प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १० वें.
बुद्धापासून चंद्रगुप्तापर्यंतच्या काळची सामाजिक परिस्थिति.

नेआण.- शेतकरी व किरकोळ धंदे करणारे लोक मोठमोठ्या नद्यांतून किंवा किना-याकिना-यानें बोटींतून माल नेत व आणीत; किंवा खुष्कीच्या मार्गानें गाड्यांच्या तांड्यांतूनहि मालाची नेआण होत असे. हे तांडे म्हणजे दोनचाकी गाड्यांच्या रांगा असत. त्या काळच्या प्रवासक्रमाचा हा एक विशेष होता. त्या काळीं पक्क्या सडका किंवा पूल मुळींच नव्हते. गाड्या चका-याचका-यांतून, शेतक-यांनीं मोकळ्या ठेवलेल्या वाटांवरून, रानांतून वाट काढीत या खेड्यांतून त्या खेड्यास जात असत. या मालाच्या गाड्यांनां प्रत्येक देशांत शिरतांना कर व जकात द्यावी लागे. गाड्यांच्या तांड्यांचें वाटेंत दरोडेखोरांपासून रक्षण करण्याकरितां दिलेल्या शिपायांचा खर्चहि या करांपैकीं एक जबर बाब होती. ही बाब इतकी जबर होती कीं, ती फक्त उंची मालासच परवडत असे.

अन्नसामुग्री, सर्पण आणि उतारू लोक यांची नेआण आजच्या इतक्या मोठ्या प्रमाणांत त्या काळीं मुळींच नव्हती. रेशमी कापड, मलमल, तलम कपडे, चाकूकातरी वगैरे जिन्नस, चिलखतें, नकसकाम, पांघरुणें, सौगंधिक द्रव्यें व औषधें, हस्तिदंत व हस्तिदंती काम, जवाहीर व सोनं या व्यापाराच्या मुख्य जिनसा होत्या. चांदीचा व्यापार क्वचितच होई.