प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १२ वें.
अशोक ते अराजक-शकयवनांचा धुमाकूळ.

अशोकाची राजनीति.- कौटिल्याच्या अर्थशास्त्रांत राजाचीं जीं कर्तव्यें सांगितलीं आहेत, त्यांप्रमाणें अशोकानें आपलें आचरण ठेवण्याचा प्रयत्न केला. हिंदू राजे प्रजेची गा-हाणीं स्वतः ऐकून घेऊन त्यांचा निकाल लावून टाकीत असत. अगदीं हलक्यांतल्या हलक्या मनुष्याचीं देखील गा-हाणीं ते स्वतः ऐकून घेण्याची खबरदारी घेत. पुढें अकबर, जहांगीर हे देखील त्याप्रमाणेंच वागत असत. अशोकानें एके ठिकाणीं स्वतःविषयीं पुढें दिल्याप्रमाणें म्हटलें आहे : 'गेलीं अनेक वर्षें सर्वकाळ प्रजेचीं गा-हाणी ऐकून घेणें व प्रजेच्या हितसंबंधांकडे लक्ष देणें या गोष्टी घडल्या नाहींत. पण मीं आतां तशी व्यवस्था केली आहे कीं, जेवतांना, अंतःपुरांत असतांना, खासगी कामांत असतांना अगर कोठेंहि असतांना अधिका-यांनीं आपआपल्या कामासाठीं माझ्याकडे यावें; मी प्रजेचीं कामें पाहण्याला सर्वकाळ सिद्ध आहें. प्रजेला नेहमीं सौख्य होत असावें यासाठीं मी माझ्या प्रयत्‍नांत मुळींच कसूर करणार नाहीं' (शिलाशासनलेख ६).