प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १२ वें.
अशोक ते अराजक-शकयवनांचा धुमाकूळ.
काण्व अथवा काण्वायन घराणें. - (ख्रि.पू. ७३-२८).- शुंग घराण्यांतला शेवटचा दुर्व्यसनी राजा देघभूमि (ति) याला ठार मारून त्याचें राज्य बळकावण्याकरितां त्याचाच ब्राह्मण प्रधान वसुदेव यानें कट केला होता. देवभूमि हा प्रथमपासूनच केवळ नामधारी राजा असून त्याच्या राज्याची सर्व सूत्रें त्याचा प्रधान वसुदेव याच्या हाती होतीं. वसुदेव काण्व घराण्यांतला असून हें घराणें बराच काल चांगलें बलिष्ठ होतें. राजपुत्र सुमित्राला मारणारा मित्रदेव याच काव्य घराण्यांतला असावा असें वाटतें. मत्स्य व वायु हीं दोन पुराणें आणि बाणाचें हर्षचरित्र यांतील पुराव्यावरून शेवटचा शुंग राजा देवभूति याला मारून काण्व वसुदेव राजा झाला असें ठरतें. सबब शुंग व काण्व हीं घराणीं समकालीन होतीं हें डॉ. भांडारकरांचें मत (हिस्ट्री ऑफ डेक्कन व्हा. १ ला पान १६३) बरोबर नाहीं असें व्हिन्सेंट स्मिथ म्हणतो.
वसुदेवानंतर काण्व घराण्यांतील आणखी तीन पुरूष राज्यावर आले व चौघांनीं मिळून [पृ. १६७ पहा] पंचेचाळीस वर्षेँ राज्य केले. तथापि यांपैकी कोणाहि राजाबद्दल माहिती उपलब्ध नाही. शेवटचा काण्व राजा ख्रि. पू. २८ किंवा २७ च्या सुमारास आंध्र किंवा शातवाहन घराण्यांतल्या राजानें ठार मारला.
काण्वानंतर आंध्र घराणें राज्य करूं लागलें असें पुराणांत सांगितलें आहे. पण आंध्र घराणें ख्रि. पू. २४० किंवा २३० पासूनच राज्य करीत होतें हें निर्विवाद आहे. सुशर्मा या शेवटच्या काण्व राजाला मारणारा आंध्र राजा आंध्र राजावलीतील ११, १२ किंवा १३ वा असावा.