन निरनिराळ्या वसाहती होत्या. एक सध्यां ज्याला आपण नेपाळ म्हणतों तेथेंच पहाडांत, व दुसरी कौशाम्बीजवळच पूर्वेच्या बाजूस. यांपैकीं पहिली पुरातन असावी.
वच्च.- वंश हा वच्च लोकांचा देश होय. या देशांतील ठळक शहर म्हणजे कौशाम्बी हें होय. हें बहुधा येथील राजधानीचें नांव असावें. हा देश अवंती नगरीच्या उत्तरेलगतच्या प्रदेशांत यमुनेच्या कांठाकांठानें वसलेला होता.
कुरु.- कुरु देशाची राजधानी हल्लींच्या दिल्लीजवळ असलेलें इन्द्रप्रस्थ शहर ही होय. याच्या पूर्वेस पांचाल लोकांची वस्ती होती, व दक्षिणेस मत्स्य लोकांची वस्ती होती. परपरागत आख्यायिकांवरून याचा परीघ २००० मैल असावा असें दिसतें. बुद्धकालांत या लोकांनां राजकीय दृष्ट्या फारच थोडें महत्त्व असावेंसें दिसतें. कुरु देशांतील कम्मासधम्म या ठिकाणीं महत्त्वाचीं अशीं बरींच सुत्तंतें सांगितलीं गेलीं. त्यांपैकीं महाशति पठ्ठान व महानिदान ही प्रमुख होत. रट्ठपाल हाहि एक कौरव संस्थानिक होता.
पांचाल.- पांचालाच्या दोन जातींनीं कुरु देशाच्या पूर्वेस पर्वतराजि आणि यमुनानदी यांच्यामधला प्रदेश व्यापिलेला होता. कापिल आणि कनोज या त्यांच्या अनुक्रमें राजधान्या होत.
मत्स्य.- मत्स्य देश यमुना नदीच्या पश्चिमेस व कुरु देशाच्या दक्षिणेस वसलेला होता. यमुना नदी ही मत्स्य देश व दक्षिण पांचाल यांमधील मर्यादा होती.
शूरसेन.- या लोकांची राजधानी मधुरा (मथुरा ?) हीं होती. हें राज्य मत्स्यांच्या नैर्ॠत्येस व यमुनेच्या पश्चिमेस होतें.
अस्सक – [अश्मक ?].- बौद्ध कालांत अस्सक ह्या लोकांची गोदावरीच्या कांठीं एक वसाहत होती. यांची राजधानी पोतन किंवा पोटली ही होय. मगध राज्याबरोबर जसा अंगांचा उल्लेख केला जातो तसाच अवंतीबरोबर ह्या अस्सक लोकांचा उल्लेख आढळतो. या यादीमध्यें ह्या देशाला शूरसेन व अवंती या देशांमध्यें जें स्थान दिलें आहे, त्यावरून ही यादी तयार केली गेली त्या वेळीं हा प्रांत अवंतीच्या वायव्येसच असावासें वाटतें. हें विधान ग्राह्य मानिलें तर गोदावरीकांठची वसाहत मागाहून झाली असली पाहिजे; आणि पोतन किंवा पोटली या गांवाचा उल्लेख येथें नाहीं यावरून या म्हणण्यास बळकटी येते. या लोकांच्या नांवाबद्दलहि बराच संशय आहे. संस्कृत ग्रंथकार अश्मक व अश्वक या दोघांचाहि उल्लेख करतात. या दोन्ही शब्दांचें स्थानिक भाषेमध्यें आणि पाली भाषेमध्यें अस्सक असें रूपांतर होऊं शकतें. तेव्हां एक तर या लोकांच्या दोन जाती होत्या असें मानिलें पाहिजे. अगर या शब्दाला संस्कृत रूप देतांना चूक झाली असून अश्वक हें संस्कृत रूप बरोबर नाहीं असें म्हटलें पाहिजे.
अवंती.- अवंतीची राजधानी उज्जयिनी येथें चंडप्रद्योत नांवाचा राजा राज्य करीत होता. या देशाचा बराच भाग सुपीक आहे. सिंधु नदीच्या खो-यांतून खालीं उतरलेल्या व कच्छच्या आखातापासून पूर्वेकडे वळलेल्या आर्य लोकांनीं येथें वस्ती केली होती. इसवी सनाच्या दुस-या शतकापर्यंत तरी या प्रांताला अवंती म्हणत असत, व सातव्या किंवा आठव्या शतकापासून याला मालव म्हणूं लागले.
गांधार.- गांधार (म्हणजे आजचा कंदाहार) हा पूर्व अफगाणिस्थानचा एक भाग असून यांत बहुतकरून पंजाबच्या वायव्येकडील भागाचा समावेश होत होता. याची राजधानी तक्षशिला ही होय. बौद्ध कालांत गांधार देशाचा राजा पुक्कुसाति यानें मगध देशाचा राजा बिंबिसार याजकडे एक पत्र व वकील पाठविला होता.
काम्बोज.- हा देश वायव्येकडे अगदीं कडेला असून याची राजधानी द्वारका (?) ही होती.
राजकारणाच्या दृष्टीनें पाहूं गेल्यास ही याद जरा चमत्कारिक वाटते. शिबि, मद्द, सोवीर, उद्यान व विराट यांचीं नांवें यावयास पाहिजे होतीं तीं दिसत नाहींत. बौद्ध कालाच्या आरंभीं आरंभीं मल्ल व चेति यांनां जें कांहीं महत्त्व होतें त्याच्यापेक्षां या ठिकाणीं बरेंच वाढलेलें दिसतें. वैशाली हें मगधाच्या ताब्यांत जाण्याच्या रंगास आलेलें राज्य हींत स्वतंत्र म्हणून दिलें आहे. अंग व कासी या दोन राज्यांचा शेजारच्या राज्यांत समावेश झालेला असतांना, तीं दोन स्वतंत्र व एकाच दर्जाचीं राज्यें आहेत असें मानिलें आहे. तेव्हां या कालापूर्वींच्या स्थितीची निदर्शक अशी ही एक जुनी यादी असून ती बौद्ध परंपरेंत चालत आलेली असावी एवढें यावरून सिद्ध होतें. असें जरी असलें तरी या यादीचें महत्त्व कमी होत नसून उलट जास्तच वाढतें.
भूगोलाच्या दृष्टीनें सुद्धां या यादीचें महत्त्व बरेंच आहे. अवंतीच्या दक्षिणेस २३ अंशांपर्यंत एकाहि स्थलाचा उल्लेख हींत नाहीं; व दक्षिणेच्या बाजूस येथपर्यंत तरी या यादीनें एकदांच मजल नेलेली दिसते. दक्षिण हिंदुस्थान व सिलोन यांचा उल्लेख सुद्धां हींत नाहीं. इतकेंच नव्हे तर गंगा नदीच्या पूर्वेचा बंगालचा भाग व ओरिसा किंवा दक्षिण हेहि भाग हींतून वगळले आहेत. उत्तरेकडे हिमालय व दक्षिणेकडे विंध्य यांमधल्या प्रदेशांखेरीज दुसरीकडे ही यादी करणा-याची नजर गेलेली दिसत नाहीं. याला वर सांगितलेला एकच कायतो अपवाद आहे. तसेंच पश्चिमेस सिंधु नदीच्या पलीकडील पर्वतांची रांग व पूर्वस गंगा नदी जेथें दक्षिणेकडे वळते तो प्रदेश, यापलीकडेहि दुस-या प्रांतांकडे त्याची नजर गेलेली नाहीं.