प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १२ वें.
अशोक ते अराजक-शकयवनांचा धुमाकूळ.
आंध्र अथवां अंध्र घराणें.- काण्व घराणें राज्यभ्रष्ट झाल्यानंतरचा आंध्र घराण्याचा इतिहास देण्यापूर्वीं या घराण्याचा पूर्वेतिहास दिला पाहिजे. चंद्रगुप्त मौर्य व मिगॉस्थिनीझ यांच्या वेळीं म्हणजे ख्रि. पू. ३०० च्या सुमारासच द्रविड जातीचें व तेलगु भाषा बोलणारें आंध्रांचे राष्ट्र हिंदुस्थानच्या पूर्व किना-याकडे कृष्णा व गोदावरी या नद्यांमधील प्रदेशांत राज्य करीत होतें. लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत चंद्रगुप्त याच्या खालोखाल त्यांचा नंबर होता. आंध्रांच्या राज्यांत तीस तटबंदी शहरें, अनेक गांवें, १,००,००० पायदळ, २००० घोडदळ व १००० हत्ती होते. या राज्याची राजधानी कृष्णा नदीच्या कांठीं श्रीकाकुलम येथें होती असा समज आहे. अशा प्रकारचें हें राष्ट्र प्रथम अर्थात् स्वतंत्र होते, पण नंतर चंद्रगुप्त किंवा बिंदुसार यांपैकीं कोणाच्या कारकीर्दीत तें मगधाधिपति मौर्यांचें मांडलिक बनलें तें निश्चित माहित नाही. अशोकाच्या शासनलेखा (ख्रि.पू. २५६) हे आंध्र लोक त्याच्या साम्राज्यसत्तेखालीं असल्याबद्दलचा उल्लेख आहे. अशोकानंतर मौर्य साम्राज्यांतील कलिंगादि राज्यांप्रमाणें हें आंध्रांचे राज्यहि स्वतंत्र झालें. या नवीन स्वतंत्र बनलेल्या आंध्र राष्ट्राचा पहिला राजा सिमुक होता. त्या वेळीं आंध्रांची सत्ता इतक्या झपाट्यानें वाढली कीं, या नव्या घराण्यांतील दुसरा राजा कृष्ण(कन्ह) याच्या वेळी गोदावरी नदीच्या उगमाजवळचें नाशिक शहर व तेथपर्यंतचा सर्व मुलूख आंध्रांच्या राज्यांत सामील करण्यांत आला होता. आंध्रांचा तिसरा राजा श्री शातकर्णि याची सत्ता कलिंगाचा राजा खारवेल यानें जुमानली नाहीं (ख्रि. पू. २१८). हें कलिंगांचे राज्यहि अशोकाच्या मृत्यूनंतर स्वतंत्र बनलें होतें. यानंतरच्या सुमारें दोनशें वर्षांतली आंध्र राजांबद्दलची कांही माहिती उपलब्ध नाही. पुराणांत दिलेली आंध्र राजांची नांवे व त्यांच्या कारकीर्दीची वर्षें मागे पृ. १६७ वर आलेलींच आहेत.
ख्रि. पू. २८ किंवा २७ च्या सुमारास, वर सांगितल्याप्रमाणें काण्वांपैकीं शेवटल्या राजाला मारून त्याचें उरलेंसुरले राज्य आंध्रांनीं घेतलें. आंध्र राजे आपणांस शातवाहन कुलांतले म्हणवीत व त्यांच्यापैकीं पुष्कळांनां शातकर्णि हें नांव होतें. या वंशांतील अनेक राजांचा उल्लेख एकाच नांवानें केला गेल्यामुळें फार घोटाळा होतो. काण्व राजा सुशर्मा याला मारणा-या आंध्र राजाचें नांवहि नक्की माहित नाहीं.
आंध्र घराण्याचा सतरावा राजा हाल याचें नांव वाङ्मयाशीं संबद्ध असल्यामुळें त्याला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रांतील प्राचीन भाषेंत लिहिलेला 'सप्तशती' नामक ग्रंथ हालाचा म्हणून प्रसिद्ध आहे. तो खुद्द हालानें लिहिलेला असेल किंवा त्याला अर्पण केलेला असेल, असें डॉ. भांडारकारांचें मत आहे. प्राकृत भाषेंतील दुसरे कित्येक ग्रंथ आंध्र घराण्यांतील राजांच्या नांवांशीं संबद्ध आहेत. आंध्रांच्या वेळी त्यांच्या मुलुखांत संस्कृत भाषेंत शिष्ट वाङ्मय लिहीत नसत असें दिसतें.
काण्व घराण्यांतला २३ वा राजा गौतमीपुत्र श्री शातकर्णि आणि २४ वा राजा वासिष्ठीपुत्र श्री पुलुमायि यांच्या कारकीर्दीत आंध्रांची परकी लोकांशीं युद्धें झालीं. हे परकी लोक हिंदुस्थानच्या पश्चिमेकडील भागांत वसाहत करून व राज्यें स्थापून राहिलेले होते. ते प्रथम इंडोपार्थियन व नंतर कुशान राजांचे अंकित म्हणून राहिले होते. देश्य राजे व परकी सत्ताधारी यांच्यामध्यें सामने हिंदुस्थानांत या प्राचीन काळांत वारंवार होत असत.
हल्लीच्या मुंबई इलाख्यांतील कांही भागांत प्राचीन काळी वसाहत करून राहिलेल्या परकी लोकांसंबंधानें माहिती फार त्रोटक मिळते; पण नाणीं व शिलालेख यांच्या आधारें कांहीं हकीकत देतां येण्यासारखी आहे. पश्चिम भागांतील अशा परकी सत्ताधा-यांपैकीं माहिती उपलब्ध असलेला असा पहिला क्षत्रप भूमक शहरात हा होय. यानें पार्थियन नाण्यांसारखी नाणीं पाडलेलीं असून तो इंडोपार्थियन राजांपैकीं गोंडोफेरस किंवा दुस-या कोणा राजाचा अधिकारी असावा. हा बहुधा ख्रिस्तोत्तर पहिल्या शतकाच्या मध्याच्या सुमाराचा असून त्याच्या जागेवर इतर अधिकारी होऊन गेले असावे. क्षहरातांचा शकांशीं संबंध होता व ते सिकस्तेन म्हणजे अर्वाचीन सीस्तान प्रांतांतून आलेले असावेत.
यानंतर नहपान या क्षहराताचा उल्लेख आढळतो. तो भूमकानंतर लगेच क्षत्रप बनला किंवा नंतर बनला हें नक्की समजत नाहीं. परंतु तो इ. स. ६० व ९० यांच्या दरम्यान अधिकारावर होता असें वाटतें. त्याच्या नांवावरून तो फारसी-पर्शियन कुळांतला असावा. प्रथम तो भूमकाप्रमाणें क्षत्रप होता व नंतर महाक्षत्रप व राजा या उच्च पदव्याहि त्याला मिळालेल्या होत्या. त्याच्या अंमलाखालीं दक्षिण राजपुतान्यापासून नाशिक व पुणें जिल्ह्यापर्यंतचा प्रदेश व काठेवाडहि होता. क्षत्रप व महाक्षत्रप या पदव्यांवरून हे उत्तरेकडील राजांचे अधिकारी असावेत हें उघड आहे; व हे उत्तरेकडील राजे म्हणजे कुशाल असले पाहिजेत.
आंध्र घराण्यांतला २३ वा राजा गौतमीपुत्र श्रीशातकर्णि हा इ .स. १०९ च्या सुमारास राज्यावर आला असावा. त्यानें या क्षहरातांची सत्ता नष्ट करून त्यांचा मुलूख इ. स. १२४ च्या सुमारास आपल्या राज्यास जोडला. या विजयाचें चिन्ह म्हणून या नष्टसत्ताधा-यांनीं पाडलेली अनेक वर्षांची नाणीं घेऊन त्यांवर या आंध्र राजानें आपला शिक्का पुन्हां मारला. 'शकपल्हवादि जातिविहीन परकी लोकांच्या हीन संस्कृतीपासून ब्राह्मणसंस्कृति आणि बौद्धसंप्रदाय यांचें संरक्षण करणारा व जातिसंस्था पुन्हां प्रस्थापित करणारा' अशी प्रौढी या आंध्र राजानें मारलेली आहे. यानें ब्राह्मण व बौद्ध या दोघांनांहि उदार देणग्या दिल्या. त्यांत विशेष आश्चर्याची गोष्ट ही आहे कीं, आंध्र राजे ब्राह्मण असून त्यांनीं बौद्धांच्या संस्थानांच बहुतेक देणग्या दिल्याचा उल्लेख आहे.
इ. स. १३५ च्या सुमारास राजा गौतमीपुत्र श्रीशातकर्णि याचा मुलगा राजा वासिष्ठीपुत्र श्रीपुलुमायि राज्यावर आला. त्याने २८ वर्षें राज्य केलें. त्याचा विवाह उज्जयिनी येथील शककुळांतला महाक्षत्रप पहिला रूद्रदामा याच्या कन्येशीं झाला होता. तथापि या महाक्षत्रपानें आपल्या जावयाचा दोनदां पराभव करून आंध्रांनीं घेतलेल्या क्षहरातांच्या मुलुखापैकीं बराचसा जिंकून घेतला. पहिल्या रूद्रदाम्यानें आपलें मुलूख जिंकण्याचें काम इ .स. १५० च्या पूर्वीं संपविलें होतें. पश्चिम हिंदुस्थानांतील आपल्या सत्तेखालील सर्व प्रांताची नोंद त्यानें या सालानंतर लवकरच करून ठेवलेली आहे.