प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १२ वें.
अशोक ते अराजक-शकयवनांचा धुमाकूळ.
कुशान अथवा इंडो-सीथियन घराणें (इ .स. ४८-२२५).- वर उल्लेखिलेल्या रानटी जातींच्या स्वा-यांचा हिंदुस्थानच्या राजकीय परिस्थितीवर बराच परिणाम झाला असल्यामुळें त्यांची जरा विस्तृत माहिती दिली पाहिजे. पूर्वीं सांगितलें आहे की, ख्रि .पू. १७५ (स्मिथच्या मतें ख्रि. पू. १६५) च्या सुमारास चीनच्या वायव्य प्रदेशांतील युएचि नांवाच्या जातीला भटक्या तुर्कांच्या हिउंग्नु नांवाच्या टोळीनें हांकून लावल्यामुळें युएचि लोकांचा पांच ते दहा लाखाचा जमाव पश्चिमेकडे चांगलीं तृणयुक्त कुरणें शोधीत निघाला. त्यांनां प्रथम वुसुन लोक भेटले, व त्यांचा त्यांनीं पराभव केला. नंतर या युएचींनीं शकांचा जक्झार्टीझ (सिर दर्या) नदीच्या उत्तरेकडील प्रदेशांत पराभव केला. तेव्हां पराभूत झालेले शक लोक उत्तरेकडील घांटांनीं हिंदुस्थानांत शिरले. तिकडे युएचि लोकांचा पूर्वीच्या पराभूत झालेल्या वु-सुन जातीच्या लोकांनीं उलट पराभव करून त्यांनां ऑक्झस नदीच्या प्रदेशांत हांकून दिलें. तेथें ऑक्झस नदीच्या दक्षिणेस बॅक्ट्रिया देशांत कायम वस्ती करून त्यांनीं आपली पांच राज्यें स्थापलीं. ख्रि. पू. १० च्या सुमारास त्यांनां चांगलें व्यवस्थित स्वरूप आलें होतें.
प हि ला क ड फि से स (४०-७८).- ही पांच राज्यें स्थापन झाल्यावर सुमारें शंभर वर्षांनंतर युएचि जातींपैकीं कुशान नांवाच्या लोकांचा पहिला कडफिसेस हा इ. स. ४० च्या सुमारास राजा झाला. लोकसंख्या जास्त वाढल्यामुळें या कुशानांच्या राजानें हिंदूकुश पर्वत ओलांडून हिंदुस्थानच्या सरहद्दीवरील किपिन (? काश्मीर ? काफिरिस्तान ? गंधार) व काबूल प्रांत जिंकून घेतला, बॅक्ट्रियावर आपला नीट अंमल बसविला आणि पार्थियन लोकांवरहि हल्ला केला. अशा रीतीनें त्याचें साम्राज्य इराणपासून सिंधु किंवा तिच्या पलीकडे झेलम नदीपर्यंत पसरलें. अफगाणिस्थानांतील डोंगराळ मुलूख जिंकून घेण्यास त्याला बरींच वर्षें लागलीं असावींत. पण इ .स. ४८ च्या सुमारास काबूल प्रांत जिंकण्याचें त्याचें काम झाले होतें असें म्हणण्यास हरकत नाही. याप्रमाणें युएचि जातीच्या लोकांनीं सिंधु नदीच्या पलीकडे पसरलेलीं इंडो-ग्रीक व इंडो-पार्थियन राज्यें जिंकून घेतलीं. पंजाबमध्यें उरलेली इंडो-पार्थियन राजांची सत्ता पुढें कनिष्कानें पूर्ण नष्ट करून टाकली.
दु स रा क ड फि से स (७८-११०).- युएचि जातीचा राजा पहिला कडफिसेस हा ८० वर्षांचा होऊन मरण पावला व नंतर इ .स. ७८ मध्यें किंवा त्या सुमारास त्याचा मुलगा दुसरा कडफिसेस राज्यावर आला. तोहि मोठा पराक्रमी व धाडसी होता. त्यानें पंजाब प्रांत व काशीपर्यंत गंगानदीच्या कांठचा प्रदेश जिंकला असें मानण्यास आधार आहे. त्याचा बहुधा दक्षिणेस नर्मदा नदीपर्यंत अंमल बसला असावा, आणि माळव्यांतील व पश्चिम हिंदुस्थानांतील शक क्षत्रप त्याचें प्रभुत्व मान्य करीत असावे. सिंधकडील प्रांतांत पार्थियन राजांचा अंमल अद्याप चालू होता. युएचि राजानें जिंकलेल्या मुलुखावर लष्करी राजप्रतिनिधी अंमल चालवीत असत असें त्या वेळच्या सांपडलेल्या अनेक नाण्यांवरून दिसतें.
ची न शीं सं बं ध.- युएचि लोक ऑक्झसच्या उत्तरेस सॉग्डिएना येथें असतां त्यांच्या दरबारीं ख्रि .पू. १२५ ते ११५ च्या दरम्यान चीनच्या राजानें वकील पाठविले होते, व पुढें एक शतक या दोघांमध्यें वकीलांमार्फत संबंध चालू होता. परंतु इ. स. २३ च्या सुमारास पहिल्या हान घराण्याच्या अंतकाळीं चीनची पश्चिमेकडील देशांवरची सत्ता पूर्ण नष्ट झाली. तथापि पुढें आणखी ५० वर्षांनीं इ. स. ७३-१०२ च्या दरम्यान चिनी सेनापति पान-चौ यानें या पश्चिमेकडील देशांवर स्वारी करून सारखे जय मिळविले, व चिनी सत्ता रोमन साम्राज्याच्या हद्दीपर्यंत नेऊन भिडविली. खोतानचा राजा, काश्गारचा राजा वगैरे अनेकांनीं चीनचें सार्वभौमत्व कबूल केले. या चिनी विजयांमुळें तत्कालीन कुशान राजा दुसरा कडफिसेस (कनिष्काचा राज्यारोहण काल इ .स. १२० धरून) याच्यावर एक मोठें संकटच आलें. पण तो चीनचें वर्चस्व कबूल करण्यास तयार नव्हता. आपला समान दर्जा प्रस्थापित करण्याकरितां त्यानें चिनी सेनापति पानचौ याच्याजवळ चिनी राजकन्येबद्दल मागणी घातली (इ .स. ९०) पण चिनी सेनापतीनें त्या अपमानाबद्दल कडफिसेसच्या वकीलास कैदेंत टाकल, तेव्हां कडफिसेस यानें आपला राजप्रतिनिधि सी याच्या हाताखालीं ७० हजार घोडदळ देऊन चिनी सैन्याबरोबर लढाई केली. या लढाईंत कडफिसेसच्या सैन्याचा पराभव झाल्यामुळें त्याला चीनच्या राजास खंडणी देणें भाग पडलें. असो.
दुसरा कडफिसेस यानें उत्तर हिंदुस्थानच्या ब-याच भागावर आपला अंमल बसविला होता. युएचि लोकांच्या सत्तेमुळें रोमन साम्राज्य व हिंदुस्थान याच्यामध्यें खुशकीच्या मार्गानें मोठा व्यापार सुरू झाला. हिंदुस्थाननें पाठविलेलें रेशमी कापड, मसाल्याचे जिन्नस, मौल्यवान रत्नें आणि रंग तयार करावयाचे पदार्थ या जिनसांबद्दल रोमन साम्राज्यांतून हिंदुस्थानांत पुष्कळ सोनें येऊं लागलें. त्याचा फायदा घेऊन रोमन ऑरीसारखीं पण पौरस्त्य पद्धतीवर सोन्याचीं पुष्कळ नाणीं दुस-या कडफिसेसनें पाडलीं. दक्षिण हिंदुस्थानचाहि रोमन साम्राज्याबरोबर जलमार्गानें बराच व्यापार चालू असे.
क नि ष्का च्या का ला सं बं धीं अ नि श्चि त ता.- दुस-या कडफिसेसनें इ.स. ७८ ते ११० पर्यंत सुमारें ३३ वर्षें यशस्वी रीतीनें राज्य केल्यावर कनिष्क राज्यावर आला. कनिष्क हा दुस-या कडफिसेसचा मुलगा नव्हता. त्याच्या बापाचें नांव वझेष्क असें असून कनिष्काचें राज्यारोहण व दुस-या कडफिसेसचा मृत्यु यांच्या दरम्यान बराच काळ लोटलेला दिसतो. एकंदर कुशान राजांपैकीं कनिष्काचें नांव हिंदुस्थानाच्या बाहेरहि फार प्रसिद्ध आहे; तथापि त्याच्याबद्दल विश्वसनीय अशी ऐतिहासिक माहिती मात्र थोडी आहे. विश्वसनीय अशा चिनी इतिहासकारांच्या ग्रंथांतहि त्याच्याबद्दल उल्लेख आढळत नाहीं. कनिष्क व त्याच्या पाठोपाठचे कांही राजे यांच्या संबंधाचे उल्लेख असलेले कोरीव लेख पुष्कळ आहेत. त्यांपैकीं विसाहून अधिकांत कालदर्शक आंकडेहि दिले आहेत; परंतु ते घोटाळ्याचे असल्यामुळें त्यांची बरोबर संगति लागत नाहीं, व कांही विद्वान् संशोधक कनिष्काचें राज्यारोहण ख्रि. पू. ५८ मध्यें झालें असें म्हणणारे आढळतात हें मागें सांगितलेंच आहे. नाण्यादि पुराव्यावरून स्वतः व्हिन्सेंट स्मिथचेंच एके काळीं कनिष्काच्या कारकीर्दीचा आरंभ इ.स. ७८ मध्येंच झाला असें नक्की मत होतें. परंतु १९२० मध्यें त्यानें हिंदुस्थानच्या इतिहासावर जें पुस्तक प्रसिद्ध केलें त्यांत त्याचा राज्यारोहणाचा काल कदाचित सुमारें ४० वर्षे नंतरहि असूं शकेल अशी जबर शंका प्रदर्शित केली आहे. तथापि कनिष्क हा युएचि राष्ट्रजातींतील कुशन नांवाच्या लोकांपैकी असून तो दुस-या कडफिसेस नंतर गादीवर आला हें आतां निःसंशय ठरलें आहे.
क नि ष्क (इ .स. १२०-१६२).- ह्युएनत्संगनें असें लिहून ठेविलें आहे कीं, 'जेवहां कनिष्क गंधार' येथे राज्य करीत होता तेव्हां त्याची अधिसत्ता आसपासच्या राज्यावर होती व दूरदूरच्या प्रदेशावरहि त्याचें वर्चस्व होते.’ त्याची नाणीं काबूलपासून गंगेच्या कांठच्या गाझीपूर पर्यंत दुस-या कडफिसेस राजाच्या नाण्याबरोबर सांपडतात. ही नाणीं विपुल व अनेक प्रकारची सापडत असल्यामुळें त्याची कारकीर्द बरीच मोठी होती असें दिसतें. सिंधपैकी वरचा भाग त्याच्या अंमलाखालीं होता, आणि सिंधुनदीच्या मुखापर्यंतचीं उरली सुरलीं पार्थियन राज्येंहि त्यानें नाहींशीं करून टाकिलीं होतीं. कनिष्काच्या-किंवा या प्रकरणांत स्वीकारलेल्या व्हिन्सेंट स्मिथच्या सनावलीप्रमाणें दुस-या कडफिसेसच्या-कारकीर्दीत हिंदुस्थानचा रोमशीं जो संबंध आला तो मागे पृ. १११ मध्यें वर्णिलेलाच आहे. कनिष्कानें आपल्या कारकीर्दीच्या आरंभासच काश्मीर जिंकून तेथें अनेक स्मारकें उभारलीं, व आपल्या नांवाचें एक शहरहि वसविलें. हें शहर अद्याप लहान गांवाच्या स्वरूपांत अस्तित्वांत आहे. त्यानें हिंदुस्थानाच्या आणखी अन्तर्भागांत शिरून प्राचीन बादशहाची राजधानी जें पाटलिपुत्र तेथील राजावर हल्ला केला, व तेथला अश्वघोष नांवाचा एक बौद्ध साधु आपल्याबरोबर नेला. याबद्दलच्या ज्या अनेक कथा प्रचलित आहेत त्यांवरून निदान एवढें तरी निश्चित ठरतें कीं, कनिष्क आणि अश्वघोष हे समकालीन होते. इंडो-सिथियन अथवा कुशान घराण्याची सत्ता कनिष्काच्या कारकीर्दीत पश्चिम हिंदुस्थानावर आणि उज्जयिनी व महाराष्ट्र या भागांवरहि होती. कारण, महाराष्ट्राचा क्षत्रप क्षहरात नहपान आणि उज्जयिनीचा क्षत्रप चष्टन हे बहुधा शक असावे. हे कुशान राजांचे मांडलिक होते व ते कनिष्काचेहि असले पाहिजेत.