प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १२ वें.
अशोक ते अराजक-शकयवनांचा धुमाकूळ.

अशोककालीन कलाकौशल्य.- अशोकाच्या कारकीर्दींत वाङ्‌मय व कला यांचा अभ्युदय उत्तम रीतीनें झाला. निरनिराळ्या स्तूपांवरून व ब-याच मूर्तीवरून तत्कालीन कारागिरांचें कलानैपुण्य उत्तम त-हेनें निदर्शनास येतें. सारनाथस्तम्भशिरावरील सिंहामध्यें दिसून येणारी कारागिरी इराणी अगर ग्रीक कारागिरीपेक्षां सरस आहे असें सहज दिसतें. मौर्य शिल्पज्ञ फार निष्णात होते याविषयीं शंकाच नाहीं. अशोकाच्या वेळीं बौद्ध भिक्षू हे शिक्षणाचें पवित्र काम करीत असत असें दिसतें. त्यावेळीं शिक्षणाचें प्रमाण समाधानकारक होतें. अशोकाच्या शिलालेखांतील भाषा जोरदार व उत्तम आहे. पुष्कळ ग्रंथहि याच्या कारकीर्दीत झाले असावेत; पण ते ग्रंथ सध्यां उलपब्ध नाहींत.

हिंदुस्थानच्या इतिहासांत अशोक व अकबर यांचीं चरित्रें अत्यंत प्रसिद्ध अशीं होऊन गेलीं याबद्दल वाद नाहीं. या दोघांच्या स्वभावाकडे पाहिल्यास आणल्याला त्यांतील फरक व सादृश्य सहजर दिसून येईल. कलिंगविजयामुळें अशोकाच्या मनास जो पश्चात्ताप झाला त्याच्याकडे पाहून अकबराला हंसूं लोटलें असतें यांत शंका नाहीं. अकबराला इतक्या असंख्य लोकांच्या हानीकडे पाहून केव्हांहि वाईट वाटलें नसतें. अकबर हा फार महत्त्वाकांक्षी राजा होता. अशोकाला खरा विजय धम्माचा प्रसार करण्यांतच वाटत असे;  तरी पण राजाचीं सर्व कर्तव्यें बजावण्यांत तो कधींहि कुचराई करीत नसे. अकबराप्रमाणें अशोकाला वाङ्‌मयाचा व कलाकुसरीचा नाद असे. अशोकाची राज्यव्यवस्थाहि फार उत्कृष्ट दर्जाची होती.

अशोकाच्या मृत्यूसंबंधाची माहिती उपलब्ध नाहीं. तिबेटी दंतकथेवरून असें दिसतें कीं तो तक्षशिलेला वारला. त्याच्या कित्येक मुलांचीं नांवें उपलब्ध आहेत. तीवर नांवाच्या एक मुलाचा एक शिलालेखांत उल्लेख आहे. तसेंच कुणाल व जलौक यांचींहि नांवें इतर ठिकाणीं आलीं आहेत.