प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १० वें.
बुद्धापासून चंद्रगुप्तापर्यंतच्या काळची सामाजिक परिस्थिति.
एतद्विषयक माहिती र्हीस डेव्हिड्सच्या बुद्धिस्ट इंडिया या पुस्तकाच्या आधारानें आमच्या दृष्टीनें अवश्य दिसणारे फेरबदल करून पुढें देत आहों.
शाक्यांची लोकसंख्या.- बुद्धकालीन राजकुलें व मोठीं घराणीं यांपैकीं शाक्यकुळांसंबंधाची माहिती विशेष खुलासेवार उपलब्ध आहे. यांच्या प्रदेशाची जागा, तिची इतर प्रदेशांपासून जी अंतरें दिलेलीं आहेत त्यांवरून निश्चित करितां येते. हा प्रदेश नेपाळ व ब्रिटिश मुलूख यांच्या सरहद्दीवर असावा. बुद्धाच्या रक्षेवर जी समाधि शाक्य लोकांनीं बांधिली तिजवरून, व बुद्ध ज्या लुंबिनी बागेंत जन्मला तेथें अशोक गेला होता असा शिलालेखांत पुरावा सांपडतो त्यावरून हें अनुमान काढिलेलें आहे. शाक्य कुळाच्या अंमलाखालील ब-याच गांवांची नांवें जुन्या ग्रंथांतून दिलेलीं आहेत. हीं गांवें म्हणजे चाल्लमा, सामगाम, खोमदुश्श, शिलावती, मेतलूप, उलुंप, सक्कर व देवदह हीं होत.
यांपैकीं शेवटचें गांव जें देवदह त्या ठिकाणीं बुद्धाच्या आईचा जन्म झाला. बुद्धाच्या आईच्या बापाचें नांव अंजनशाक्य असें स्पष्ट सांगितलेलें आहे. परंतु, बुद्धाची आई कोलियन कुळांतील होती, व देवदह (याचेंच नांव त्याच्या नगरीस दिलेलें होतें) हाहि एक कोळी (कोलियन) सरदार होता असें सांगण्यांत येतें. याची संगति कोलियन ही शाक्य कुळाचीच एक पोटजात होती असें म्हणूनच लाविली पाहिजे. मातृवंशाच्या संबंधानें बुद्धाच्या आप्तवर्गांत मोडणारी अशी ८०,००० कुटुंबें होतीं व पितृवंशाकडूनहि आप्तवर्गांत मोडणारीं कुटुंबे तेवढींच होतीं असें बुद्धघोषापर्यंत चालत आलेल्या एका आख्यायिकेवरून दिसतें. तेव्हां, प्रत्येक कुटुंबांत लहानमोठीं ६७ माणसें धरलीं तरी शाक्य प्रदेशांत रहाणा-या लोकांचीं संख्या दहा लक्षांपर्यंत जाते. ही संख्या जरी आख्यायिकारूपानें सांगितलेली आहे तरी वस्तुस्थिति फारशी भिन्न नसावी असें वाटतें.