प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १२ वें.
अशोक ते अराजक-शकयवनांचा धुमाकूळ.

शुंग घराणें (ख्रि. पू. १८५-७३).-  बृहद्रथ मौर्य या राजाला मारून त्याचा सेनापति पुष्पमित्र यानें सिंहासन बळकावलें व आकुंचित झालेल्या मौर्याच्या राज्यावर अंमल सुरू केला. पुष्यमित्र हा शुंग घराण्याचा पहिला राजा होय. याची राजधानी पाटलीपुत्र येथेच होती. याच्या कारकीर्दीत ख्रि. पू. १७५ च्या सुमारास युकाटिडीझ या बॅक्ट्रियन राजाचा नातलग, आणि काबूल व पंजाब प्रांतांचा राजा मिनँडर यानें अलेक्झांडरप्रमाणेंच मोठ्या सैन्यानिशी हिंदुस्थानावर स्वारी केली. त्यानें सिंध प्रांत, (काठेवाड) व पश्चिम किना-यावरचे कांही भाग जिंकले, मथुरा शहर घेतलें, व खुद्द पाटलिपुत्र राजधानीवर चाल करण्याचा बेत केला. परंतु जवकरच त्याच्याशीं मोठा सामना होऊन या ग्रीक राजाला हिंदुस्थानांतून बाहेर हांकून लावण्यांत आले. यूरोपीय सेनानायकानें जमिनीवरून स्वारी करून हिंदुस्थान जिंकून घेण्याचा केलेला हा दुसरा व शेवटचाच प्रयत्न होय. यानंतर इ. स.१५०२ मध्यें वास्को दि गामा जलमार्गानें हिंदुस्थानांतील कालिकत बंदरावर हल्ला करीपर्यंत मध्यंतरीं कोणीहि यूरोपीय सेनानीनें हिंदुस्थानावर स्वारी केली नाहीं.

पुष्यमित्राचा मुलगा अग्निमित्र, व नातू वसुमित्र हे दोघेहि चांगले पराक्रमी होते. अग्निमित्रानें विदर्भ (व-हाड) देशच्या राजाचा पराभव केला. या एकंदर विजयानंतर पुष्यमित्रानें सार्वभौमत्वाची खूण म्हणून प्राचीन परंपरेप्रमाणें अश्वमेध यज्ञ करण्याचें ठरवून एक अश्व वसुमित्राच्या संरक्षणाखालीं सोडला. सिंध प्रांतांत यवनांचा व इतर कित्येक प्रांतांतील राजांचा पराभव करून व अजिंक्य ठरून वसुमित्र परत आल्यावर पुष्यमित्रानें अनेकांनां निमंत्रणानें बोलावून यज्ञसमारंभ सिद्धीस नेला. या यज्ञसमारंभाला प्रसिद्ध व्याकरणकार पतंजजि हजर होता असें त्याच्या ग्रंथांतील एतद्विषयक उल्लेखावरून वाटतें. अहिंसाप्रतिपादक बुद्धमताविरूद्ध सुरू झालेल्या ब्राह्मणधर्मपुनरुज्जीवनाच्या चळवळीचा सदरहू अश्वमेध यज्ञ हा चांगला निदर्शक आहे. शिवाय बौद्ध ग्रंथांवरून असें दिसतें की, पुष्यमित्रानें बौद्धपंथीयांचा क्रूरपणानें प्रत्यक्ष छळहि केला होता. त्यानें मगधापासून पंजाबांतील जालंधरपर्यंत बौद्ध मठ जाळले व बौद्ध भिक्षंनां ठार मारलें. तेव्हां कित्येक भिक्षू परराज्यांत पळून गेले. बौद्ध ग्रंथांतील सदरहू वर्णन अतिशयोक्तीचें असेल, परंतु ही छळाचीगोष्ट निखालस खोटी असेल असें म्हणतां येत नाहीं. जैन व बौद्ध सांप्रदायिकांचा छळ केल्याची दुसरीहि उदाहरणें आहेत. हिंदुधर्माभिमानी राजांनीं क्रोधानें असा छळ केला असल्यास त्यांत नवल नाहीं असेंहि स्मिथ म्हणतो; कारण जैन व बौद्ध मतांच्या अशोक वगैरे राजांनीं त्या पंथांतील तत्त्वें अमलांत आणण्याकरितां निर्दयपणानें लोकांवर सक्ति केली होती. तथापि पाश्चात्त्य ग्रंथकारांस आश्चर्य वाटतें तें याचे कीं, एका दृष्टीनें पाहतां भरतखंडांत उभयपक्षी छळाची उदाहरणें फार क्वचित् असून निरनिराळ्या संप्रादायांचे लोक बहुतेक सर्वत्र गुण्यागोविंदानें एकत्र नांदत असत; व सरकारदरबारींहि सांप्रदायिक भेदभाव आड न येतां ते अनुग्रह पावत असत.

मिनँडर परत गेल्यावर पुष्यमित्र (ख्रि. पू. १८५-१४९) सुमारें पंचवीस वर्षांनी मरण पावला, व युवराज अग्निमित्र राज्यावर बसला. परंतु ही कारकीर्द लवकरच आटोपून उपर्युक्त वसुमित्राचा भाऊ वसुज्येष्ठ हा राज्यावर आला. यापुढील चार कारकीर्दी फार अल्प कालांत म्हणजे अवघ्या सतरा वर्षांच्या अवधीत संपल्या. यावरून त्या काळांत ब-याच धामधुमी व राजवाड्यांत ब-याच क्रांतिकारक गोष्टी घडल्या असाव्या. याला पुरावा पुढील हकीकतींत मिळतो. एक गोष्ट अशी सांगतात कीं, अग्निमित्राचा एक मुलगा सुमित्र नाट्यप्रयोगाचा विशेष शोकी होता. तो एकदां आपल्या नटमित्रांमध्यें मिसळलेला असतांना मित्रदेव नांवाच्या इसमानें त्याला ठार मारलें. या शुंग घराण्याचा नववा राजा भागवत यानें बत्तीस वर्षें म्हणजे बराच दीर्घ काल राज्य केलें, तथापि त्याच्यासंबंधीं मुळींच माहिती उपलब्ध नाहीं. दहावा राजा देवभूमि हा दुर्व्यसनी होता. तो कांहीं निंद्य गोष्टींत पडला असतांना मारला गेला. याप्रमाणें हे शुंग घराणें एकशें बारा वर्षें राज्य करून लयास गेलें.