प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १० वें.
बुद्धापासून चंद्रगुप्तापर्यंतच्या काळची सामाजिक परिस्थिति.

परिव्राजक.- या मठवासी बैराग्यांशिवाय पारिव्राजक नांवाचे दुस-या एका प्रकारचे लोक होते. हे लोक केवळ हिंदुस्थानांतच होते, व येथेंहि बौद्ध संप्रदायाच्या उदयापूर्वीं ते फारसे असतील असें दिसत नाहीं. हे परिव्राजक लोक गांवोगांव हिंडून तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र, वगैरेंसंबंधानें संभाषणें करीत; व हाच अशा त-हेनें हिंडण्यांत त्यांचा मुख्य उद्देश होता. या कार्यांतच ते वर्षांतील आठ नऊ महिने घालवीत. हे लोक बुद्धिमत्तेंत, कळकळींत किंवा सत्याची चाड ठेवण्याच्या बाबतींत विशेष श्रेष्ठ होते असें दिसत नाहीं. यांच्यापैकीं कांहीं लोक केवळ शाब्दिक वाद माजविणारे व उगीच नसतें तर्कावडंबर करणारे होते असें वर्णन आहे. त्यांच्या वादविवादांचे जे कांहीं अवशेष आज पहावयास मिळतात त्यांवरून हें विधान अगदींच खोटें आहे असें म्हणतां येत नाहीं. परंतु यांच्यापैकीं कांहीं लोक बुद्धिमत्ता वगैरे बाबतींत बरेच श्रेष्ठ असले पाहिजेत; कारण, एरवीं त्यांची आजपर्यंत एवढी कीर्ति चालत आली नसती. त्यांच्या संभाषणाकरितां, म्ह. आपल्या तत्त्वांच्या प्रसारासाठीं हे जे वादविवाद करीत त्यांकरितां, मोठमोठे दिवाणखाने बांधले असल्याचें लिहिलेलें आहे. श्रावस्ती नगरींत मल्लिका राणीच्या बागेंत अशा त-हेचें एक सभागृह होतें. तसेंच वैशाली राजधानीजवळच्या महारण्यांत लिच्छवी संघानें बांधलेला एक दिवाणखाना आहे. याचा उल्लेख पुस्तकांतून, इकडून तिकडे हिंडणा-या जोगी लोकांचा मठ असा केलेला आहे. कधीं कधीं, या लोकांनां वस्तीच्या जवळच मोठमोठ्या राई तोडून दिलेल्या असत. चंपकारण्य व मोरनिवाप हीं याच त-हेचीं स्थानें आहेत. चंपकारण्य हें चंपानगरीच्या जवळ व मोरनिवाप हें राजगृह येथें होतें.

हे संचार करीत इतस्ततः हिंडणारे लोक अशा ठिकाणीं एकमेकांच्या गांठी घेत. त्याच वेळीं ते आपल्या मुक्कामाच्या जागेच्या आसमंतांतील विद्वान् ब्राह्मण वगैरे लोकांच्याहि भेटी घेत. उदाहरणार्थ, 'दीघनखानें बुद्धाची गांठ घेतली, व बुद्ध व सकुलदायी यांची भेट झाली, वैखानस बुद्धाकडे गेला, केनियानें बुद्धाची मुलाखत घेतली, पोटलीपुत्त समिद्धीकडे गेला,' अशा प्रकारचे उल्लेख ग्रंथांतून सांपडतात. हे मठवासी लोक एखाद्या खेड्याच्या शेजारीं येऊन राहिले म्हणजे गांवांतील लोकहि शिष्टाचाराप्रामाणें त्यांनां परत भेटी देत. यावरून या मठवासी लोकांमध्यें व गांवांतील लोकांमध्यें विचारविनिमय होत असला पाहिजे हें उघड आहे.

या भ्रमण करणा-या भिक्षूंपैकीं कांहीं स्त्रिया होत्या. हे लोक ब्रह्मचर्य पाळण्यापलीकडे कोणत्याहि यतिधर्माचा अवलंब करीत नसत. अरण्यांतील भिक्षू लोकांनीं देहदण्डन करून घेतल्याचीं अनेक उदाहरणें आहेत. नीरंजनेच्या कांठीं अरण्यांत, बोधिवृक्षाखालीं बोधिप्राप्ति होण्यापूर्वीं बुद्धानें अशा त-हेचें तपाचरण केलें होतें. त्यानंतर तो संचारी भिक्षु बनला. तापसी व संचारी भिक्षू असे दोन निरनिराळे पंथ होते, व या पंथांतील लोकांचे नियमहि निरनिराळे होते. या दोन्ही पंथांतील ब-याच व्यक्तींचीं नांवें ग्रंथांतून आढळतात.