प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १२ वें.
अशोक ते अराजक-शकयवनांचा धुमाकूळ.

कुशान अथवा इंडो-सीथियन घराणें (इ .स. ४८-२२५).- वर उल्लेखिलेल्या रानटी जातींच्या स्वा-यांचा हिंदुस्थानच्या राजकीय परिस्थितीवर बराच परिणाम झाला असल्यामुळें त्यांची जरा विस्तृत माहिती दिली पाहिजे. पूर्वीं सांगितलें आहे की, ख्रि .पू. १७५ (स्मिथच्या मतें ख्रि. पू. १६५) च्या सुमारास चीनच्या वायव्य प्रदेशांतील युएचि नांवाच्या जातीला भटक्या तुर्कांच्या हिउंग्नु नांवाच्या टोळीनें हांकून लावल्यामुळें युएचि लोकांचा पांच ते दहा लाखाचा जमाव पश्चिमेकडे चांगलीं तृणयुक्त कुरणें शोधीत निघाला. त्यांनां प्रथम वुसुन लोक भेटले, व त्यांचा त्यांनीं पराभव केला. नंतर या युएचींनीं शकांचा जक्झार्टीझ (सिर दर्या) नदीच्या उत्तरेकडील प्रदेशांत पराभव केला. तेव्हां पराभूत झालेले शक लोक उत्तरेकडील घांटांनीं हिंदुस्थानांत शिरले. तिकडे युएचि लोकांचा पूर्वीच्या पराभूत झालेल्या वु-सुन जातीच्या लोकांनीं उलट पराभव करून त्यांनां ऑक्झस नदीच्या प्रदेशांत हांकून दिलें. तेथें ऑक्झस नदीच्या दक्षिणेस बॅक्ट्रिया देशांत कायम वस्ती करून त्यांनीं आपली पांच राज्यें स्थापलीं. ख्रि. पू. १० च्या सुमारास त्यांनां चांगलें व्यवस्थित स्वरूप आलें होतें.

प हि ला क ड फि से स (४०-७८).- ही पांच राज्यें स्थापन झाल्यावर सुमारें शंभर वर्षांनंतर युएचि जातींपैकीं कुशान नांवाच्या लोकांचा पहिला कडफिसेस हा इ. स. ४० च्या सुमारास राजा झाला. लोकसंख्या जास्त वाढल्यामुळें या कुशानांच्या राजानें हिंदूकुश पर्वत ओलांडून हिंदुस्थानच्या सरहद्दीवरील किपिन (? काश्मीर ? काफिरिस्तान ? गंधार) व काबूल प्रांत जिंकून घेतला, बॅक्ट्रियावर आपला नीट अंमल बसविला आणि पार्थियन लोकांवरहि हल्ला केला. अशा रीतीनें त्याचें साम्राज्य इराणपासून सिंधु किंवा तिच्या पलीकडे झेलम नदीपर्यंत पसरलें. अफगाणिस्थानांतील डोंगराळ मुलूख जिंकून घेण्यास त्याला बरींच वर्षें लागलीं असावींत. पण इ .स. ४८ च्या सुमारास काबूल प्रांत जिंकण्याचें त्याचें काम झाले होतें असें म्हणण्यास हरकत नाही. याप्रमाणें युएचि जातीच्या लोकांनीं सिंधु नदीच्या पलीकडे पसरलेलीं इंडो-ग्रीक व इंडो-पार्थियन राज्यें जिंकून घेतलीं. पंजाबमध्यें उरलेली इंडो-पार्थियन राजांची सत्ता पुढें कनिष्कानें पूर्ण नष्ट करून टाकली.

दु स रा क ड फि से स (७८-११०).- युएचि जातीचा राजा पहिला कडफिसेस हा ८० वर्षांचा होऊन मरण पावला व नंतर इ .स. ७८ मध्यें किंवा त्या सुमारास त्याचा मुलगा दुसरा कडफिसेस राज्यावर आला. तोहि मोठा पराक्रमी व धाडसी होता. त्यानें पंजाब प्रांत व काशीपर्यंत गंगानदीच्या कांठचा प्रदेश जिंकला असें मानण्यास आधार आहे. त्याचा बहुधा दक्षिणेस नर्मदा नदीपर्यंत अंमल बसला असावा, आणि माळव्यांतील व पश्चिम हिंदुस्थानांतील शक क्षत्रप त्याचें प्रभुत्व मान्य करीत असावे. सिंधकडील प्रांतांत पार्थियन राजांचा अंमल अद्याप चालू होता. युएचि राजानें जिंकलेल्या मुलुखावर लष्करी राजप्रतिनिधी अंमल चालवीत असत असें त्या वेळच्या सांपडलेल्या अनेक नाण्यांवरून दिसतें.

ची न शीं सं बं ध.- युएचि लोक ऑक्झसच्या उत्तरेस सॉग्डिएना येथें असतां त्यांच्या दरबारीं ख्रि .पू. १२५ ते ११५ च्या दरम्यान चीनच्या राजानें वकील पाठविले होते, व पुढें एक शतक या दोघांमध्यें वकीलांमार्फत संबंध चालू होता. परंतु इ. स. २३ च्या सुमारास पहिल्या हान घराण्याच्या अंतकाळीं चीनची पश्चिमेकडील देशांवरची सत्ता पूर्ण नष्ट झाली. तथापि पुढें आणखी ५० वर्षांनीं इ. स. ७३-१०२ च्या दरम्यान चिनी सेनापति पान-चौ यानें या पश्चिमेकडील देशांवर स्वारी करून सारखे जय मिळविले, व चिनी सत्ता रोमन साम्राज्याच्या हद्दीपर्यंत नेऊन भिडविली. खोतानचा राजा, काश्गारचा राजा वगैरे अनेकांनीं चीनचें सार्वभौमत्व कबूल केले. या चिनी विजयांमुळें तत्कालीन कुशान राजा दुसरा कडफिसेस (कनिष्काचा राज्यारोहण काल इ .स. १२० धरून) याच्यावर एक मोठें संकटच आलें. पण तो चीनचें वर्चस्व कबूल करण्यास तयार नव्हता. आपला समान दर्जा प्रस्थापित करण्याकरितां त्यानें चिनी सेनापति पानचौ याच्याजवळ चिनी राजकन्येबद्दल मागणी घातली (इ .स. ९०) पण चिनी सेनापतीनें त्या अपमानाबद्दल कडफिसेसच्या वकीलास कैदेंत टाकल, तेव्हां कडफिसेस यानें आपला राजप्रतिनिधि सी याच्या हाताखालीं ७० हजार घोडदळ देऊन चिनी सैन्याबरोबर लढाई केली. या लढाईंत कडफिसेसच्या सैन्याचा पराभव झाल्यामुळें त्याला चीनच्या राजास खंडणी देणें भाग पडलें. असो.

दुसरा कडफिसेस यानें उत्तर हिंदुस्थानच्या ब-याच भागावर आपला अंमल बसविला होता. युएचि लोकांच्या सत्तेमुळें रोमन साम्राज्य व हिंदुस्थान याच्यामध्यें खुशकीच्या मार्गानें मोठा व्यापार सुरू झाला. हिंदुस्थाननें पाठविलेलें रेशमी कापड, मसाल्याचे जिन्नस, मौल्यवान रत्नें आणि रंग तयार करावयाचे पदार्थ या जिनसांबद्दल रोमन साम्राज्यांतून हिंदुस्थानांत पुष्कळ सोनें येऊं लागलें. त्याचा फायदा घेऊन रोमन ऑरीसारखीं पण पौरस्त्य पद्धतीवर सोन्याचीं पुष्कळ नाणीं दुस-या कडफिसेसनें पाडलीं. दक्षिण हिंदुस्थानचाहि रोमन साम्राज्याबरोबर जलमार्गानें बराच व्यापार चालू असे.

क नि ष्का च्या का ला सं बं धीं अ नि श्चि त ता.- दुस-या कडफिसेसनें इ.स. ७८ ते ११० पर्यंत सुमारें ३३ वर्षें यशस्वी रीतीनें राज्य केल्यावर कनिष्क राज्यावर आला. कनिष्क हा दुस-या कडफिसेसचा मुलगा नव्हता. त्याच्या बापाचें नांव वझेष्क असें असून कनिष्काचें राज्यारोहण व दुस-या कडफिसेसचा मृत्यु यांच्या दरम्यान बराच काळ लोटलेला दिसतो. एकंदर कुशान राजांपैकीं कनिष्काचें नांव हिंदुस्थानाच्या बाहेरहि फार प्रसिद्ध आहे; तथापि त्याच्याबद्दल विश्वसनीय अशी ऐतिहासिक माहिती मात्र थोडी आहे. विश्वसनीय अशा चिनी इतिहासकारांच्या ग्रंथांतहि त्याच्याबद्दल उल्लेख आढळत नाहीं. कनिष्क व त्याच्या पाठोपाठचे कांही राजे यांच्या संबंधाचे उल्लेख असलेले कोरीव लेख पुष्कळ आहेत. त्यांपैकीं विसाहून अधिकांत कालदर्शक आंकडेहि दिले आहेत; परंतु ते घोटाळ्याचे असल्यामुळें त्यांची बरोबर संगति लागत नाहीं, व कांही विद्वान् संशोधक कनिष्काचें राज्यारोहण ख्रि. पू. ५८ मध्यें झालें असें म्हणणारे आढळतात हें मागें सांगितलेंच आहे. नाण्यादि पुराव्यावरून स्वतः व्हिन्सेंट स्मिथचेंच एके काळीं कनिष्काच्या कारकीर्दीचा आरंभ इ.स. ७८ मध्येंच झाला असें नक्की मत होतें. परंतु १९२० मध्यें त्यानें हिंदुस्थानच्या इतिहासावर जें पुस्तक प्रसिद्ध केलें त्यांत त्याचा राज्यारोहणाचा काल कदाचित सुमारें ४० वर्षे नंतरहि असूं शकेल अशी जबर शंका प्रदर्शित केली आहे. तथापि कनिष्क हा युएचि राष्ट्रजातींतील कुशन नांवाच्या लोकांपैकी असून तो दुस-या कडफिसेस नंतर गादीवर आला हें आतां निःसंशय ठरलें आहे.

क नि ष्क (इ .स. १२०-१६२).- ह्युएनत्संगनें असें लिहून ठेविलें आहे कीं, 'जेवहां कनिष्क गंधार' येथे राज्य करीत होता तेव्हां त्याची अधिसत्ता आसपासच्या राज्यावर होती व दूरदूरच्या प्रदेशावरहि त्याचें वर्चस्व होते.’ त्याची नाणीं काबूलपासून गंगेच्या कांठच्या गाझीपूर पर्यंत दुस-या कडफिसेस राजाच्या नाण्याबरोबर सांपडतात. ही नाणीं विपुल व अनेक प्रकारची सापडत असल्यामुळें त्याची कारकीर्द बरीच मोठी होती असें दिसतें. सिंधपैकी वरचा भाग त्याच्या अंमलाखालीं होता, आणि सिंधुनदीच्या मुखापर्यंतचीं उरली सुरलीं पार्थियन राज्येंहि त्यानें नाहींशीं करून टाकिलीं होतीं. कनिष्काच्या-किंवा या प्रकरणांत स्वीकारलेल्या व्हिन्सेंट स्मिथच्या सनावलीप्रमाणें दुस-या कडफिसेसच्या-कारकीर्दीत हिंदुस्थानचा रोमशीं जो संबंध आला तो मागे पृ. १११ मध्यें वर्णिलेलाच आहे. कनिष्कानें आपल्या कारकीर्दीच्या आरंभासच काश्मीर जिंकून तेथें अनेक स्मारकें उभारलीं, व आपल्या नांवाचें एक शहरहि वसविलें. हें शहर अद्याप लहान गांवाच्या स्वरूपांत अस्तित्वांत आहे. त्यानें हिंदुस्थानाच्या आणखी अन्तर्भागांत शिरून प्राचीन बादशहाची राजधानी जें पाटलिपुत्र तेथील राजावर हल्ला केला, व तेथला अश्वघोष नांवाचा एक बौद्ध साधु आपल्याबरोबर नेला. याबद्दलच्या ज्या अनेक कथा प्रचलित आहेत त्यांवरून निदान एवढें तरी निश्चित ठरतें कीं, कनिष्क आणि अश्वघोष हे समकालीन होते. इंडो-सिथियन अथवा कुशान घराण्याची सत्ता कनिष्काच्या कारकीर्दीत पश्चिम हिंदुस्थानावर आणि उज्जयिनी व महाराष्ट्र या भागांवरहि होती. कारण, महाराष्ट्राचा क्षत्रप क्षहरात नहपान आणि उज्जयिनीचा क्षत्रप चष्टन हे बहुधा शक असावे. हे कुशान राजांचे मांडलिक होते व ते कनिष्काचेहि असले पाहिजेत.

क नि ष्का ची रा ज धा नी.- कनिष्काची राजधानी पुरूषपुर म्हणजे आधुनिक पेशावर ही होती. हें शहर अफगाणिस्तान व हिंदुस्थान यांनां जोडणा-या हमरस्त्याचें संरक्षण करण्यास योग्य अशा ठिकाणीं वसलेलें होतें. या राधानीत कनिष्कानें आपल्या उत्तर वयांत तो बौद्ध संप्रदायाचा कट्टा पुरस्करर्ता बनल्यावर-बुद्धावशेषावर एक उंच इमारत उभारली. ही इमारत म्हणजे जगांतील अत्यंत आश्चर्यकारक गोष्टीपैकी एक होती. ही इमारत कोरीव लाकडाची असून ती तेरा मजली व ४०० फूट उंचीची होती आणि तिच्यावर चांगला मजबूत लोखंडी कळस होता. सोंगयुन नांवाचा चिनी प्रवाशी ६ व्या शतकाच्या आरंभीं या शहरीं आला होता तोपर्यंत ही इमारत आगीनें तीन वेळा जळून खाक झाली होती, पण श्रद्धाळू राजांनीं ती पुन्हां पुन्हां बांधून दुरूस्त केली होती. तिच्या शेजारी एक बौद्ध मठ होता, तेथें ९ व्या शतकांतहि बौद्धविद्यादानाचें कार्य उत्तम प्रकारें चालू होतें. वीरदेव नांवाच्या बौद्ध पंडितानें त्या शतकांत या संस्थेला भेट दिली होती. हा पंडित मद्र देशच्या देवपाल राजाच्या कारकीर्दीत (इ .स. ८४४-९२) नालंद येथील मठाधिपति नेमला गेला होता. पुढें मुसुलमानांच्या स्वा-यांच्या वेळीं गझनीच्या महंमुदानें व तदुत्तर सुलतानानें पुरूषपुर येथील उपर्युक्त विद्यापीठ नष्ट केले असावें. बौद्धांच्या पवित्र स्थानांत असंख्य मूर्ती असल्यामुळें त्या स्थानांचा मूर्तिभंजक मुसुलमानांकडून नाश करण्यांत येत असे.

ची न शीं यु द्ध.- कनिष्कानें हिंदुस्थानाबाहेरील पार्थियन लोकांबरोबर युद्ध केलें. कारण त्या वेळच्या पार्थियन राजानें कनिष्काच्या राज्यावर हल्ला केला होता. कनिष्काचे अत्यंत महत्वाचे लष्करी पराक्रम म्हटले म्हणजे काश्गार, यार्कंद आणि खोतान यांवरील विजय होत. हे प्रदेश चिनी सत्तेखालीं होते. हे जिंकण्याचा इ. स. ९० मध्यें दुस-या कडफिसेसनें केलेला प्रयत्न फसला होता हे वर सांगितलेच आहे. परंतु कुशानांची सत्ता अधिक बलिष्ठ बनल्यावर कनिष्कानें तें काम पुन्हां हातीं घेऊन तडीस नेले; आणि चीनला खंडणी देण्याचें बंद करून चीनच्या साम्राज्यांतीलच एका मांडलिक राजापासून ओलीस इसम आणले. हे इसम काश्गारच्या आसमंतांतील प्रदेशांतल्या राजघराण्यांतले होते. यांनां कनिष्कानें त्यांच्या योग्यतेप्रमाणें उत्तम प्रकारें वागविलें. त्यांची निरनिराळ्या ॠतुमानाप्रमाणें निरनिराळ्या शहरी बौद्ध मठांत राहण्याची सोय केली होती. हे ओलीस ठेवलेले इसम दिसण्यांत व पोषाखांत चिनी माणसाप्रमाणें होते असें सांगतात व त्यांच्यापैकीं एकानें कपिश येथील मठाला मोठी देणगी दिल्यामुळें त्यांच्या चित्रांनी बौद्ध भिक्षूंनीं कृतज्ञपणानें मठांतील भिंती सुशोभित केल्या होत्या. इ .स. ६३० च्या पावसाळ्यांत ह्युएनत्संग कपिश येथील मठांत राहिला होता त्या वेळीं मठवासी इसम पूर्वींच्या परोपकारी ओलीस इसमांचे धन्यवाद गातांना त्याला आढळले. ह्युएनत्संगच्या चरित्रकारानें उपर्युक्त ओलीस इसमांनीं दिलेल्या देणगीच्या द्रव्याबद्दल एक विलक्षण गोष्ट सांगितलेली आहे. हें द्रव्य कपिश येथील एका बुद्धालयांत वैश्रवणाच्या मूर्तीच्या पायाखाली पुरलेलें होतें. ते एका पापी राजानें काढून घेण्याचा प्रयत्न केला पण तेव्हांहि तेथील देवता क्रुद्ध झाली. त्यानंतर ह्युएनत्संग तेथें रहात असतां त्याला भिक्षूंनी तें द्रव्य देवतेजवळून मिळवून देण्याची विनंति केली. तेव्हां या चिनी प्रवाशानें कांहीं धूप वगैरे जाळून द्रव्याची अफरातफर किंवा त्याचा गैरवाजवी खर्च होणार नाहीं असें देवतेला आश्वासन दिलें, व नंतर मजुरांकडून तेथील जमीन ७|८ फूट खोल खणविली. या प्रसंगी खोदणा-या लोकांस देवतेकडून कांहीं एक त्रास न होतां त्यांनां तेथें सोन्यानें व मोत्यांनीं भरलेले एक मोठे तांब्याचें भांडें सापडलें. या पैशांतून देवालयाची दुरूस्ती करण्यांत आली. उरलेलें द्रव्य त्यानंतर ब-याच काळानें कमी पापभीरू लोकांनीं इतर कामीं खर्च करून टाकलें.

क नि ष्का चा उ पा स ना मा र्ग.- कनिष्कानें बौद्ध संप्रदाय स्वीकारल्यासंबंधाच्या ज्या कांहीं कथा आहेत त्यांचें अशोकाच्या कथांशीं फार साम्य असल्यामुळें त्यांतील सत्यांश हुडकुन काढणें फार कठिण आहे. पूर्ववयांत युद्धादि निमित्तानें जीं रक्तपाताचीं क्रूर कृत्यें झालीं त्याबद्दल विषाद वाटून या राजांनीं पुढें बौद्ध संप्रदाय स्वीकारला, असें दोघांविषयींहि समान वर्णन आहे. याबद्दल खात्रीलायक पुरावा नाण्यांवरून मिळतो. कनिष्काच्या कारकीर्दींतील आरंभींचीं नाणीं ग्रीक भाषा, लिपि व देवता यांहीं युक्त आहेत; नंतरच्या नाण्यांवर पर्शियन भाषेचे ग्रीक लिपींत लिहिलेले लेख आणि ग्रीक, इराणी व हिंदू देवतांचीं चित्रें आहेत; व अखेर अखेरचीं नाणीं बुद्ध शाक्य मुनीच्या मूर्तींनीं युक्त असून त्यांवरील लेख ग्रीक लिपींत आहेत. अशोकाच्या वेळीं बुद्धाची इतर देवतांप्रमाणें मूर्ति करण्याचा प्रघात पडला नव्हता; पण तो पुढें कनिष्काच्या वेळीं पडला. कनिष्काच्या काळांत बौद्ध संप्रदायाचा जो महायान म्हणून नवा पंथ निघाला तो हिंदु, झरथुष्ट्री ख्रिस्ती, ग्रॉस्टिक व हेलेनिक अशा अनेक पंथांच्या मिश्रणानें बनलेला होता. अलेक्झांडरची स्वारी, मौर्यांचे साम्राज्य आणि रोमन साम्राज्य यांचा परस्परांवर परिणाम झाल्यावर बौद्ध संप्रदायाला हें नवें स्वरूप प्राप्त होणें अपरिहार्य होतें. या महायानपंथानें बुद्धाच्या देवतामूर्ती कनिष्काच्या साम्राज्यांत सर्वत्र स्थापन केल्या. कनिष्क बौद्धसंप्रदायी बनल्यावरहि ज्याप्रमाणें पुढें हर्षराजा शिव आणि बुद्ध या दोघांची भक्ति करीत असे त्याप्रमाणें तो जुन्या व नव्या अशा दोन्हीहि देवतांनां भजत असे. पेशावर व नजीकच्या प्रांतांत म्हणजे प्राचीन गांधार प्रांतांत ज्या सुप्रसिद्ध मूर्ती सांपडल्या आहेत त्यांवरून नवा महायान पंथ, त्यांतील पौराणिक कथा आणि देवता यांची चांगली कल्पना येते. ही गांधारदेशीय मूर्तिकला ग्रीको-रोमन कलेची शाखा आहे असें स्पष्ट दिसतें. ही गंधारी मूर्तिकला ख्रिस्तीशकाच्या २-या शतकांत अत्यंत उच्च दर्जास पोहोंचलेली होती असें अत्यंत अधिकारी टीकारांचे मत पडलें आहे.

ध म्म सं गी ति.- कनिष्काच्या कारकीर्दीतील आणखी महत्त्वाची गोष्ट म्हटली म्हणजे अशोकाच्या पद्धतीवर त्यानें भरविलेली धम्मसंगीति होय. हिचा उल्लेख सिलोनी लेखकांनी केलेला नाहीं; पण तिबेटी, चिनी व मांगोली लेखकांनीं दिलेल्या उत्तर हिंदुस्थानांतील आख्यायिकेचा या संगीतीला आधार आहे. या संगीतीचा राजकारणाशीं कांहीं संबंध नव्हता. या मंडळासंबंधाची हकीकत अशी आहे कीं, कनिष्क एका भिक्षूच्या मदतीनें बौद्धसांप्रदायिक ग्रंथांचा अभ्यास करूं लागला तेव्हां त्यांतील निरनिराळीं परस्परविरोधी मतें पाहून त्याच्या मनांत गोंधळ झाल. तेव्हां आपला सल्लागार पूज्यपार्श्व याच्या संमतीनें कनिष्क राजानें बौद्धसांप्रदायिक ग्रंथ जाणणा-या विद्वानांची सभा बोलावली. त्या सभेतले सर्व पंडित हीनयान पंथांतील सर्वास्तिवादी मताचे अनुयायी होते. या मंडळाच्या सभा काश्मीरच्या राजधानीनजीक कुंडलवन नामक मठांत भरल्या. त्यांत वसुमित्र अध्यक्ष आणि पाटलिपुत्र येथून आणलेला सुप्रसिद्ध ग्रंथकर्ता अश्वघोष उपाध्यक्ष होता, व सभासद ५०० शें होते. त्यांनीं अगदीं प्राचीन काळापासूनच्या सांप्रदायिक ग्रंथांचें नीट परीक्षण करून बौद्ध सांप्रदायिक तत्त्वांच्या तीन मुख्य विभागावर मोठाले टीकाग्रंथ तयार केले. त्यांपैकीं महाविभाषा नांवाचा बौद्ध तत्वज्ञानाचा ज्ञानकोशासारखा मोठा ग्रंथ अद्याप चीनमध्यें आहे. हे टीकाग्रंथ ताम्रपटावर लिहून एका स्तूपामध्यें ठेवून देण्यांत आले. ते श्रीनगरनजीकच एखाद्या ठिकाणीं अद्याप उपलब्ध होणें शक्य आहे. ही संगीति इ. स. १०० च्या सुमारास भरली होती असा सर्व साधारण समज आहे. परंतु कनिष्क इ .स. १२० मध्यें राज्यारूढ झाला ह्या व्हिन्सेंट स्थिच्या मताशीं हा सन धडधडीत विसंगत दिसतो.

क नि ष्का चा मृ त्यु.- कनिष्क सुमारें ४३ वर्षें राज्य करून इ. स. १६२ च्या सुमारास मरण पावला. त्याच्या मृत्यूसंबंधानें पुढील दंतकथा आहे. राजाचा माथर नांवाचा एक असामान्य बुद्धिमत्तेचा प्रधान होता. त्याच्या सांगण्यावरून राजानें अनेक पराक्रमी सेनापती व मोठे चतुरंग सैन्य यांसह दिग्विजयाचें काम सुरू केलें. तीन दिशांनां त्यांनां जय मिळाला, पण उत्तरेकडे दिग्विजय करण्याचें काम राहिलें. त्यांत मदत करण्याकरितां राजानें लोकांनां विनंति केली. तेव्हां लोकांनीं असा विचार केलाः 'आपला राजा फार लोभी व क्रूर असून, त्याच्या स्वा-या व विजय यांमुळें सर्व नोकर अगदीं त्रासले आहेत तरी राजाला आणखी उत्तरेकडे दिग्विजय करण्याची इच्छा आहेच. आपल्या नातेवाइकांनां राजानें जिंकलेल्या दूरदूरच्या देशांत संरक्षणाकरितां रहावें लागत आहे. या सर्व त्रासांतून मुक्त होण्याकरितां आपण सर्वांनीं मिळून राजालाच नाहींसा केला पाहिजे म्हणजे आपल्याला सुख लाभेल'. असा विचार करून पुढें जेव्हां राजा आजारी पडला तेव्हां त्यांनी कट करून त्याला एका दुलईखालीं झांकून टाकलें व एका माणसानें त्याच्यावर बसून त्याला गुदमरून टाकून त्याचा जीव घेतला.

हु वि ष्क.- (इ .स .१६२-१८२) कनिष्कानंतरच्या राजांविषयीं अगदीं थोडी माहिती मिळते. शिलालेखांवरून असें सिद्ध होतें कीं, २४ व २८ व्या वर्षीं मथुरा येथें वासिष्क राज्य करीत होता; आणि हुविष्क ३३ व ६० या वर्षांच्या दरम्यान, व कनिष्क त्याच ठिकाणीं ४१ या वर्षीं राज्य करीत होता. या आंकड्यांचा मेळ घालण्याचा उत्तम मार्ग म्हटला म्हणजे वासिष्क व हुविष्क हे कनिष्काचे मुलगे होते, व कनिष्क युद्धावर गेला असतां ते उत्तर हिंदुस्थानांत राजप्रतिनिधी म्हणून काम करीत असत असें मानलें पाहिजे. वासिष्काचीं नाणी सांपडत नाहींत यावरून तो बापाच्या पूर्वीं वारला असावा; आणि कनिष्कानंतर हुविष्क सम्राट झाला असावा. हुविष्काचीं जीं पुष्कळ नाणीं सांपडतात तीं तो साम्राज्याधिपति झाल्यानंतरचीं असावींत. हुविष्काच्या साम्राज्यांत काबूल, काश्मीर व मथुरा यांचा अंतर्भाव होत असे. मथुरा येथील एक बौद्ध मठाला त्याचें नांव दिलेलें होतें. कनिष्काप्रमाणें यानेंहि बौद्धसंप्रदायी संस्थांनां मोठाल्या देणग्या दिल्या; आणि ग्रीक, हिंदी व इराणी या तीनहि संस्कृतींतील देवतांचा पुरस्कार केला. हुविष्काच्या नाण्यांवर हेराक्लीझ, सरापो, स्कन्द व त्याचा मुलगा विसाख, फेरो, अग्निदेवता व इतर अनेक देवता यांच्या मूर्ती आहेत, परंतु बुद्धाची मूर्ति नाहीं. यावरून असें दिसतें कीं, या जुन्या सिथियन राजांची बौद्ध संप्रदायावर फारशी श्रद्धा नव्हती. मात्र बौद्धसांप्रदायिक मठादि बड्या संस्थांनां ते मोठाल्या देणग्या देत असत.

काश्मिरांत हुविष्कानें हुष्कपुर नांवाचें शहर वसविलें तें बारामूल घाटाच्या नजीक असून अनेक शतकें तें फार प्रसिद्ध होतें. इ .स. ६३१ मध्यें ह्युएनत्संग काश्मीरांत गेला तेव्हां हुष्कपुरमठांत त्याचा चांगला आदरसत्कार झाला. शिवाय त्या प्रवाशानें ५००० भिक्षू असलेले पुष्कळ मठ पाहिले. प्राचीन हुष्कपुराच्या ठिकाणीं आज उष्कूर नांवाचें लहानसें खेडें आढळतें, व त्यांच्या नजीक एका प्राचीन स्तूपाचे अवशेषहि आहेत. हुविष्यानें बरीच वर्षें राज्य केलें. त्याचीं अनेक प्रकारचीं नाणी सांपडली आहेत. त्यांपैकी सोन्याचीं नाणीं उत्तम असून त्यांवर राजाचा मुखवटा आहे.

१ ला वा सु दे व (इ. स. १८२ - २२०).- हुविष्कानंतर १ला वासुदेव राज्यावर आला. हें राजाचें नांव पूर्णपणें हिंदु पद्धतीचें आहे, व त्यावरून या परकी राजांवर हिंदुस्थानांतील परिस्थितीचा किती लवकर परिणाम झाला हें स्पष्ट दिसतें. याच्या नाण्यांवरहि शिव देवतेची नंदीसह मूर्ति आहे. याचे पुष्कळसे शिलालेख मथुरा येथें सापडतात. त्यांतील सनांवरून त्यानें किती वर्षें राज्य केलें तें कळतें. १ ल्या वासुदेवाच्या कारकीर्दीत कुशानांच्या सत्तेला उतरती कळा लागली आणि लवकरच त्या साम्राज्याचे विभाग पडले.

इ रा णां ती ल स स्स न घ रा ण्या चा हिं दु स्था ना व र प रि णा म.- इ .स. २२६ मध्यें आर्सेकिडी घराणें नष्ट करून सस्सन घराणें इराणांत राज्य करूं लागलें. या नव्या घराण्यांतील २ रा बहराम यानें २७६-२९३ या काळाच्या दरम्यान सीस्तानवर स्वारी केली होती. परंतु या सस्सन घराण्यांतील राजानें तिस-या शतकांत हिंदुस्थानावर स्वारी केल्याचा मुळींच ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाहीं. एवढे मात्र खरें कीं, सस्सन घराण्याच्या उदयाच्या सुमारास (इ .स. २२६) हिंदुस्थानांतील आंध्र व कुशान ही दोन सुप्रसिद्ध घराणीं नष्ट झालीं. त्यामुळें या तीन गोष्टींचा परस्पर संबंध असावा असें अनुमान करण्यास हरकत नाहीं. हिंदुस्थानांतील ब-याचशा मुलुखावर राज्य करणारा १ ला वासुदेव हाच शेवटला कुशान राजा होय. त्याच्या नंतर उत्तर हिंदुस्थानांत अनेक लहान लहान स्वतंत्र राज्यें अस्तित्वांत आलीं असावीं, परंतु ३ -या शतकासंबंधानें हिंदुस्थानांत ऐतिहासिक पुरावा मुळींच उपलब्ध नाहीं. पुराणांत आंध्र गर्दभिल्ल, शक, यवन, बाल्हिक वगैरे अनेक घराण्यांचीं नांवें दिलीं आहेत तीं सर्व घराणीं समकालीन असावीत व त्यांपैकीं कोणत्याच घराण्यास साम्राज्याचा उपभोग घ्यावयास मिळाला नसावा.

ए क श त क भ र ची अ रा ज क स्थि ति (इ .स. २२०-३३०). रो म न सा म्रा ज्या चा भा र ती य सै न्या क डू न प रा ज य.- पंजाबामध्यें व काबूलवर कुशान राजांची सत्ता पुष्कळ काळ होती असें नाण्यांवरून दिसतें. काबूलवरची त्यांची सत्ता ५ व्या शतकांत हूण लोकांनीं नष्ट केली. चवथ्या शतकाच्या आरंभीं एका कनिष्क राजानें इराणांतील सस्सन राजा २ रा होर्मिझ्द याला आपली मुलगी दिली. इ .स. ३५९ मध्यें २ -या शापुरनें आमायडाच्या वेढ्याच्या वेळीं हिंदुस्थानांतील हत्ती आणि कुशान सैनय यांच्या मदतीनें रोमन सैन्यावर जय मिळविला. तिस-या शतकांत पंजाबवर जे परकी राजे राज्य करीत होते त्यांपैकीं कुशान कोण होते व आशियांतील इतर जातीचे कोण होते हे सांगणे कठिण आहे. नाण्यांवरील राजांच्या नांवांत कनिष्क अथवा वसु (देव) ही नांवें आढळतात. त्याच प्रमाणें भ, ग, वी अशीं चिनी पद्धतीचीं एकाक्षरीं नांवेहि आढळतात. हीं नांवें मध्य आशियांतील ज्या जातींनीं हिंदुस्थानावर स्वा-या केल्या त्यांच्या मुख्यांचीं असावींत. एका नाण्यावर आरंभींच्या सस्सन राजांच्या नाण्यांवरच्या प्रमाणें अग्निस्थानाचें चित्र आहे. त्यावरून तिस-या शतकांत पंजाबचा इराणशीं संबंध पूर्वींप्रमाणें चालू झाला असें दिसतें. ह्यानंतरचींहि कुशानांचीं नाणी सस्सन नाण्यांशीं संबद्ध आहेत. तथापि पंजाब व उत्तर हिंदुस्थान यांतील घराण्यांसंबंधाची ३ -या शतकांतील व ४ थ्या शतकाच्या आरंभीची निश्चित माहिती कांहीच मिळत नाहीं. प्राचीन साम्राज्याची राजधानी जें पाटलिपुत्र शहर त्याचें महत्त्व ५ व्या शतकांतहि कायम होते. इ .स. ३२० मध्यें गुप्त शकांच्या संस्थापकानें एका लिच्छवी राजपुत्राच्या दोस्तीला दिलेलें महत्त्व लक्षांत घेता ३ -या शतकांत पाटलिपुत्र येथें वैशालीच्या लिच्छवीची सत्ता होती असें दिसतें. या लिच्छवींचा तिबेटी लोकांशीं निकट संबंध होता असें वाटतें. या काळांतल्या पश्चिम हिंदुस्थानांतील शक क्षत्रपांची वंशावळ मात्र बरोबर सापडते. बाकी एकंदरीनें कुशान व आंध्र घराणीं नष्ट झाल्यावर (अजमासें इ. स. २२० किंवा २३० च्या) पुढें सुमारें एक शतकानें सम्राट गुप्तांचे घराणें उदयास येईपर्यंतचा हिंदुस्थानचा सर्व इतिहास अगदी अज्ञात आहे.