प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १२ वें.
अशोक ते अराजक-शकयवनांचा धुमाकूळ.

अशोकसमकालीन राजे.- पहिल्या शिलालेखामध्यें अशोकानें कांहीं राजांचा जो उल्लेख केला आहे त्यावरून हें उघड होतें कीं, अशोक हा अँटायोकस थीऑस, इजिप्तचा टॉलेमी फिलाडेलफॉस, सीरीनचा राजा मगस, व एपायरसचा राजा अलेक्झांडर यांचा समकालीन होता. तसेंच अशोकाचें व ग्रीक राजांचें सख्यहि असावें असें दिसतें. कारण, या राजांनीं आपल्या राज्यांत बौद्ध संप्रदायाच्या प्रसाराला आडकाठी केली नाहीं; इतकेंच नव्हे तर अशोकानें तेथें त्या संप्रदायाचा बराच प्रसारहि केला होता. तसेंच या वेळीं चोल व पांड्य ही तामीळ राज्यें अस्तित्वांत असून अशोकाचे दूत ताम्रपर्णी नदीपर्यंत उपदेश करीत आले होते. दुस-या एका शिलालेखांत, केरळपुत्राचा व त्याचप्रमाणें इतर जातींच्या लोकांचाहि उल्लेख आढळून येतो.