प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १० वें.
बुद्धापासून चंद्रगुप्तापर्यंतच्या काळची सामाजिक परिस्थिति.

भूमिनियमन.- पीक निघण्याजोगी सर्व जागा एकत्र करून ती सर्व कुटुंबांत वांटीत. प्रत्येक कुटुंबानें आपल्या वांट्यांतील उत्पन्न घ्यावयाचें. परंतु या वांट्यावर त्याला खासगी रीतीनें मालकी हक्क मात्र नसे. या वांट्यांपैकीं कोणत्याहि वांटा एखाद्यानें त्रयस्थाला विकला अगर त्याजकडे गहाण टाकला असें घडून आल्याचीं उदाहरणें मुळींच नाहींत. किंबहुना, पंचायतीच्या सल्ल्याशिवाय त्याला असें करतां येत नसे. हे वांटे कोणाहि इसमास देणगी म्हणूनहि देऊन टाकतां येत नसत. इतकेंच नव्हे, तर मालकाला आपल्या जमिनीची स्वतःच्या कुटुंबांत देखील वांटणीकरून देण्याचा अखत्यार नसे. न्याय्यान्याय्य गोष्टींचा निर्णय रूढीवर अगर पंचायतीच्या इच्छेवर असे. वडील मुलाचे विशेष हक्क त्या वेळींहि मानले जात नव्हते. कुटुंबांतला कर्ता पुरुष वारला म्हणजे त्याच्या सर्वांत वडील मुलानें पूर्ववत् कारभार चालवावा. जर वांटण्या करून देण्याचा प्रसंग आलाच तर सर्व मुलांनां सारखा हिस्सा मिळत असे. स्त्रियांचें खासगी मालकीचें धन म्हणजे जडजवाहीर व कापड हेंच मुख्यतः असे. त्यांनां जमिनीचा स्वतंत्र वांटा देण्याची जरूर नव्हती. गुरचराईसाठीं असलेल्या समायिक कुरणापैकीं कोणत्याहि भागाची खरेदी अगर विक्री एखाद्या व्यक्तीला करतां येत नसे; किंवा वारसा हक्काच्या योगानें त्याच्यावर अनियंत्रित स्वामित्वाचा हक्कहि कोणास मिळत नसे. या प्रांतांत दुष्काळ वारंवार पडत, त्यानें या लोकांच्या एकंदर सुखमय स्थितीमध्यें थोडेसें वैगुण्य आलें होतें. मिगॅस्थिनीझ यानें पाट, कालवे वगैरेंच्या योगानें या लोकांनां दुष्काळ मुळींच माहीत नव्हता असें म्हटलें आहे; परंतु येथें वारंवार दुष्काळ पडत याजबद्दल पुरावा सांपडतो. पाटणा म्हणजे ज्या ठिकाणीं मिगॅस्थिनीझ रहात असे त्या ठिकाणीं, व त्यांच्या भोंवतालच्या प्रदेशांत दुष्काळ पडल्याचीं उदाहरणें वारंवार सांपडतात. परंतु मिगॅस्थिनीझचा काळ व हा काळ यांच्यामध्यें जवळ जवळ दोन शतकांचें अंतर असल्यानें, मध्यंतरीं यांची स्थिति सुधारली असावी असें म्हणावयास जागा आहे.

अशा प्रकारच्या आर्थिक परिस्थितींत या लोकांपैकीं शेंकडा ७०-८० लोक रहात असत. हे लोक खेड्यांतून रहात खरे; परंतु आजच्या खेडेगांवांतील लोकांपेक्षां यांचा दर्जा बराच श्रेष्ठ ठरेल. मोल घेऊन टाकभाड्याचें काम करणें ही त्यांनां मानहानि वाटत असे. स्वतःच्या जातीचा, कुलाचा व खेड्याचा त्यांनां अभिमान असे. आपआपल्या चालींप्रमाणें हे आपला राजा निवडून नेमीत असावेसें वाटतें.