प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १० वें.
बुद्धापासून चंद्रगुप्तापर्यंतच्या काळची सामाजिक परिस्थिति.
ब्राह्मणांचें वर्चस्व.- दुसरा मुद्दा असा कीं, तत्त्वज्ञानात्मक किंवा धार्मिक वादविवादांत ब्राह्मण पडत असत, त्यांत त्यांचा उल्लेख आदरभावानें केला जात असे व त्यांनां समाजांत मान मिळत असे, तरी त्यांचें वर्चस्व सर्वांवर होतें असें म्हणतां येत नाहीं. भिक्षूंपैकीं बरेच लोक व त्यांच्यांतली बहुतेक शिष्ट व वजनदार मंडळी ब्राह्मण नव्हती. आणि ग्रंथांतरींचा पुरावा पाहिला, तर सामान्यतः या भिक्षूंनां म्हणजे इतरेजनांच्या शिक्षकांनां ब्राह्मणांइतकाच मोठा मान मिळत असे.
यावर असा एक आक्षेप येण्याचा संभाव आहे कीं, वर उद्धृत केलेले ग्रंथ सर्व ब्राह्मणांच्या विरुद्ध जाणारे अतएव त्याज्य होत. धर्मशास्त्रग्रंथ व पुराणग्रंथ लोकांच्या सर्व गोष्टीसंबंधानें उल्लेख करतांना ब्राह्मणांचा प्रामुख्येंकरून निर्देश करतात; आणि हा निर्देश केवळ त्यांच्या जातिविशिष्ट पावित्रतेमुळेंच केला जात नसून त्यांच्या बुद्धिमत्तेच्या प्रखर तेजामुळें केला जात असे. त्याचप्रमाणें हिंदी वाङ्मयासंबंधानें किंवा धर्मासंबंधानें पाश्चात्त्य लोकांनीं लिहिलेलीं पुस्तकें घ्या. ते लोक तर धम्र व ब्राह्मणांचें प्राबल्य हे दोन्ही विषय एकच समजतात.
पण या दोन्ही गोष्टी स्वतंत्र पुरावा म्हणून मानतां येत नाहींत. पाश्चात्त्य लोकांनीं दुस-या ग्रंथांचाहि विचार केला असता, परंतु ते त्यांनां मिळालेच नाहीत. त्यांच्यापुढें जीं साधने होतीं त्यांचा उपयोग मात्र त्यांनीं नीटपणें केला आहे. तरी सुद्धां ब्राह्मण लोकांच्या वर्चस्वाबद्दल पाश्चात्य लोकांत देखील एकमत नाही ही गोष्ट लक्षांत घेण्यासारखी आहे.
डॉ. भांडारकर यांचें या बाबतींतलें मत विचार करण्यासारखें आहे. रॉयल एशिआटिक सोसायटीचें मुंबई शाखेचे नियतकालिक, १९०१ सालचा अंक यामध्यें शिलालेखांतील पुराव्याकडे डॉ. भांडारकर यांनीं लक्ष वेधिलें आहे. ख्रिस्तोत्तर दुस-या शतकांत ब्राह्मणांनां दिलेलीं दानें नमूद करण्यास सुरुवात झाली. तिस-या शतकांत याचीं उदाहरणें थोडीं सांपडतात. चौथ्या शतकापासून पुढें ब्राह्मणांच्या वर्चस्वाची वाढ झपाट्यानें झालेली दिसते; व त्या काळच्या शिलालेखांत असल्या दानांचे उल्लेख पुष्कळच सांपडतात, यानंतर गुप्त वंशांतील राजांनीं अश्वमेधासारखे मोठ्या खर्चाचे व विधिनियमांच्या भानगडींनीं भरलेले असे यज्ञ तडीस नेले म्हणून सांगितलें आहे. या दोन शिलालेखांत यज्ञासाठीं उभारलेल्या स्तंभाचा उल्लेख आहे; व तिस-या एकांत सूर्याच्या एका देवळामध्यें नंदादीपासाठीं देणगी दिल्याचा उल्लेख आहे. यज्ञासंबंधाचे विधी करण्याकरितां गांवांच्या नेमणुका करून दिलेल्या आहेत; ब्राह्मणांनां अनेक त-हेच्या देणग्या दिलेल्या आहेत; व त्यांच्या देवळांनांहि उत्पन्नें करून दिलेलीं आहेत. पण याच्या पूर्वींच्या चार शतकांत (म्हणजे ख्रि. पू. ३०० ते इ. स. १०० पर्यंत) ब्राह्मण, ब्राह्मणांचीं देवळें, ब्राह्मणांचे देव, यज्ञ किंवा त्यांचा कसलाहि धर्मविधि यांचा उल्लेख एकदां सुद्धां केलेला दिसत नाहीं. राजे लोकांनीं, जहागीरदारांनीं किंवा व्यापारी, सोनार, कलाकुसरींचीं कामें करणारे कारागीर वगैरे लोकांनीं दिलेल्या देणग्यांचे उल्लेख अनेक ठिकाणीं आढळतात; पण, यांपैकीं एकहि देणगी ब्राह्मणांनीं चालविलेल्या किंवा ब्राह्मणांचा संबंध असलेल्या देवळें वगैरे संस्थेला दिलेली नाहीं. इतकेंच नव्हे, तर ब्राह्मण व त्यांचे विशिष्ट प्रकारचे यज्ञ यांचा उल्लेख असणारे हे उत्तरकालीन शिलालेख संस्कृतांत आहेत, तर हे पूर्वींचे लेख पालींत किंवा तत्सदृश जी भाषा हे संचारी भिक्षू बुद्धसंप्रदायाच्या उदयाच्या वेळीं वापरीत असें वर सांगितलें तींत आहेत. ही भाषा हे शिलालेख जेथें सांपडले तेथें प्रचारांत असलेली भाषा होती असेंहि म्हणतां येत नाहीं.
या दोन प्रकारच्या शिलालेखांत दिसून येणा-या भाषेसंबंधाच्या व देणग्यासंबंधाच्या तीव्र फरकावरून डॉ. भांडारकर यांनीं खालील सिद्धांत काढिला आहे.
''ख्रि. पू. दुस-या शतकापासून ख्रिस्तोत्तर चार शतकांपर्यंतच्या काळांत ब्राह्मणधर्मासंबंधाच्या इमारती, खोदकामें वगैरे कोठेंच सांपडत नाहींत. याचा अर्थ ब्राह्मणधर्म या वेळीं प्रचारांत नव्हता असा नव्हे; कदाचित्, पुढें पुढें ब्राह्मणधर्माला जें स्वरूप प्राप्त झालें त्याची हीं प्रथमावस्था असूं शकेल. परंतु ब्राह्मणधर्माला महत्त्व असें या कालांत कधींच नव्हतें, व राजापासून रंकापर्यंत ब-याच लोकांनीं बौद्ध संप्रदायाचें अनुयायित्व पतकरिलें होतें. शिलालेखांच्या भाषेवरून ब्राह्मणविद्येपेक्षां ही भाषा वापरणारांचा मान अधिक राखला जात होता असें दिसतें.''
या काळाच्या (ख्रि. पू. २०० ते ख्रिस्तोत्तर ४००) संबंधांत हें मत खरें आहे असें घेऊन चाललें तर तत्पूर्वींच्या चार शतकासंबंधानें हें जास्तच खरें असलें पाहिजे. प्रो. हॉपकिन्स म्हणतो:- ''ब्राह्मणधर्म हा कांहीं अंशीं समुद्रांतल्या एका बेटासारखा आहे. ब्राह्मणधर्माच्या अत्यंत भरभराटीच्या काळांत सुद्धां हा धर्म कांहीं थोड्याच लोकांनीं अंगीकारलेला होता, असा पुरावा सांपडतो.'' याचा अर्थ ब्राह्मणांचे आचारविचार व सामान्य जनांचे म्हणजे त्यांच्या मार्फत संस्कार करून घेणा-यांचे आचारविचार यांत अंतर मोठें होतें असा असेल तर हॉपकिन्सचें म्हणणें आपणांस वावगें वाटत नाहीं.