प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १२ वें.
अशोक ते अराजक-शकयवनांचा धुमाकूळ.
मौर्य घराण्याच्या वेळची राजयव्यवस्था.- मागें दहाव्या प्रकरणांत बुद्धापासून चंद्रगुप्तापर्यंतच्या काळची सामाजिक परिस्थिति वर्णिलेली आहे त्यावरून तदुत्तर मौर्य घराण्याच्या वेळेच्याहि समाजव्यवस्थेचीं थोडीबहुत कल्पना होऊं शकते. तेव्हां तेथें आतां मौर्यकालीन शासनपद्धतीचेंच फक्त दिग्दर्शन करावयाचें बाकी राहिलें आहे. चंद्रगुप्तानें आपल्या अमदानींत जी राज्यव्यवस्था अंमलांत आणली तीच बहुतेकांशीं त्याच्या मुलाच्या व नातवाच्या कारकीर्दीत कायम राहिली. अशोकाच्या कारकीर्दींत कांहीं नवीन सुधारणा घडून आल्या, पण त्या फार थोड्या होत्या. मगध देशाची राज्यव्यवस्था अर्थशास्त्रांत सांगितलेल्या पद्धतीवर चाललेली होती; आणि चंद्रगुप्ताच्या कारकीर्दींत जरी राज्याचा विस्तार झाला तरी त्यामुळें तींत फारसा फरक पडला नाहीं. राज्यामध्यें निरनिराळीं खातीं असून त्या खात्यांची व्यवस्था निरनिराळ्या अधिका-यांकडून ठेविली जात असे. त्या राज्यव्यवस्थेसंबंधानें जी माहिती मिळते तिजवरून अकबराच्या वेळेपेक्षां या वेळची राज्यव्यवस्था चांगली होती असें दिसतें. अकबराच्या वेळीं न्यायखात्यांतील अधिका-यांखेरीज बाकीचे सर्व अधिकारी लष्करी पेशाचेच असत. अकबराच्या खासगींतील मंडळी सुद्धां शिपाईच समजण्यांत येत. कायम सैन्य फार थोडे होतें, व लढाईचा प्रसंग येई तेव्हां राजाच्या निरनिराळ्या सरदारांच्या हाताखालीं सैन्यें जमा होत. पण अशा प्रकारची पद्धत मौर्यकालीं नव्हती. मौर्यांच्या पदरीं सरकारी सैन असे व तें फार उपयोगीं पडत असे. एकंदर राज्यकारभार बिनलष्करी अधिका-यांच्या ताब्यांत असून तो उत्कृष्ट रीतीनें चालत असे. मध्यवर्ती सत्तेचा प्रांतिक अगर तालुक्यांतील अधिका-यांवर कडक दाब असे. चंद्रगुप्ताच्या पदरीं गुप्त हेरांचें खातें फार चांगल्या त-हेचें असून त्या खात्याची व्यवस्था जर्मन पद्धतीची होती. सारांश मौर्याची राज्यव्यवस्था म्हणजे उत्कृष्ट रीतीनें चाललेली एकतंत्री सत्ता होती.
पा ट लि पु त्र रा ज धा नी.- पाटलिपुत्र हें शोण नदीच्या उत्तर तीरावर ९ मैल पसरलेलें एक मोठें शहर होतें. आतां ह्या जागेवर पाटणा, बांकीपुर इत्यादि शहरें झालीं आहेत. कुसुमपुर नांवाचें फार जुनें शहर पाटलिपुत्रांत अंतर्भूत झालें होतें व त्यामुळें पाटलिपुत्रालाच कुसुमपुर असेंहि म्हणत असत. शोण व गंगा यांच्या संगमामुळें जो जिव्हाकृति जमिनीचा तुकडा बनलेला आहे त्या ठिकाणीं हें पाटलिपुत्र नगर वसलेलें असून अशाच प्रकारची जागा शास्त्रकारांनीं राजधानीला सुरक्षित मानलेली आहे. शहराच्या रक्षणार्थ सभोंवतीं भरीव लांकडी गजांची तटबंदी होती. हिला चौसष्ट दरवाजे व ५७० बुरूज होते. या गजांच्या तटबंदीचें रक्षण बाहेरून शोणनदीच्या पाण्यानें व भरलेल्या खंदकानें होत असे.
रा ज वा डा.- राजवाड्याचें सर्व काम लांकडी होतें. तेथील खांबांवर सोनेरी व रुपेरी चित्रें असत. राजवाड्याचें कलाकौशल्य पर्शियन राजवाड्याच्या धर्तीवरचें होतें. ग्रीक ग्रंथकारांच्या मतें सुसा व एकबटाना येथील राजवाड्यांपेक्षां चंद्रगुप्ताचा राजवाडा फार भव्य होता. दरबार तर फारच थाटाचा भरत असे. सहा सहा फूट रुंद तोंडाचीं सोन्याचीं भांडीं उपयोगांत आणलीं जात असत. सोन्यानें मढविलेल्या पालखींतून अगर अलंकारभूषित हत्तीवरून राजा सार्वजनिक ठिकाणीं येत असे. आशिया व चीन येथील ऐश्वर्याच्या सर्व वस्तू त्याला उपलब्ध होत्या. राजवाड्यामध्यें राजाच्या भोंवतीं सशस्त्र स्त्रियांचा पहारा असे. जनानखान्याची व्यवस्थाहि फार उत्कृष्ट होती.
रा जे लो कां च्या क र म णु की.- त्या वेळेच्या शास्त्रकारांनीं जरी मृगया व द्यूत हीं सदोष मानलेलीं होतीं पण तत्कालीन राजे लोक मृगया करीत असत. शिकारीसाठीं मोठमोठीं अरण्यें राखून ठेवलेलीं असत, व या अरण्यांत कोणी राजाच्या क्रीडेचा भंग केल्यास त्याला देहान्त शिक्षा मिळत असे. कुस्त्या, प्राण्याच्या झुंजा वगैरे करमणुकीचे प्रकारहि प्रचलित होते. रथांच्या शर्यती लागत असत व त्यांच्यासाठीं फार स्पर्धा होत असे.
वे श्या.- नर्तिकांनां त्या वेळीं फार मान असे. वेश्यांनां, घरच्या दासी, माला करणा-या दासी, किंवा पाय चेपणा-या दासी म्हणून नेमीत असत. राजाचा पोषाख ठेवण्याचें आणि सुवासिक तेलें व अत्तरें ठेवण्याचें काम यांच्याचकडे असे. राजाच्या शिरावर छत्र धरण्याचें काम व पंख्यानें वारा घालण्याचें कामहि ह्याच करीत असत. यांच्याकडे हेरांचेंहि काम असे.
इ रा णी व र्च स्व.- पंजाबच्या लगतच इराणी सत्तेखालील भाग असल्या कारणानें इराणी चालीरीतीचें वर्चस्व हिंदुस्थानावर पडलें असावें असें दिसतं. सरहद्दीलगतच्या प्रांतांतून खरोष्ठी लिपीचाच उपयोग करण्यांत येत असे. क्षत्रप ही इराणी पदवी प्रचारांत होती. अशोकाच्या शिलालेखाची पद्धत व कलाकुसरीची पद्धत हीं सर्व इराणी त-हेचींच होतीं. अग्निगृहामध्यें वैद्य व साधू यांचा सल्ला घ्यावा असा जो अर्थशास्त्रामध्यें नियम आहे तो, व तशाच राजाचे केंस धुण्याचा उत्सव इत्यादि चाली इराणी लोकांपासून घेतलेल्या होत्या हें उघड दिसतें. हल्लींच्या शोधांवरून हिंदु धर्मावर व समाजसंस्थांवरहि इराणी वर्चस्व थोडें फार पडलें असावें, किंवा दोहोंसहि सामान्य अशा चाली मगांच्या परिणामाचे अवशेष असावेत असें वाटूं लागलें आहे.