प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १२ वें.
अशोक ते अराजक-शकयवनांचा धुमाकूळ.
अशोकाच्या मृत्यूनंतर पश्चिम आशिया.- अशोकाच्या कालांत पूर्वेकडे सिल्यूकिडी ग्रीक साम्राज्य भरभराटींत होतें तें पुढें दुर्बल झालें, आणि इकडे मौर्य साम्राज्यहि दुर्बल झालें. या दोन्ही साम्राज्यांच्या दुर्बलतेचे जे परिणाम झाले ते येणेंप्रमाणे:-
(१) ख्रिस्तपूर्व तिस-या शतकाच्या मध्यकालांत सिल्यूकिडी ग्रीक साम्राज्यांतून बॅक्ट्रिया व सांग्डिएना हीं राज्यें फुटलीं व एक शतकानंतर तीं शक व युएचि यांनीं काबीज केलीं (पृ.७९-८० पहा).
(२) ख्रिस्तपूर्व दुस-या शतकांत पश्चिम इराण सिल्यूकिडी साम्राज्यांतून निघून पार्थियन साम्राज्यांत अंतर्भूत झालें. या पार्थियन साम्राज्यानें पुढें बाबिलोनिया आणि मेसापोटेमिया हे प्रांत घेतले.
(३) आशियामायनर व सिरिया हे प्रदेश रोमन छत्राखाली आले.
थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे रोमन साम्राज्य व पार्थिअन साम्राज्य यांत ग्रीक मुलूख वांटला गेला, आणि जो वाटला गेला नाहीं तो शक व युएचि यांच्या भक्ष्यस्थानी पडला. हिंदुस्थानाला रोमन साम्राज्य किंवा पार्थियन साम्राज्य यांजकडून बाधा झाली नाही; तथापि बॅक्ट्रियन ग्रीक व शक यांच्याकडून मात्र त्यास त्रास झाल्याशिवाय राहिला नाही.
सिल्यूकिडी साम्राज्य आणि ग्रीक प्रदेशावरील रोमन सत्ता यांचा इतिहास मागें दिलाच आहे. शक, युएचि व उपर्युक्त लहान ग्रीक राज्यें यांचा इतिहास मात्र द्यावयाचा राहिला आहे तिकडे आपण आतां वळूं.