प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १० वें.
बुद्धापासून चंद्रगुप्तापर्यंतच्या काळची सामाजिक परिस्थिति.

दळणवळणाचे मार्ग.- दळणवळणाच्या मार्गांसंबंधी खालीं दिल्याप्रमाणें माहिती उपलब्ध आहे.

(१) उत्तरेकडून नैऋत्येकडे श्रावस्तीपासून प्रतिष्ठानपर्यंत. वाटेंत मार्गावर थांबण्याचे टप्पे (दक्षिणेच्या बाजूने आरंभ केल्यास) माहिस्सती, उज्जयिनी, गोनद्ध, विदिशा कौशांबी व साकेत हे होते.

(२) उत्तरेकडून आग्नेयीकडे श्रावस्तीपासून राजगृहापर्यंत. या दोन शहरांमधला मार्ग पर्वताच्या पायथ्यापायथ्यानें वैशालीच्या उत्तरेकडच्या एका भागापर्यंत जातो, व त्यानंतर दक्षिणेकडे वळून गंगा नदीपर्यंत जातो. नद्यांचे उतार वगैरे साधण्यासाठीं हा रस्ता असा लांबलचक व वेडावांकडा केलेला असावा. तथापि याला कांहीं राजकीय कारणेंहि असावीं तसें वाटतें. उत्तरेच्या बाजूनें आरंभ केल्यास या मार्गांतील टप्पे सेतव्य, कपिलवस्तु, कुशिनार, पावा, हस्तिग्राम, भंडग्राम, वैशाली, पाटलिपुत्र व नालंद हे होत. हा रस्ता बहुधा गयेपर्यंत जाऊन तेथून बहुतेक ताम्रलिप्‍ती येथें, समुद्रकिना-याकडून येणा-या व काशीकडे जाणा-या रस्त्यास मिळत असावा.

(३) पूर्वपश्चिम रस्ता. हा मुख्य रस्ता मोठमोठ्या नद्यांच्या तीरातीरानें होता. या नद्यांतून भाड्याकरितां नावाहि चालत असत. नावांचा स्पष्ट उल्लेख केलेला सांपडतो. वर जातांना नावा पश्चिमेकडे सहजातीपर्यंत गंगा नदींतून जात, व कौशांबीपर्यंत यमुनेंतून जात. खालीं उतरतांना नावा थेड गंगा नदीच्या मुखापर्यंत जात व तेथून समुद्रकिना-यानें ब्रह्मदेशापर्यंत जात. ब-याच जुन्या काळच्या ग्रंथांत मगधापर्यंतच म्हणजे फार तर चंपानगरीपर्यंत व्यापार चालत असल्याचीं उदाहरणें आहेत.

यांशिवाय, विदेहापासून गांधाराकडे, मगधापासून सोवीराकडे, भरूकच्छापासून किना-याला वळसा घालून ब्रह्मदेशापर्यंत, वगैरे व्यापारी लोक जात असें ग्रंथांतून सांगितलेलें आहे. राजपुतान्याच्या पश्चिमेकडचें मैदान ओलांडून जातांना गाड्यांचे तांडे बहुधा रात्रीचेच प्रवास करीत, व ता-यांच्या अनुरोधानें मार्गाची दिशा दाखविणारे वाटाडेहि त्या काळीं होते. व्यापारी लोक बाबिलोनपर्यंत प्रवासास गेल्याचें फक्त एकच उदाहरण आहे. हा प्रवास समुद्रांतून झाला होता; परंतु जेथून या प्रवासास सुरुवात झाली त्या बंदाराचें नांव कोठेंच सांगितलेलें नाहीं. सिनेरची एक जगप्रसिद्ध गोष्ट आहे. सिरेन लोक हे ताम्रपर्णीद्वीपांत रहात होते. ताम्रपर्णी द्वीप हें बहुधा सिलोन असावें. लंकेचा उल्लेख कोठेंहि नाहीं. मिलिंदामध्यें चीन देशाशीं व्यापार केल्याचा उल्लेख प्रथमच सांपडतो; तथापि हा व्यापार यावरून वाटतो त्यापेक्षां बराच पुरातन असला पाहिजे असें चिनी वाङ्‌मयावरून दिसून येतें (विज्ञानेतिहास पृ. ४५३-४५५ पहा).