प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग


प्रकरण १२ वें.
अशोक ते अराजक-शकयवनांचा धुमाकूळ.

अशोकाच्या नीतिविषयक कल्पना.- अशोकाच्या नीतिविषयक कल्पना काय होत्या, हें दुय्यम शिलाशासनलेखांतील दुस-या लेखांवरून आढळून येतें. यांत असें म्हटलें आहे : ''मातापिता यांच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. जीवांबद्दल आदर असला पाहिजे. सत्य बोललें पाहिजे. धम्माच्या आज्ञानुसार प्रत्येकानें आपलें वर्तन ठेवलें पाहिजे. शिष्यानें गुरूशीं व आप्तांशीं नम्रतेचें वर्तन ठेवलें पाहिजे. यामुळें आयुष्याची व सुखाची वृद्धि होते.''

अशाच प्रकारच्या आज्ञा त्यानें वारंवार दिलेल्या आहेत. याशिवाय भूतदया, नोकरांनां चांगलें वागविणें, दानधर्म व परधर्मसहिष्णूता इत्यादि इतर सदगुणांचेंहि शिक्षण त्यानें दिलें. प्रवाश्यांच्या सोईसाठीं रस्त्यांवर विहिरी व धर्मशाळा बांधविणें व दोन्ही बाजूंनां झाडें लावणें इत्यादी परोपकाराचीं कृत्यें त्यानें केलीं. धर्मार्थ दवाखानेहि त्यानें उघडले होते.

अशोकाच्या शासनेलेखांतील आणखी कांहीं उतारेच दिले असतां त्याची व्यवहारनीति अधिक स्पष्ट होईल. तो म्हणतो :  
'माझ्या राज्यांतील वरिष्ठ अधिका-यांनीं तसेंच प्रांतिक व तालुकानिहाय अधिका-यांनीं दर पांच वर्षांनीं कामाची तपासणी करण्याकरितां व धम्मांचा प्रसार करण्याकरितां सर्व राज्यभर हिंडलें पाहिजे. हा धम्म म्हणजे पित्राज्ञापालन, दान, सदाचार, अहिंसा, भूतदया व मित आहार व विहार हा होय' (शिलाशासनलेख ३). 'धम्मदानासारखे दुसरें दान नाहीं' (शासनलेख ११). 'स्वधर्माविषयीं अभिमान व परधर्माविषयीं तिरस्कार असूं नये' (शासनलेख १).

अशा प्रकारच्या अशोकाच्या नीतिकल्पना त्याच्या शिलालेखांवरून व इतर आधारांवरून दिसून येतात. अशोक हा स्वतः इतर पंथांतील भिक्षूंनां दानें देत असे, तरी तो स्वतः बौद्ध पंथाचा कट्टा भक्त होता. बौद्ध पंथाविषयीं व त्याच्या प्रसाराविषयीं त्याचा अभिमान किती होता हें राजपुतान्यामधील भाब्रू येथील शिलालेखावरून कळून येतें. हा शिलालेख भिक्षूंनां उद्देशून लिहिलेला आहे. त्याचा मथितार्थ येणेंप्रमाणें:-

'भिक्षूंनो, बुद्धाविषयीं व त्याच्या धम्माविषयीं मला किती आदर वाटतो हें तुम्हांला माहीत नाहीं असें नाहीं. बुद्धाच्या सर्व आज्ञा मला वंदनीय वाटतात.' यानंतर भिक्षुभिक्षुणींनां नेहमीं मनन करण्यासाठीं त्यानें बुद्धाचीं वचनें उद्घृत केलेलीं आहेत.