प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १० वें.
बुद्धापासून चंद्रगुप्तापर्यंतच्या काळची सामाजिक परिस्थिति.

प्राचीन शहरें व त्यांचा स्थाननिश्चय.- इसवी सनापूर्वीं सातव्या शतकांत हिंदुस्थानांत मुख्य शहरें कोणतीं कोणतीं होतीं त्यांची यादी येणेंप्रमाणें:- (१) अयोध्या, (२) वाराणी, (३) चंपा, (४) कांपिल्ल, (५) कौशाम्बी, (६) मथुरा, (७) मिथिला, (८) राजगृह, (९) रोरुक, (१०) सागल, (११) सावेत, (१२) उज्जयिनी व (१३) वैशाली.

चंपा.- याची जागा भागलपूरच्या पूर्वेस २४ मैलांवर त्याच नांवांची खेडीं आज सांपडतात, तीच असावी असें कनिंगहॅम यानें दाखविलें आहे. कोचीनचीनमधल्या हिंदी वसाहतवाल्यांनीं आपल्या एका नगरास त्याचें नांव दिले आहे.

कां पि ल्ल.- या नगराची जागा अद्याप निश्चित झालेली नाहीं.

रा ज गृ ह.- हें अलीकडील राजगीर होय. गिरिब्बज व राजगीर येथील तटबंदी अद्यापि शाबूत असून त्यांचा परीघ अनुक्रमें ४॥ व ३ मैल आहे. गिरिब्बजाच्या दगडी भिंती हें हिंदुस्थानांतील सर्वांत जुनें दगडी काम होय.

रो रु क.- किंवा रोरुव. ही सोवीराची राजधानी होय. सॉलोमनचीं जहाजें ज्या बंदरांस लागत असत असें हिब्रू लोकांच्या इतिहासावरून कळतें, तें बंदर हेंच असावें असें पुराव्यावरून दिसतें. कारण पॅलेस्टाइनमध्यें येथून जो माल जात असे त्या जिनसांचीं म्हणजे हस्तिदंत वगैरेंची नांवें हिंदीच आहेत. त्याचा स्थलनिर्देश नक्की करतां येत नाहीं. परंतु आजच्या खारागोण्याच्या जवळपास कच्छच्या आखातावर वसलेलें हें शहर असावें असें बहुतेक वाटतें.

सा के त.- याचा स्थलनिश्चय झालेला आहे. सुजानकोट येथें जे पुराणवस्तूंचे अवशेष सांपडतात तेथें हें वसलेलें असावें. आधुनिक अयोध्या प्रांतांत उणाऊमध्यें साइनदीच्या काठीं हें सुजानकोट आहे. येथील अंजनवनांत बुद्धकालीन बरींच सुत्तें लिहिलीं गेलीं.