प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १२ वें.
अशोक ते अराजक-शकयवनांचा धुमाकूळ.
बौद्ध संप्रदायाचा प्रसार.- अशोकाच्या चरित्राला मुख्य आधार म्हणजे त्याचे शिलालेखच होत असें वर सांगितलें आहेच. पण त्याशिवाय इतरहि आधार नाहींत असें नाहीं. अशा आधारांपैकीं एक आधार म्हणजे सिलोनमधील महावंश व दीपवंश हे ग्रंथ होत. दुसरा ग्रंथ ख्रिस्तोत्तर चवथ्या शतकांत झाला असला पाहिजे. बौद्ध संप्रदायाच्या प्रसारासंबंधींची जी हकीकत शिलालेखांत दिलेली आहे तिला या ग्रंथांतील गोष्टींवरून बळकटी येते. या दीपवंशांत अशोकानें ९ देशांमध्यें उपदेशकमंडळें पाठविल्याचा उल्लेख आहे. त्यांपैकीं सात हिमालय आणि पेशावरपासून महिषमंडलापर्यंतच्या सात देशांत व उरलेलीं दोन सुवर्णभूमि म्हणजे दक्षिणब्रह्मदेश व लंका या ठिकाणीं पाठविलीं; असें त्यांत म्हटलें आहे. तसेंच या दीपवंशांत उपदेशकांचीं नांवेंहि दिलीं आहेत व त्यांपैकीं कांहीं भेलसा येथील शिलालेखांत आढळतात. दक्षिण ब्रह्मदेशांत मात्र बौद्ध संप्रदायाचा फारसा प्रसार झालेला दिसत नाहीं. या देशांत प्रथमतः महायान पंथाचा प्रवेश झाला व हा पंथ अशोकाच्या पंथाहून निराळा होता (पृ. १५८ पहा).
सिलोनमध्यें मात्र या उपदेशकांनां चांगलेंच यश आले. विशेषतः तेथील राजाकडून आश्रय मिळाल्यामुळें तर या पंथाचा प्रसार फार झपाट्यानें होत चालला. तिस्स राजाच्या इच्छेमुळेंच सिलोनमध्यें हें उपदेशकमंडळ आलें (ख्रि. पू. २५१ किंवा २५०). आपल्या कारकीर्दींत या उपदेशकमंडळानें बौद्ध संप्रदायाच्या प्रसारार्थ पुष्कळ श्रम केले व मोठमोठे विहार बांधले. येथील मुख्य धर्मोपदेशक अशोकाचा कनिष्ठ बंधु महेन्द्र हा होता. हा सिलोनमध्यें ख्रि. पू. २०४ सालीं मेला. या धर्मोपदेशाच्या कामांत महेन्द्राच्या बहिणीनें म्हणजे संघमित्रेनें फार मदत केली. मतप्रसाराच्या कामीं महेंद्रानें जितकें पुरुषांत तितकेंच संघमित्रेनें स्त्रियांत यश मिळविलें.
बौद्ध संप्रदायाच्या प्रसारास सिलोनमध्यें तिस्स राजाच्या कारकीर्दींत फार यश आलें, व याच संप्रदायाचा पगडा अद्यापीहि तेथे बसलेला आहे. याबद्दल सांडर्स यानें असें म्हटलें आहे.
'अशोकाचा संप्रदायप्रसार जगांतील सुधारणेच्या इतिहासांत एक महत्त्वाचा भाग होऊन बसलेला आहे. त्याचे उपदेशक रानटी व असंस्कृत प्रदेशांत गेले व तेथील लोकांनां हा संप्रदाय केवळ अमृततुल्य झाला. सिलोन, ब्रह्मदेश, सयाम, जपान व तिबेट यांच्या इतिहासास या संप्रदायस्वीकारापासूनच सुरुवात झाली असें म्हटलें असतां चालेल. या सर्व देशांमध्यें हा संप्रदाय लवकर प्रसृत झाला. सुधारलेल्या चीन देशांत मात्र याचा व्हावा तसा प्रसार झाला नाहीं.
'पण बौद्ध भिक्षूंनीं आपल्याबरोबर धर्माखेरीज इतर संस्कृतीहि नेली. महेन्द्रानें आपल्याबरोबर सिलोनमध्यें खोदकामाची व पाटबंधा-याची कला आणली. या महेन्द्राच्या दीर्घ प्रयत्नानेंच बौद्ध संप्रदाय चिरस्थायी झाला असून अद्यापीहि सिलोनमध्यें प्रचंड दागवा व अनेक बुद्धभिक्षूंचे विहार आपल्याला आढळून येतात.'
अनुराधपूर नगर हें बौद्ध संप्रदायाचें 'रोमच' असून अशोकाच्या कारकीर्दीचा जगावर काय परिणाम झाला याचें तें निदर्शक होय. आज तेथील अनेक अवशेष पाहून त्या शहराच्या प्राचीन वैभवाची कोणासहि कल्पना येईल.
कांहीं यूरोपीय विद्वानांनीं या सिलोनी दंतकथेवरच केवळ विश्वास ठेवून सिलोनमध्यें संप्रदायप्रसार करण्याचें श्रेरु अशोकाला नसून पाटलिपुत्र येथील धर्मसंगीति भरविणा-या तिष्याला आहे असें प्रतिपादन केलें आहे. अशोकाच्या शिलालेखांत या संगीतीचा उल्लेख नाहीं. या गोष्टीचें स्पष्टीकरण अशोकानें ती आपल्या कारकीर्दीच्या शेवटीं शेवटीं भरविली असावी असें व्हिन्सेंट स्मिथ करतो.
उत्तर हिंदुस्थानांतील दंतकथेवरून उपगुप्त हा अशोकाचा गुरु होता असें दिसतें. याच्या नांवाचा विहार मथुरेमध्यें सातव्या शतकांत उपलब्ध होता. सिलोनी दंतकथेंत मोग्गलिपुत्र तिष्य याच्या संबंधानें उपगुप्तासंबंधीं प्रसिद्ध असलेल्या गोष्टीच सांगितल्या आहेत. उपगुप्त व मोग्गलिपुत्र तिष्य हे दोघे एकच असावेत हें आतां जवळ जवळ निश्चित झालेलें आहे.
या उपगुप्तानें अशोकास सांगून निरनिराळ्या देशांत संप्रदायप्रसारक उपदेशक पाठविले. ख्रि. पू. २४९ सालीं उपगुप्तानें अशोकाला तीर्थयात्रेला नेलें. प्रथमतः त्यानें अशोकाला लुंबिनीवनास नेलें. तेथें जो स्तम्भ आहे, त्यावरील लेखावरून अशोक तेथें आला होता असें दिसतें. अशोकानें या वेळीं मृगया वगैरे सर्व सोडून दिली असावी; तसेंच प्राण्याची भक्षार्थ हिंसाहि त्यानें वर्ज केली असावी असें दिसतें. अशोकानें तात्पुरता कां होईना भिक्षुवेष पतकरला असावा. इत्सिंगानें भिक्षुवेषांतील अशोकाचा पुतळा पाहिल्याचे वर्णन केले आहे.
अशोकानें आपल्या कारकीर्दीत संप्रदायप्रसारार्थ, धम्मोपदेशार्थ आणि प्रजाहितार्थ ज्या ज्या कांहीं गोष्टी केल्या होत्या त्या सर्व स्तंभांवर कोरून ठेवण्यास ख्रि. पू. २४२ सालीं सुरुवात केली. यांनां सात स्तम्भलेख अशी संज्ञा आहे. यांपैकीं पांचव्या स्तम्भलेखांत त्यानें आपले अहिंसेवरील विचार प्रकट केले आहेत. बैलांनां खच्ची करण्याचा प्रकार त्याला बिलकुल पसंत नव्हता; व त्यानें जीवाच्या रक्षणार्थ पुष्कळ नियम सांगितले आहेत. अशोकाच्या अवध्य पशूंच्या यादींत सशृंग जनावरांची गणना नाहीं; पण कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्यें गाई, बैल हीं देखील अवध्य मानलेलीं आहेत. तथापि एकंदरींत अर्थशास्त्रांतील हिंसेवरील नियम व अशोकाच्या पांचव्या स्तम्भलेखांतील आज्ञा ह्या बहुतेकांशीं जुळतात.
हे सात स्तम्भलेख कोरविणें हीच जिचा आपणांस काळ ठरवितां येतो अशी अशोकाची शेवटची कामगिरी होय. ख्रि. पू. २४० च्या सुमारास पाटलिपुत्र येथें नास्तिक लोकांच्या मतखंडनार्थ जी धर्मसभा भरली होती तींत ठरलेले नियमच त्यानंतर कोरविल्या गेलेल्या दुय्यम स्तम्भलेखांत अंतर्भूत केले गेले असतील. वृद्धापकाळीं अशोक हा बौद्ध संप्रदायाचा फार अंधभक्त बनला होता. त्यानें भिक्षूंकरितां व विहारांच्या कार्यार्थ अगणित व थोडासा फाजील खर्च केला असें कांहींचें म्हणणें आहे. शिलालेखांवरून अशोक हा अखेरपर्यंत कडक शास्ता होता असें दिसतें. मरणापूर्वीं त्यानें राज्यत्याग केला होता असेंहि म्हणतात; पण त्यासंबंधानें निश्चित मत कांहींच देतां येत नाहीं.