प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १० वें.
बुद्धापासून चंद्रगुप्तापर्यंतच्या काळची सामाजिक परिस्थिति.
ब्राह्मणी वाङ्मयावरून निघणा-या इतिहासाचा एकांगीपणा. - हिंदी भाषा व वाङ्मय यांच्या या अत्यंत त्रोटक सारांशावरूनहि असें दिसून येईल कीं, यूरोपांतल्याप्रमाणेंच येथेंहि आध्यात्मिक व आधिभौतिक सत्तांमधील लढा हाच या इतिहासाचा प्रमुख भाग होता. या लढ्याचें स्वरूप याज्ञिक कर्मकांडवाल्या भिक्षुकांनीं जसें आपणांस दाखविलें तसें आपणांपुढें आहे. या सर्व लढ्यांत त्यांचें वर्चस्व त्यांनीं दाखविलेलें आहे. परंतु या प्रश्नाच्या दुस-या बाजूचाहि विचार केला पाहिजे. येणेंप्रमाणें ब्राह्मणांच्या महत्त्वाची कल्पना संकुचित करण्याचा प्रयत्न करून पुढें र्हीस डेव्हिड्स म्हणतात.-
''येथें गैरसमज होऊं नये एवढ्याकरितां हें सांगणें जरूर आहे कीं, या ब्राह्मण लोकांमध्यें कांहीं धनाढ्य लोक होते, व विद्वान लोकहि होते; हे लोक सत्ताधारी होते; यांनां समाजांत मान होता; व नीति व तत्त्वज्ञान यांच्या प्रसारार्थ यांनीं बरीच खटपट केली. परंतु या लोकांनीं स्वतःच्या बुद्धिमत्तेची, धनाढ्यत्वाची वगैरे एकांगी माहिती लोकांपुढें मांडिली आहे. ब्राह्मण विद्वान् नव्हते, धनाढ्य नव्हते असें म्हणण्याचा येथें हेतु नसून त्यांच्या म्हणण्याप्रमाणें विद्वत्तेचा वगैरे सर्व मक्ता त्यांनीं एकट्यांनींच घेतलेला नव्हता एवढेंच कायतें सांगावयाचें आहे.'' हे डेव्हिड्सचें म्हणणें विशेष अमान्य होईल असें नाहीं.
ब्राह्मणांनीं दिलेल्या या एकांगी इतिहासाचें सत्य स्वरूप लक्षांत आल्याखेरीज हिंदुस्थानचा सुसंगत इतिहास समजणें अशक्य होईल.