प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १२ वें.
अशोक ते अराजक-शकयवनांचा धुमाकूळ.
अशोकाचें साम्राज्य.- अशोकाचें साम्राज्य अफगाणिस्थान, बलुचिस्थान, मकराण, सिंध, कच्छ, सुवात, काश्मीर नेपाळ व बहुतेक सर्व हिंदुस्थान एवढ्यावर पसरलेलें होतें. अगदीं दक्षिणेकडचीं तामीळ संस्थानें स्वतंत्र होतीं. कदाचित् खोतानवर देखील याची सत्ता असावी. त्याच्या या साम्राज्यांत अनेक मांडलिक संस्थानेंहि होतीं; तसेंच अनेक रानटीं जातीहि होत्या. तथापि खास राजप्रतिनिधींच्या अंमलाखालींहि बराच मुलूख होता. यांपैकीं एक तक्षशिला येथें, दुसरा तोसली येथें, तिसरा उज्जयिनी येथें व चवथा सुवर्णगिरि येथें रहात असे.
अशोकानें आपल्या पूर्वींच्या राजांप्रमाणेंच सर्व राज्यकारभार चालविला होता. वरिष्ठ अधिका-यांनां महामात्र अशी संज्ञा असे; व त्यांच्या हाताखालीं पुष्कळ अधिकारी असत. चौदा शिलालेख खोदविण्यांत आले त्या वेळीं अशोकानें धर्ममहामात्र नांवाचे नवीन अधिकार नेमले. या धम्मांतील नीतितत्त्वें सर्वमान्यच असल्या कारणानें तीं सर्व धर्मांतील लोकांनां संमत होण्यासारखींच होतीं. अहिंसेचा नियम कांहीं जातींनां थोडा जाचक झाला असावा; तरी पण हिंसा होऊं नये म्हणून महामात्र हे पूर्ण खबरदारी घेत असत.