प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १२ वें.
अशोक ते अराजक-शकयवनांचा धुमाकूळ.

कलिंग देशावरील स्वारी व तिचे परिणाम.- कलिंग देशाशीं झालेल्या युद्धानंतर (ख्रि. पू. २६१) मात्र अशोकाच्या स्वभावांत फार फरक घडून आला. युद्धामध्यें होणारी प्राणहानि, लोकांचे हाल, मृतांच्या आप्तेष्टांनां होणारें दुःख या सर्वांचा राजाच्या मनावर फार परिणाम झाला. याबद्दल अशोकानें स्वतःच शिलालेखांत असें म्हटलें आहे.

''प्रियदर्शी सम्राटानें राज्यारोहणानंतर आठ वर्षांनीं कलिंग देश जिंकला; व त्या वेळीं त्यानें १,५०,००० लोक धरून नेले, १,००,००० लोक ठार झाले व पुष्कळसे बेपत्ता झाले. पण कलिंग देश राज्याला जोडल्यानंतर मात्र सम्राटानें धम्माचें पालन, त्यावर प्रेम व त्याचा प्रसार करण्यास सुरुवात केली. कलिंगयुद्धाचा सम्राटाच्या मनावर परिणाम होऊन त्याला फार पश्चात्ताप झाला. यापुढें सदरहू युद्धांतील हालअपेष्टांच्या दशांश हालअपेष्टा जरी लोकांस झाल्या तरी सम्राटाच्या मनाला फार वाईट वाटेल. सम्राटाचा कोणीं अपराध केल्यास, सोसणें शक्य असल्यास सम्राट तो सोसण्यास मागें पुढें पहाणार नाहीं. रानटी लोकांवर देखील सम्राटाची कृपा असून त्यांनीं सद्धर्मानें वागावें अशी सम्राटाची इच्छा आहे. सर्व मानव प्राण्यांच्या अंगीं सयमन, मनःशांति व समाधान असावें असें सम्राटास वाटतें.''

या लेखांत अशोक म्हणतो :

'धर्मानें मानवांचीं अंतःकरणें आपल्याकडे आकर्षून घेणे हाच खरा विजय होय.' यापुढें, 'बौद्ध संप्रदायाचा प्रसार ६०० योजनें दूरवर झाला असून दक्षिणेस चोल, पांड्य, योन, कांबोज, भोज इत्यादि ठिकाणींहि या संप्रदायाचा प्रवेश झाला आहे' असें सांगितलेलें आहे; आणि 'जे कोणी हा धम्म ऐकतील त्यांनां तो पसंत पडेल व स्वीकारावासा वाटेल' असें म्हटलें आहे. तसेंच 'या धम्माच्या साहाय्यानें मिळविलेला विजय क्षणभंगुर नसून शाश्वत व पारमार्थिक दृष्ट्या फार उपयुक्त असल्यामुळें सर्वांनीं तो आचरावा' असा उपदेश केलेला आहे.

हाच उपदेश अशोकानें आणखी दोन शिलालेखांमध्यें पुढें चालविला आहे. त्यांपैकीं एक शिलालेख समापा नांवाच्या शहरांतील अधिका-यांनां व दुसरा तोसलीच्या अधिका-यांनां उद्देशून लिहिलेला आहे. उज्जयिनीच्या व तक्षशिलेच्या राजप्रतिनिधींनां देखील या तत्त्वांचा प्रसार करण्याविषयीं व तीं अंमलांत आणण्याचा प्रयत्न करण्याविषयीं त्यानें उपदेश केलेला आहे. 'सर्व प्रजा हीं माझीं लेकरें आहेत' असें तो नेहमीं म्हणत असे. त्यानें रानटी मुलुखांत रहाणा-या लोकांचीं मनें वळविण्यासाठीं चांगले चांगले मतप्रसारक पाठविले. कांहीं अधिकारी अन्यायाचें वर्तन करतात हें पाहून त्याला फार खेद होत असे, व तो वारंवार त्यांनां व्यसनांपासून परावृत्त करण्याचा उपदेश करीत असे.

या शिलालेखांमध्यें केलेल्या उपदेशावरून अशोकाला खरोखर अंतःकरणापासून किती पश्चात्ताप झाला होता हें उत्तम प्रकारें निदर्शनास येतें यांत शंका नाहीं.