प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १२ वें.
अशोक ते अराजक-शकयवनांचा धुमाकूळ.

सम्राट अशोक मौर्य (ख्रि. पू. २७३-२३२).- बिन्दुसाराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोकवर्धन हा राज्यावर आला. प्रथम हा कांहीं वर्षेपर्यंत उपराजा या नात्यानें तक्षशिला नगरींत राजयकारभार पहात असे; व नंतर माळव्यामध्यें उज्जयिनी येथें राज्यकारभार पाहूं लागला. तो राज्यारूढ झाल्यानंतर चार वर्षांनीं त्याचा राज्याभिषेक झाला यावरून त्याला कांहीं प्रतिस्पर्धी होते असे अनुमान निघतें. त्याचा थोरला भाऊ सुसीम हा एक त्याचा प्रतिस्पर्धी होता असें निरनिराळ्या कथांवरून दिसतें. अशोकानें राज्यप्राप्‍तीस्तव ९८|९९ भाऊ मारले अशा सिलोनमधील भिक्षू जी आख्यायिका सांगतात ती अगदीं खोटी दिसते. उलट अशोकानें आपल्या भावांबहिणींची चांगली व्यवस्था ठेवली होती असें त्याच्या शिलालेखांवरून व्यक्त होतें. अशोकाबद्दलच्या त्याच्या मतस्वीकारापूर्वीच्या ज्या बौद्ध कथा प्रचलित आहेत, त्या अगदीं खोट्या असाव्यात असें संशोधक समजतात. अशोकाविषयींची विश्वसनीय माहिती त्याच्या शिलालेखांवरूनच कळूं शकते. हे शिलालेख फारच नमुनेदार आहेत.

अशोकाचें बहुतेक आयुष्य शांततेनेंच गेल्यामुळें त्याच्याजवळ लष्करी सैन्य किती होतें याचा अंदाज करतां येत नाहीं. त्याच्या आयुष्यांतील मुख्य चळवळ धार्मिक होती, व या धार्मिक चळवळीमुळें अशोकाच्या वृत्तींत किती फरक पडला हें त्याच्या शिलालेखांवरून दिसतें.

अशोकाचीं पहिलीं वर्षे कशीं गेलीं किंवा त्यानें राज्यारूढ झाल्यानंतर प्रथम कोणतीं कृत्यें केलीं याचा बोध होत नाहीं. आपल्या वाडवडिलांप्रमाणें त्यानेंहि आपल्या कारकीर्दीचा पूर्व भाग चैनींत व खाण्यापिण्यांत घालविला असावा असें दिसतें. पण यावरून त्याच्या हातून अनेक दृष्कृत्यें झालीं होतीं असा निष्कर्ष काढणें बरोबर होणार नाहीं.