प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १० वें.
बुद्धापासून चंद्रगुप्तापर्यंतच्या काळची सामाजिक परिस्थिति.

श्रमविभाग.- बौद्धकालीन आर्थिक परिस्थितीसंबंधाची माहिती मिळवून ती संगतवार एके ठिकाणीं करण्याचा प्रयत्न कोणींच केलेला दिसत नाहीं. प्रो. झिमर, डॉ. फिक व प्रो. हॉपकिन्स या लोकांनीं वेद, जातककथा, व महापुराणें, यांजवर लिहितांना यासंबंधानें मधून मधून उल्लेख केलेले आहेत. परंतु, सामान्यतः पाहिलें तर हिंदुस्थानासंबंधाचीं पुस्तकें धर्म, तत्त्वज्ञान, भाषा, वाङ्‌मय वगैरेसंबंधींच बहुतेक असल्यानें, येथील लोकांच्या आयुष्याचा व्यावहारिक भाग बहुतेक टीकाकार व शोधक विसरले असावेत असें दिसतें.

मगध देशाचा राजा अजातशत्रु यानें, बुद्धाच्या पंथांत शिरण्यानें काय फायदा होतो तो सांगा असा आपल्या गुरूस प्रश्न विचारला आहे. बुद्धाची त्यानें एकदांच भेट घेतली व याच वेळीं त्यानें त्यास खालील प्रश्न विचारले:- 'तुमच्या पंथांत शिरण्यानें, किंवा तुमच्याप्रमाणें सर्वसंगपरित्याग करण्यानें फायदा काय ? जगांत नाना त-हेच्या धंद्यांचा अवलंब करणारे लोक आपली उपजीविका सुखानें करूं शकतात, तसा कांहीं प्रत्यक्ष फायदा तुम्हांस दाखवितां येईल काय ?' येथें राजानें निरनिराळे धंदे करणा-या लोकांची एक यादी दिलेली आहे ती बरीच सूचक असून तिजवरून, राजाच्या मतें ज्या धंद्यांपासून त्वरित फायदा होतो, असे धंदे म्हणजे खालीं दिलेले होत. (१) महात, (२) घोडेस्वार, (३) सारथी, (४) तिरंदाज, (५-१३) सैन्यापैकीं निरनिराळ्या जातींचे नऊ धंदे, (१४) गुलाम, (१५) स्वयंपाकी, (१६) न्हावी, (१७) स्नानगृहांतील सेवकजन, (१८) हलवाई, (१९) माळी, (२०) धोबी, (२१) कोष्टी, (२२) बुरूड, (२३) कुंभार, (२४) कारकून आणि (२५) फडणीस. या यादीकडे लक्ष दिलें तर यांपैकीं बहुतेक लोक राजवाड्यांत किंवा छावणींत वगैरे गुंतलेले असें आहेत. याला उत्तर देतांना शेतकरी व कर देणारे लोक यांचीहि राजाला बुद्धानें आठवण दिली आहे. या लोकांवर राजा व राजाचे आश्रित हे अवलंबून असतात. राजानें दिलेली ही यादी अपुरी आहे. दुस-या ठिकाणीं असल्या धंदेवाल्यांचे संघ सांगितलेले आहेत त्यांची संख्या अठरा म्हणून सांगितली आहे. यापैकीं चारांचीं नांवें सांपडतात, परंतु सबंध अठरा संघांची याद कोठेंच सांपडत नाहीं. या संघांत खालील लोक असावेसें वाटतें.

(१) लांकूड काम करणारे.
(२) धातूंचें काम करणारे. हे लोक लोखंडाची सर्व हत्यारें तयार करीत. नांगराचे फाळ, कु-हाडी, करवती, सु-या वगैरे जिन्नस ते बनवीत. सुया वगैरे बारीक कलाकुसरीचीं कामेंहि ते करीत.
(३) दगडांचें काम करणारे. यांमध्यें इमारतीस लागणारें दगडकाम करणारे लोक तर होतेच, पण दगडाचे पेले, पेटारे वगैरे कौशल्याचीं कामेंहि हे लोक करीत. यांचे उत्कृष्ट नमुने शाक्यस्तूपांत सांपडले आहेत.
(४) कोष्टी. हे नुसतें साध्या कपड्यांनां लागणारें कापडच विणीत असें नाहीं, तर बाहेरगावीं पाठविण्यासाठीं उत्तम त-हेची तलम मलमलहि बनवीत असत. शिवाय, उत्तम रेशमी कापड, लोंकरीचीं पांघरुणें वगैरे जिनसाहि येथें होत होत्या.
(५) चांभार लोक. हे लोकांसाठीं पादत्राणें व वहाणा तयार करीत.
(६) कुंभार. हे घरगुती कामांसाठीं लागणारीं भांडीं पेले वगैरे तयार करीत व आपला माल विकावयासाठीं घेऊन हिंडत.
(७) हस्तिदंताचें काम करणारे. हे लोक हस्तिदंताचे घरगुती उपयोगास लागणारे जिन्नस तयार तर करीतच, पण शिवाय उत्तम त-हेचें हस्तिदंताचें कांतकाम व दागिने वगैरे तयार करीत. या गोष्टी हिंदुस्थानांत अजूनहि नामांकित त-हेच्या होतात, व त्याबद्दल हिंदुस्थानची अजूनहि प्रसिद्धि आहे.
(८) रंगारी.
(९) सोनार व जवाहिरे. यांनीं केलेल्या कामांपैकीं कांहीं नमुने अद्याप आपल्या नजरेस पडतात, व त्यांवरून दागिन्यांच्या वगैरे आकारमानाची कल्पना चांगली येते.
(१०) मासे धरणारे कोळी. हे लोक आपला धंदा नदींत चालवीत. समुद्रावर यांनीं मासे धरल्याचा उल्लेख प्रो. र्‍हीस डेव्हिड्स यांस कोठेंच सांपडला नाहीं.
(११) खाटीक. यांच्या दुकानांबद्दल व हिंसागृहाबद्दल पुष्कळ उल्लेख सांपडतात.
(१२) शिकारी व फांसेपारधी. हे लोक रानांत शिकारी वगैरे करून पशू, व तेथील रानांत उत्पन्न होणारे शाकपदार्थ गाड्यांवर घालून विकावयास आणीत. ह्या लोकांनीं संघ वगैरे केला होता कीं नाहीं याची माहिती मिळत नाहीं. परंतु यांचा धंदा महत्त्वाचा होता एवढें मात्र खास. लांबच लांब अरण्यें, हस्तिदंताची वाढती मागणी वगैरे गोष्टी शिकारीच्या धंद्याला अनुकूल होत्या. राजे लोक हा शिकारीचा पेशा केवळ शोकाखातर पतकरीत, त्यांत धंद्याचा भाग मुळींच नव्हता. पण मोठमोठ्या कुळांतले लोकसुद्धां धंदा म्हणून हा पेशा पतकरीत असत व फायद्याकरितां ब्राह्मण सुद्धां हा धंदा करीत.
(१३) आचारी व मिठाईवाले लोक. हे संघ करीत असें वाटतें. पण याबद्दल प्रत्यक्ष पुरावा कोठें नाहीं.
(१४) न्हावी लोक व संवाहक लोक. हे संघ करून असत. हे सुगंधी जिनसांचा व्यापार करीत, व पागोटी बांधण्यांतहि निष्णात असत.
(१५) माळी व फुलें विकणारे.
(१६) नाखवे. हे मोठमोठ्या नद्यांतून मालाची नेआण करीत व क्वचित् समुद्रांतहि जात. पूर्वींच्या जुनाट लेखांतून समुद्रपर्यटनाचे उल्लेख थोडे सांपडतात, परंतु जातककथांसारख्या पुढच्या वाङ्‌मयांत असले उल्लेख बरेच आहेत. जुन्या ग्रंथांत सहा सहा महिनेपर्यंत नावेंतन जलपर्यटनें केल्याचे उल्लेख आहेत. या नावा हिंवाळ्यांत किना-यावर ओढून ठेवीत. तिस-या शतकांतील (ख्रिस्तपूर्व) कांहीं लेखांत, काशीहून गंगेच्या मुखापर्यंत गंगेंतून व तेथून हिंदीमहासागरांतून ब्रह्मदेशाच्या समोरच्या किना-यापर्यंत; व भडोच (भरुकच्छ) वरून कन्याकुमारीला वळसा घालून पुन्हा ब्रह्मदेशाच्या समोरच्या किना-यापर्यंत; अशीं जलपर्यटनें केल्याचीं उदाहरणें आहेत. या काळांत हे लोक नाविकाच्या धंद्याला अगदींच अनभ्यस्त नव्हते एवढें यावरून दिसतें.
(१७) लव्हाळ्याचीं दोरखंडे वळणारे व पाट्या तयार करणारे बुरूड.
(१८) चितारी. हे लोक बहुधा घरांवर चित्रें रंगवीत. घरांच्या लांकडी कामावर बहुधा चुन्याचा गिलावा केलेला असे, व त्यावर चित्रें काढलेलीं असत. तथापि, हे चितारी छापाचीं चित्रेंहि काढीत. मगध आणि कोसल येथील राजाच्या असल्या त-हेचीं चित्रें काढलेल्या विश्रामशाला होत्या, असेहि उल्लेख आहेत. या कालातील हीं छापाचीं चित्रें इसवी सनाच्या सातव्या आणि आठव्या शतकांत अजिंठा येथील लेण्यांवर, व पांचव्या शतकांत सिलोन येथील सीगिरीवर, काढलेल्या अर्वाचीन चित्रांसारखीं आहेत यांत संशय नाहीं. आतां कालमानाप्रमाणें यांची त-हा निराळी आहे इतकेंच.