प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १२ वें.
अशोक ते अराजक-शकयवनांचा धुमाकूळ.
अशोकपूर्व इतिहासाचें सिंहावलोकन.- मागें ९ व्या प्रकरणांत बुद्धापासून चंद्रगुप्तापर्यंत राजकीय इतिहास दिला आहे. या कालांत कोणकोणते राजे झाले व त्यांचा कालानुक्रम काय होता हा प्रश्न बराच अवघड व वादग्रस्त असल्यामुळें, तत्संबंधीं झालेल्या प्रयत्नांचें स्वरूप ध्यानांत येण्याकरितां त्या प्रकरणांत तद्विषयय वेचक वाङ्मयाचा गोषवारा वाचकांपुढें ठेवावा लागला. चंद्रगुप्तानंतरची हिंदुस्थानच्या इतिहासांतील सुप्रसिद्ध व्यक्ति म्हटली म्हणजे त्याचाच नातू अशोक ही होय. या दोघांच्या दरम्यान चंद्रगुप्ताचा पुत्र बिंदुसार याची कारकीर्द झाली, पण त्याच्या संबंधीं जवळजवळ कांहींच माहिती उपलब्ध नाहीं म्हटले तरी चालेल. अशोकासंबंधीं माहिती देण्यास सुरुवात करण्यापूर्वी मौर्य घराण्याच्या अगोदर होऊन गेलेल्या व ज्यांच्या कारकीर्दींतील एक दोन सन स्थूलमानानें ठरवितां येत असल्यामुळें ज्यांच्यापासून हिंदुस्थानच्या ऐतिहासिक कालास सुरुवात झाली असें मानतां येईल त्या शैशुनाग व नंद घराण्यांतील राजांची व्हिन्सेंट स्मिथ यानें आपल्या अखेरच्या ग्रंथांत ग्राह्य म्हणून दिलेली यादी सिंहावलोकनाच्या रूपानें येथे देतों. तथापि या यादींतील राजांचीं नांवें, त्यांचा अनुक्रम व त्यांच्या राज्यारोहणाचीं अजमासानें दिलेलीं वर्षें या सर्वांत पुढें मागें नवीन पुरावा उपलब्ध झाल्यास सुधारणा करावी लागेल असें स्वतः व्हिन्सेंट स्मिथचेंच मत होतें हें येथें सांगून ठेविलें पाहिजे.
अ.क्र. | राजांचीं नांवें (मत्स्य पुराणानुसार) |
राज्यारोहणाचें अजमासें वर्ष ख्रि.पू |
विशेष माहिती. |
शैशुनाग | |||
१ | शिशुनाग | ६४२ |
प्रथम काशीचा राजा होता. यांच्या कारकीर्दीतील कांहीच गोष्टी उल्लेखिलेल्या नाहीत. व्हिन्सेंट स्मिथ या चार कारकीर्दीस ६० वर्षे देतो. |
२ | काकवर्ण | ||
३ | क्षेमधर्मा | ||
४ | क्षेमजित् किंवा क्षत्रौजाः | ||
५ | बिंबिसार उर्फ श्रेणिक | ५८२ | नवीन राजगृह बांधले; अंग देश जिंकला; महावीर व बुद्ध यांचा समकालीन होता. हा जैन होता असें म्हणतात. |
६ | अजातशत्रु उर्फ कूणिक | ५५४ | पाटलिपुत्र हें तटबंदीचें शहर बांधले; वैशाली आणि कोसल येथील राजांचा पराभव केला; बुद्ध व महावीर मरण पावले. |
७ | दर्शक | ५२७ | भासाच्या स्वप्नवासवदत्तेंत उल्लेख आहे. |
८ | उदासी किंवा उदय | ५०३ | शोणवरील पाटलिपुत्राच्या शेजारीं गंगेवर कुसुमपुर नामक नगर वसविलें. |
९ | नंदिवर्धन | ४७० |
यांच्या कारकीर्दीतील कांहींच गोष्ट ठाऊक नाहींत. नांवांवरून दिसतें त्याप्रमाणें हे नंदहि असूं शकतील. (खारवेलचा शिलालेख.) |
१० | महानंदी | ||
नऊ नंद | |||
११ | महापद्म आणि | ४१३ (चंद्रगुप्ता पूर्वी ९१ वर्षे) |
हलक्या जातीचे ब्राह्मणक्षत्रियांविरुद्ध असलेले पाखंडी राजे; चंद्रगुप्त व कौटिल्य यांनीं यांचा नायनाट केला. |
१२ | त्याचे ८ पुत्र, २ पिढ्या | ||
मौर्य | |||
१३ | चंद्रगुप्त | ३२२ (?३२५) | सन जवळ जवळ बरोबर. |
१४ | बिंदुसार अमित्रघात | २९८ | |
१५ | अशोक | २७३ |