प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १० वें.
बुद्धापासून चंद्रगुप्तापर्यंतच्या काळची सामाजिक परिस्थिति.

वर्णव्यवस्था.- जगांत सर्वच राष्ट्रांतील अगदीं जुन्या लोकांमध्यें रोटीव्यवहार व बेटीव्यवहार यासंबंधानें कांहीं निर्बंध असावे असें दिसतें. कोठें कोठें हे निर्बंध शिथिल असत, तरी पण प्रत्येक जातींत अशा त-हेचे कांहींना कांहीं तरी निर्बंध होतेच. ख्रिस्ती शकापूर्वीं ७ व्या शतकामध्यें हिंदुस्थानांतहि हे निर्बंध निरनिराळ्या जातींमध्यें निरनिराळ्या स्वरूपांत होते.

समाजांतले भेदाभेद बहुधा नात्यागोत्याच्या संबंधावरच अवलंबून असत, किवा वर्गभेदावर अवलंबून असत. चार वर्गांची म्हणजे चातुर्वर्ण्याची कल्पना कशी तयार होत गेली याचा वेदकालीन इतिहास मागें दिलाच आहे. बुद्धाची चळवळ म्हणजे त्या संथेचा जरा अधिक पुढील काळांतील इतिहास होय.

बौद्ध ग्रंथांत नेहमीं अट्टहासपूर्वक असा सिद्धांत मांडला असतो कीं, सर्वांत उच्च दर्जाची जात म्हणजे क्षत्रिय. पितृवंशाकडून व मातृवंशाकडून सात सात पिढ्यांपर्यंत आपला वंश शुद्ध असला पाहिजे अशाविषयीं त्यांचा मोठा कटाक्ष असे. बौद्धांच्या दृष्टीनें यानंतरची जात म्हणजे ब्राह्मण. हे यज्ञकर्में करणा-या ॠत्विजांचे वंशज होय. याखालची पायरी म्हणजे वैश्य लोक; व शेवटची पायरी म्हणजे शूद्र. यांशिवाय हीनजातीय म्हणून कित्येक किरकोळ वर्गांचा उल्लेख केला जातो त्या जाती निराळ्याच आहेत. हीनजातीयांत गाड्या तयार करणारे, लव्हाळ्यांच्या वगैरे दो-या करणारे, पक्षी मारणारे, असे पुष्कळ लोक असत. हीन सिएपानी म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, त्यांमध्यें चट्या करणारे, न्हावी, कुंभार, कोष्टी, चांभार, वगैरे लोक असत. परंतु जन्मसिद्ध जातीवरून अमकाच धंदा अमुक माणसाचा असा निर्बंध असल्याचें दिसत नाहीं. यांपैकीं कोणताहि धंदा कोणीहि करीत. उदाहरणार्थ, जातककथा ५.२९० यामध्यें एका प्रेमानें वेडावलेल्या क्षत्रियानें कुंभार, बुरूड, माळी व स्वैपाक्या, असे धंदे स्वीकारल्याचें सांगितलें आहे. तसेंच जातक कथा ६.३७२ यांत शिंपी व कुंभार हे धंदे एका श्रेष्ठीनें केल्याचें सांगून, त्यामुळें त्याच्या सामाजिक दर्जांत कोणताहि फरक झाला नाहीं असें सांगितलें आहे. यांशिवाय, अत्यंत हीन मानलेले असे चांडाल व पुक्कुस नांवाचे लोक होते असा उल्लेख जैन व बौद्ध वाङ्‌मयांत सांपडतो. हे लोक स्वतंत्र नागरिक असून याखेरीज गुलाम लोकहि यांच्यांत होते. न्यायाधिशानें दिलेल्या शिक्षेमुळें कित्येक गुलाम बनत, तर कित्येक आपण होऊन गुलामगिरी पतकरीत. लढाईंत पकडून आणलेले कैदी लोक गुलामच समजले जात, व यांची संततीहि पण गुलामच गणली जात असे. गुलामांनां घरगुती नोकरांप्रमाणें वागविलें जात असे व ते अल्पसंख्याक असावे असें वाटतें. चातुर्वण्यविषयक सामाजिक स्थानांत गुलामगिरीमुळें फरक पडत होता असें दिसत नाहीं. गुलाम म्हणजे शुद्र असें नाहीं.

कोणत्याहि माणसाला आपला सामाजिक दर्जा बदलतां येत असे असा पुरावा आहे. याबद्दल जर्नल ऑफ दि रॉयल एशियाटिक सोसायटीच्या १९०९ च्या पुस्तकामध्यें ८६८ व्या पृष्ठावर खालील उल्लेख दिले आहेत:- (१) एका क्षत्रिय सरदारानें कांहीं प्रेमसंबंधामुळें कुंभार, बुरूड, माळी, स्वैपाकी, असे धंदे अनुक्रमें स्वीकारले होते. (२) दुस-या एका राजपुत्रानें राज्यासंबंधाचा आपला सर्व हक्क बहिणीस दिला व तो व्यापारी बनला. (३) तिसरा एक क्षत्रिय राजपुत्र एका व्यापा-याकडे राहून स्वतःच्या कष्टानें पोटाला मिळवीत होता. (४) चवथ्या एकानें तिरंदाजाची पगारी नोकरी पतकरिली. (५) एका ब्राह्मणानें दानधर्माकरितां पैसे मिळावे म्हणून व्यापार केला. (६) दुसरे दोन ब्राह्मण वरच्यासारखी सबबहि न सांगता व्यापारावर उपजीविका करीत होते. (७) एका ब्राह्मणानें एका तिरंदाजाच्या हाताखालीं नोकरी पतकरली. हा तिरंदाजहि पूर्वीं एक कोष्टी होता. (८-९) ब्राह्मण शिकारी व फांसेपारधी हे धंदे पतकरीत असत. (१०) एक ब्राह्मण चाकें तयार करण्याचा धंदा करी. ब्राह्मण लोक शेतकीसंबंधाचीं कामें करीत व गुराख्यांचें व धनगरांचेंहि काम पैशाकरितां पतकरीत अशाबद्दलचे दाखले सांपडतात.

वरील प्रकारचीं उदाहरणें देऊन र्‍हीस डेव्हिड्ससारखे संशोधक त्या काळांत जातिभेद कठोर झाला नव्हता असें सिद्ध करूं पाहतात. रमेशचंद्र दत्तासारखे लेखक शिंगें मोडून वासरांत शिरणा-या गाईप्रमाणें जातिभेद दृढ झाला नव्हता असले सिद्धांत काढतात. खरें पहातां असल्या त-हेच्या उल्लेखांवरून जातिभेद पक्का झाला असून समाजव्यवस्था आजच्यासारखीच असावी असें सिद्ध होतें. जेव्हां व्यक्ति समुच्चयविशिष्ट धंदा सोडून समुच्चयाच्या स्वरूपाशीं विसंगत धंदा पतकरील व आपल्या समुच्चयांतील स्थान गमावणार नाहीं तेव्हां तो समुच्चय वर्ग राहिला नसून जातिस्वरूप झाला होता असें समजावें. संकरविवाहाच्या संततीचा दर्जाहि जातककथांत क्षत्रिय किंवा ब्राह्मण यांच्या बरोबरीचा होता असें दिसतें.

ह्या लोकांत सहभोजनें होत असत किंवा नसत; याबद्दल ग्रंथांतरीं फारच थोडे दाखले सांपडतात. ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यामध्यें अन्नव्यवहार झाल्याचीं उदाहरणें आहेत. चांडाळाचें अन्न भक्षण करून मागाहून पश्चात्ताप पावणा-या ब्राह्मणांचीं उदाहरणेंहि आहेत. म्हणजे जातिभेद भोजनादि बाबतींत दृढ होत चालला होता असें दिसतें. पसेनदि राजाला दिलेल्या शाक्य कुळांतील कन्येच्या विवाहाचा प्रसंग क्षत्रियजातीचा मनुष्य दासीकन्येबरोबर - मग ती स्वतःच्या पोटची कन्या असली तरी - अन्नव्यवहार करीत नाहीं यावरच बसविलेला आहे. हे निर्बंध मोडल्याबद्दल शिक्षा झाल्याचींहि उदाहरणें आहेत. जातककथा ४.३८८ यांत ब्राह्मणांनीं एका ब्राह्मणाचें ब्राह्मणत्व चांडाळाच्या हातची पेज पडलेलें पाणी प्याल्यामुळें काढून घेतल्याचें सांगितलें आहे. तसेंच बुद्धसंवादांमध्यें, एका ब्राह्मणास कांहीं एका अपराधावरून क्षौर करावयास लावून अंगावर राख टाकून मारण्यांत आलें, व हद्दपार करण्यांत आलें असें सांगितलें आहे [बुद्धाचे संवाद १.१२०]. येथील या संवादाचा भाग पाहिला म्हणजे त्यांत बौद्धसांप्रदायिक कल्पना ब-याच असाव्या असें दिसतें. तरी पण हे संवाद लिहिले गेले त्या काळांत, असले आचारविचार व असला कुळाभिमान राष्ट्रांतील लोकांच्या मनोधर्माचें एक प्रधान अंग होता असें म्हणावयास हरकत नाहीं.

या लोकांत अनुलोमप्रतिलोम विवाह होत असत अशाबद्दल ग्रंथांतरीं दाखले सांपडतात. परंतु या पुराव्याच्या अभावीं देखील या बाबतींत काय प्रकार चालत असावा याचें वस्तुस्थितीवरून अनुमान करतां येण्यासारखें आहे. विवाहासंबंधाच्या तात्त्वि निर्बंधांस न जुमानतां इंग्लंडांत ज्याप्रमाणें इबेरिअन, केल्ट्स, आंग्ल, सॉक्सन, डेन्स, नॉर्मन वगैरे लोकांत संकर झाला, त्याचप्रमाणें उत्तर हिंदुस्थानांतील जातींचाहि बुद्धपंथाच्या उदयाच्या वेळीं संकर झाला असावा. वर्णांचें निरनिराळें अस्तित्व कोणी मानीत नसावे. वर्णांची कल्पना उदय पावण्याच्या अगोदरच जातींजातींतलें अंतर नष्ट होऊन त्यांच्यांतील भेदाची कल्पनाहि नष्ट होण्याइतका संकर झाला होता, अशी कल्पना र्‍हीस डेव्हिड्स यांनीं व्यक्त केली आहे. तीविरुद्ध पुरावा त्यांनींच दिला आहे म्हणून ती येथें खोडीत बसण्याचें कारण नाहीं. संशोधकाची इच्छा व त्याचें ज्ञान यांत उत्पन्न झालेल्या द्वैताचें हें एक उदाहरण आहे म्हणून तिकडे दुर्लक्ष करावें.

वर्णभेद आणि जातिभेद हे दोन निरनिराळे आहेत. आजचा जातिभेद कसा उत्पन्न झाला हें समजण्यास, वर्णकल्पनेचा इतिहास व त्यांतील रोटीव्यवहार व बेटीव्यवहार यांच्याबद्दलचे नियम हें एक साधन असेल, व तें तसें आहेहि; परंतु वर्णभेद म्हणजे जातिभेद नव्हे. वर्ण या शब्दाचा जात या अर्थानें करण्यांत आलेला उपयोग चुकीचा आहे.