प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १० वें.
बुद्धापासून चंद्रगुप्तापर्यंतच्या काळची सामाजिक परिस्थिति.
इतर पंथ.- ब-याचशा लोकांनीं एखाद्याचें शिष्यत्व पतकरिलें किंवा एकाच त-हेच्या मतांचा अंगीकार केला म्हणजे त्या लोकांचा पंथ बनून त्यास कांहीं तरी नांव मिळत असे. उदाहरणार्थ, ज्याला आज आपण बौद्ध संघ म्हणतो त्यांतल्या लोकांनां 'शाक्यपुत्तिय सम्मण' असें म्हणत असत. जैनांच्या संघाला नीगंठ म्हणत. आजीविक नांवाचा दुसरा एक संघ होता. बौद्ध संप्रदायाच्या उदयापूर्वीपासून तों आजतागायत शिस्तवार संघटना असलेला असा जैनांचाच कायतो संघ हिंदुस्थानच्या इतिहासांत टिकलेला सांपडतो. आजीविक संघ अशोकाचा नातू दशरथ याच्या काळापर्यंत होता. या दशरथानें लेण्यांमधून या लोकांनां राहण्याकरितां मठ दिले होते असे शिलालेखांवरून दिसून येतें. हा आजीविक संघ ब-याच दिवसांपूर्वीं नष्ट झाला व त्याच्याबरोबरच त्याच्या कल्पनांनीं व तत्त्वांनीं भरलेलीं त्याचीं सुत्तेंहि लयास गेलीं.
अंगुत्तरामध्यें या संघांच्या नांवाची माहिती आहे. या नांवांपलीकडे त्यांची आज फारशी माहिती नाहीं. इतस्ततः केलेल्या उल्लेखांवरून असे दोन तीन संघ तरी अस्तित्वांत असावे असें वाटतें. विखानसानें स्थापिलेल्या संप्रदायाचे नियम देणारें वैखानससुत्त नांवाचें एक सुत्त आहे, त्यासुत्ताचा काळ इसवी सनाचे ३ रें शतक हा बहुधा असावा. एक वैखानस बुद्धाला भेटला असें वर सांगितलें आहे. तो वैखानस या संघांतला असणें अगदींच अशक्य आहे असें नाहीं. पाणिनीच्या सूत्रांपैकीं एका सूत्रावरच्या वार्त्तिकांत कर्मेदिन आणि पाराशरि यांचा उल्लेख आहे (४.३, ११०). मज्झिमामध्यें (३.२९८) बुद्धानें एका पाराशरीय ब्राह्मणाच्या मतांची चर्चा केली आहे. या दोन शाखांपैकीं दुस-या पाराशरी शाखेचा हा पाराशर संस्थापक असावा असें वाटतें. तें कसेंहि असलें तरी वरील वात्तिक लिहिलें गेलें त्या वेळीं हा संघ अस्तित्वांत होता.
भिक्षूंच्या दुस-या कांहीं पंथांचीं फक्त नांवेंच तेवढी माहीत आहेत. उ. भुंडशावक, जटिलक, गोगंडिक, तेदण्डिक, अविरुद्धक, गोतमक, देवधम्मिक वगैरे. हीं नांवें विशिष्ट संघांनां लाविलीं जाण्याच्या अगोदर बराच काळ लोटला असला पाहिजे हें निर्विवाद आहे.