प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १० वें.
बुद्धापासून चंद्रगुप्तापर्यंतच्या काळची सामाजिक परिस्थिति.
सिलोनमधील वसाहतीचा काळ.- या भूगोलविषयक पुराव्यावरून जिच्यावर बराच प्रकाश पडतो अशी महत्त्वाची गोष्ट म्हटली म्हणजे सिलोन येथील वसाहतीचा काल ही होय. या वसाहती निकाय लिहिले गेले त्याच्या फार काळ पूर्वीं वसविल्या गेल्या असाव्यात असें वाटत नाहीं. अशोकाच्या वेळेस या वसाहती ब-याच नांवारूपांस आल्या होत्या. यावरून निकायकाल व अशोककाल यांच्यामध्यें केव्हां तरी या वसाहती वसल्या गेल्या असें दिसतें. हा काळ बहुधा निकायकालाच्या जवळचा असावा. सिलोनमधील पहिली वसाहत बुद्धाच्या मरणाच्या वर्षीच वसली गेली असें जें सिलोनच्या हकीकतींत दिलेलें आहे तें चुकीचें असलें पाहिजे. उत्तर हिंदुस्थानांत ख्रिस्ती शकापूर्वीं सातव्या शतकांत किती वस्ती होती यांच्या माहितीवरून ब-याच गोष्टींचा उलगड होण्यासारखा आहे.