प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १२ वें.
अशोक ते अराजक-शकयवनांचा धुमाकूळ.
शकांचा जगास उपद्रव. - हूण लोकांप्रमाणेंच शकांचाहि इतिहास आशिया व यूरोप या दोन्ही भूभागांस जाणवला आहे. तथापि त्यांचा इतिहास सुसंगतपणे आज लिहितां येत नाही. ते जरी पुष्कळदां मार देणारे होते तरी त्यांनीँ आपला इतिहास लिहून ठेवलेला नाहीं. त्यांचे मार खाणा-यांनी जे कांही उल्लेख केले आहेत त्यांवरूनच यांच्या इतिहासाची कल्पना करावयाची असल्यामुळें केवळ माहितीचे तुकडे जोडण्यापलीकडे येथें अधिक कांहीं करतां येत नाहीं. शकांविषयीं माहिती आपणांस दोन बाजूंनीं मिळते. हिरोडोटस आदिकरून ग्रीक ग्रंथकारांनीं त्यांच्याविषयीं लिहून ठेवलेलें आहे, व शिवाय चिनी ग्रंथांतूनहि त्यांच्यासंबंधीं माहिती उपलब्ध आहे. यांपैकीं प्रथम आपण पहिल्या साधनापासून मिळणा-या माहितीकडे वळूं.