प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १० वें.
बुद्धापासून चंद्रगुप्तापर्यंतच्या काळची सामाजिक परिस्थिति.
त्यांची न्यायदानपद्धति.- फौजदारी गुन्ह्यांबद्दल या लोकांत काय व्यवस्था होती याबद्दलची कल्पना एका परंपरेवरून करतां येते. वज्जि नांवाच्या कुलामध्यें एकापेक्षां एक असे वरचढ अधिकारी नेमिलेले असत. न्यायाधीश, कायदेपंडित, धर्मशास्त्रज्ञ, यांवर एक आठ कुलांच्या प्रतिनिधीचें मंडळ, त्यावर राज्याचा उपाध्यक्ष व अध्यक्ष अशी ही परंपरा होती. यांपैकीं प्रत्येक माणसाला गुन्हेगार इसक सोडून देण्याचा अधिकार होता; परंतु शिक्षा देण्याची पाळी आल्यास त्या माणसाचा कज्जा त्याला वरच्या अधिका-याकडे वर्ग करावा लागे, व शिक्षा देण्याचा अधिकार शेवटीं खुद्द अध्यक्षाच्या हातांत राही. या शिक्षा मागील दप्तराच्या दाखल्यांवरून सारासार विचारानें दिल्या जात. वज्जि कुलाखेरीज इतर कुलें अशा त-हेचे न्यायदार करणारे अधिकारी ठरविण्याच्या खटाटोपांत पडलेलीं दिसत नाहींत; आणि खुद्द वज्जि कुळांत तरी या पद्धतीचा अवलंब कितपत केला जात असे याबद्दल शंका येते. परंतु धर्मशास्त्रासंबंधाचे नियम व मागील माहितीचें दप्तर यांस अनुलक्षून केलेले उल्लेख दुस-या ठिकाणीं सांपडतात, त्यांवरून या विषयासंबंधाच्या लेखी माहितीचा उपयोग केला जात असावा असें वाटतें.