प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १० वें.
बुद्धापासून चंद्रगुप्तापर्यंतच्या काळची सामाजिक परिस्थिति.

ग्रामव्यवस्था.- भूगोलविषयक परिस्थितीप्रमाणेंच आर्थिक परिस्थिति व समाजांतील संस्था याच्या हिंदी लोकांच्या आयुष्याला वळण देण्याला कारण झाल्या. हिंदी समाजाची रचना ही ग्रामपंचायतीच्या पायावर केलेली होती. लोक एकटे लांबलांब निरनिराळीं घरें बांधून रहात असत असें दिसत नाहीं. प्रत्येक घरवाल्याचीं गुरें निरनिराळीं असत, परंतु त्यांनां चरण्यासाठीं प्रत्येकाचीं खासगी मालकीचीं अशीं निराळीं कुरणें नव्हतीं. पीक काढून घेतल्यावर गुरें सर्व शेतांतून हिंडत. जमिनींत पीक उभें असे त्या वेळीं, सर्व लोकांचीं गुरें एकत्र करून एका गुराख्याबरोबर चराईसाठीं राखलेल्या कुरणांत पाठविलीं जात. जातककथा १. १९४ यांत गुराख्याचें वर्णन आहे, त्यावरून याला त्या वेळीं बरेंच महत्त्व होतेसें दिसतें. सर्व शेतांची लागवड एकाच काळीं होत असे, व त्यांनां पाणी देण्याची व्यवस्था पाट काढून केलेली असे. प्रत्येक शेताला कुंपण घालण्याची त्या वेळीं जरूर नव्हती. सर्व शेतांभोंवतीं एकच कुंपण घातलेलें असे.