प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १२ वें.
अशोक ते अराजक-शकयवनांचा धुमाकूळ.
मौर्य घराण्याच्या वेळची राजयव्यवस्था.- मागें दहाव्या प्रकरणांत बुद्धापासून चंद्रगुप्तापर्यंतच्या काळची सामाजिक परिस्थिति वर्णिलेली आहे त्यावरून तदुत्तर मौर्य घराण्याच्या वेळेच्याहि समाजव्यवस्थेचीं थोडीबहुत कल्पना होऊं शकते. तेव्हां तेथें आतां मौर्यकालीन शासनपद्धतीचेंच फक्त दिग्दर्शन करावयाचें बाकी राहिलें आहे. चंद्रगुप्तानें आपल्या अमदानींत जी राज्यव्यवस्था अंमलांत आणली तीच बहुतेकांशीं त्याच्या मुलाच्या व नातवाच्या कारकीर्दीत कायम राहिली. अशोकाच्या कारकीर्दींत कांहीं नवीन सुधारणा घडून आल्या, पण त्या फार थोड्या होत्या. मगध देशाची राज्यव्यवस्था अर्थशास्त्रांत सांगितलेल्या पद्धतीवर चाललेली होती; आणि चंद्रगुप्ताच्या कारकीर्दींत जरी राज्याचा विस्तार झाला तरी त्यामुळें तींत फारसा फरक पडला नाहीं. राज्यामध्यें निरनिराळीं खातीं असून त्या खात्यांची व्यवस्था निरनिराळ्या अधिका-यांकडून ठेविली जात असे. त्या राज्यव्यवस्थेसंबंधानें जी माहिती मिळते तिजवरून अकबराच्या वेळेपेक्षां या वेळची राज्यव्यवस्था चांगली होती असें दिसतें. अकबराच्या वेळीं न्यायखात्यांतील अधिका-यांखेरीज बाकीचे सर्व अधिकारी लष्करी पेशाचेच असत. अकबराच्या खासगींतील मंडळी सुद्धां शिपाईच समजण्यांत येत. कायम सैन्य फार थोडे होतें, व लढाईचा प्रसंग येई तेव्हां राजाच्या निरनिराळ्या सरदारांच्या हाताखालीं सैन्यें जमा होत. पण अशा प्रकारची पद्धत मौर्यकालीं नव्हती. मौर्यांच्या पदरीं सरकारी सैन असे व तें फार उपयोगीं पडत असे. एकंदर राज्यकारभार बिनलष्करी अधिका-यांच्या ताब्यांत असून तो उत्कृष्ट रीतीनें चालत असे. मध्यवर्ती सत्तेचा प्रांतिक अगर तालुक्यांतील अधिका-यांवर कडक दाब असे. चंद्रगुप्ताच्या पदरीं गुप्त हेरांचें खातें फार चांगल्या त-हेचें असून त्या खात्याची व्यवस्था जर्मन पद्धतीची होती. सारांश मौर्याची राज्यव्यवस्था म्हणजे उत्कृष्ट रीतीनें चाललेली एकतंत्री सत्ता होती.
पा ट लि पु त्र रा ज धा नी.- पाटलिपुत्र हें शोण नदीच्या उत्तर तीरावर ९ मैल पसरलेलें एक मोठें शहर होतें. आतां ह्या जागेवर पाटणा, बांकीपुर इत्यादि शहरें झालीं आहेत. कुसुमपुर नांवाचें फार जुनें शहर पाटलिपुत्रांत अंतर्भूत झालें होतें व त्यामुळें पाटलिपुत्रालाच कुसुमपुर असेंहि म्हणत असत. शोण व गंगा यांच्या संगमामुळें जो जिव्हाकृति जमिनीचा तुकडा बनलेला आहे त्या ठिकाणीं हें पाटलिपुत्र नगर वसलेलें असून अशाच प्रकारची जागा शास्त्रकारांनीं राजधानीला सुरक्षित मानलेली आहे. शहराच्या रक्षणार्थ सभोंवतीं भरीव लांकडी गजांची तटबंदी होती. हिला चौसष्ट दरवाजे व ५७० बुरूज होते. या गजांच्या तटबंदीचें रक्षण बाहेरून शोणनदीच्या पाण्यानें व भरलेल्या खंदकानें होत असे.
रा ज वा डा.- राजवाड्याचें सर्व काम लांकडी होतें. तेथील खांबांवर सोनेरी व रुपेरी चित्रें असत. राजवाड्याचें कलाकौशल्य पर्शियन राजवाड्याच्या धर्तीवरचें होतें. ग्रीक ग्रंथकारांच्या मतें सुसा व एकबटाना येथील राजवाड्यांपेक्षां चंद्रगुप्ताचा राजवाडा फार भव्य होता. दरबार तर फारच थाटाचा भरत असे. सहा सहा फूट रुंद तोंडाचीं सोन्याचीं भांडीं उपयोगांत आणलीं जात असत. सोन्यानें मढविलेल्या पालखींतून अगर अलंकारभूषित हत्तीवरून राजा सार्वजनिक ठिकाणीं येत असे. आशिया व चीन येथील ऐश्वर्याच्या सर्व वस्तू त्याला उपलब्ध होत्या. राजवाड्यामध्यें राजाच्या भोंवतीं सशस्त्र स्त्रियांचा पहारा असे. जनानखान्याची व्यवस्थाहि फार उत्कृष्ट होती.
रा जे लो कां च्या क र म णु की.- त्या वेळेच्या शास्त्रकारांनीं जरी मृगया व द्यूत हीं सदोष मानलेलीं होतीं पण तत्कालीन राजे लोक मृगया करीत असत. शिकारीसाठीं मोठमोठीं अरण्यें राखून ठेवलेलीं असत, व या अरण्यांत कोणी राजाच्या क्रीडेचा भंग केल्यास त्याला देहान्त शिक्षा मिळत असे. कुस्त्या, प्राण्याच्या झुंजा वगैरे करमणुकीचे प्रकारहि प्रचलित होते. रथांच्या शर्यती लागत असत व त्यांच्यासाठीं फार स्पर्धा होत असे.
वे श्या.- नर्तिकांनां त्या वेळीं फार मान असे. वेश्यांनां, घरच्या दासी, माला करणा-या दासी, किंवा पाय चेपणा-या दासी म्हणून नेमीत असत. राजाचा पोषाख ठेवण्याचें आणि सुवासिक तेलें व अत्तरें ठेवण्याचें काम यांच्याचकडे असे. राजाच्या शिरावर छत्र धरण्याचें काम व पंख्यानें वारा घालण्याचें कामहि ह्याच करीत असत. यांच्याकडे हेरांचेंहि काम असे.
इ रा णी व र्च स्व.- पंजाबच्या लगतच इराणी सत्तेखालील भाग असल्या कारणानें इराणी चालीरीतीचें वर्चस्व हिंदुस्थानावर पडलें असावें असें दिसतं. सरहद्दीलगतच्या प्रांतांतून खरोष्ठी लिपीचाच उपयोग करण्यांत येत असे. क्षत्रप ही इराणी पदवी प्रचारांत होती. अशोकाच्या शिलालेखाची पद्धत व कलाकुसरीची पद्धत हीं सर्व इराणी त-हेचींच होतीं. अग्निगृहामध्यें वैद्य व साधू यांचा सल्ला घ्यावा असा जो अर्थशास्त्रामध्यें नियम आहे तो, व तशाच राजाचे केंस धुण्याचा उत्सव इत्यादि चाली इराणी लोकांपासून घेतलेल्या होत्या हें उघड दिसतें. हल्लींच्या शोधांवरून हिंदु धर्मावर व समाजसंस्थांवरहि इराणी वर्चस्व थोडें फार पडलें असावें, किंवा दोहोंसहि सामान्य अशा चाली मगांच्या परिणामाचे अवशेष असावेत असें वाटूं लागलें आहे.
ए क तं त्री स त्ता.- हिंदुस्थानांत साधारणतः राजाचें अनियंत्रित वर्चस्व आढळून येतें. ब्राह्मणाला मान देण्याबद्दल किंवा त्याचा सल्ला घेण्याबद्दल कितीहि नियम असले तरी राजे लोक आपल्या मनास वाटेल त्याप्रमाणें करण्यास कचरत नसत. राजाचें प्रधानमंडळ जरूर तेवढ्याच लोकांचे असावे असा चाणक्यानें नियम घातला होता व त्याप्रमाणें चंद्रगुप्ताचें प्रधानमंडळ ठराविक लोकांचें नसे. शेवटचा निकाल राजाकडे असे. स्वतःविरुद्ध बंड अगर स्वतःचा खून एवढीच काय ती राजाला खरी भीति असे. राजानें जर रूढीविरुद्ध वर्तन केलें तर त्याला पदच्युत करण्याचे प्रयत्न होत असत. चंद्रगुप्त स्वतःच नंदाचा नाश करून राज्यारूढ झाला असल्यामुळें स्वतःवरहि तशी पाळी येईल अशा भीतीनें त्याचें मन व्यग्र असे. तो कधींहि एकाच दिवाणखान्यांत लागोपाठ दोन रात्री निजत नसे. नंदांच्या अनुयायांनीं त्याला मारण्यासाठीं अनेक प्रयत्न केले, पण याच्या सावधगिरीमुळें ते सर्व फसले.
सै न्य:- पूर्वापार रूढीप्रमाणें सैन्य चतुरंग असे. हत्ती, रथ, अश्व आणि पायदळ हीं तीं चार अंगें होत. हत्ती हा तट उध्वस्त करण्याच्या कामीं व शत्रूच्या सैन्याची दाणादाण करण्याच्या कामीं फार उपयुक्त असल्या कारणानें हत्तींचे सैन्यांत फार महत्त्व असे. रथाची पद्धत ॠग्वेदाच्या काळापासून अस्तित्वांत होती; व ती नामशेष कधीं झाली हें निश्चित नाहीं. सातव्या शतकाच्या मध्यभागांत सैन्याचें सर्ववसाधारण वर्णन करतांना ह्युएन त्संग यानें अधिकारी लोक रथाचा उपयोग करीत असत असें लिहिलें आहे. तथापि हर्षासंबंधीं ह्युएनत्संगनें, 'त्याच्या पदरीं प्रथम ५००० हत्ती, २०००० घोडदळ व ५०००० पायदळ होतें व पुढें ६०००० हत्ती व १००००० घोडदळ झालें असें ज्या ठिकाणीं म्हटलेलें आहे त्या ठिकाणीं त्यानें रथाचा उल्लेख केलेला नाहीं. यावरून हर्षाच्या वेळीं रथाची चाल नष्ट झाली असावी असें दिसतें. तथापि चंद्रगुप्ताच्या वेळीं चतुरंग सैन्य होतें. ग्रीक युद्धपद्धतीची छाप या चतुरंग सैन्यावर पडलेली दिसत नाहीं. नंदाच्या पदरीं ८०००० घोडदळ, २००००० पायदळ, ८००० रथ व ६००० हत्ती होते. चंद्रगुप्तानें त्यांत आणखी भरती करून ६००००० पायदळ व ९००० हत्ती अशी आपल्या सैन्याची जय्यत तयारी केल्यामुळें सिल्यूकसचा पराभव तो सहज करूं शकला. तथापि त्याचें घोडदळ मात्र सारें ३०००० च होतें. अर्थशास्त्रांतील नियमांप्रमाणें १०० लोकांची एक तुकडी व १००० चें एक पथक होत असे, व त्याच पद्धतीस अनुसरून चंद्रगुप्ताच्या काळची सैनयाची व्यवस्था सहा खात्यांमध्यें वांटलेलीं होती. या खात्यांचीं नांवें येणेंप्रमाणें:- आरमार खातें, वाहतुक व मुदपाक खातें, पायदळ खातें, रिसाला, गजशाला व रथखातें. यांपैकीं प्रत्येक खात्याची व्यवस्था पंचायतीकडे असून प्रत्येक पंचायतींत पांच पांच इसम असत.
क ड क शा स न प द्ध ति.- चंद्रगुप्ताची शासनपद्धति फार परिणामकारक होती. त्या वेळीं दण्डनीति फार प्रचारांत होती व चंद्रगुप्तानेंहि याच पद्धतीचा अवलंब केला होता. ग्रीक लोकांनीं त्या वेळची जी माहिती लिहून ठेवलेली आहे तिजवरून देखील हेंच अनुमान दृढ होतें. गुन्ह्याबद्दल कडक शिक्षा फर्मावण्यांत येत असे, व दंड ठोठावून खजिन्याची भरती करण्यांत येत असे. ४,००,००० लोकांच्या छावणीमध्यें दररोज १००।१२५ रुपयांपेक्षां जासत चोरी होत नसे व तिजबद्दल देखील कडक शासन होत असे असें मिगॅस्थिनीझनें लिहिलें आहे.
शि क्षा.- एखाद्या मनुष्यावर चोरीचा आरोप आला असतां त्याचे हाल हाल करून त्याच्याकडून खरी हकीकत काढून घेण्यांत येत असे. खात्रीलायक पुराव्याशिवाय चोराला शिक्षा देण्यांत येऊं नये असें चाणक्याचें मत असलें तरी शिपायांकडून होणा-या छलामुळें निरपराध्याला कबुली जबाब देणें भाग पडून शिक्षा भोगावी लागे. चाणक्यानें छलाचे १८ प्रकार वर्णन केले आहेत व ते दररोज निरनिराळ्या रीतीनें उपयोगांत आणावेत असें लिहिलें आहे. एखाद्या मनुष्यांवर अपराध शाबीत झाला असतां दंड, अवयवच्छेदन अगर देहान्त शिक्षा या प्रकारच्या शिक्षा देण्यांत येत असत. या शिक्षा ठोठावतांना अपराध्याच्या जातीकडेहि लक्ष पुरवण्यांत येत असे. एखादा अपराधी ब्राह्मण असल्यास त्याचें हाल करण्यांत येत नसत, पण त्याला हद्दपारीची शिक्षा ठोठावण्यांत येत असे. तसेंच श्रीमंत, गरीब, कुलीन अगर हलका इकडेहि लक्ष पुरविण्यांत येत असे. चाळीस पन्नास पणांच्या सुद्धां चोरीबद्दल देहान्त शिक्षा ठोठावण्यांत येत असे. तसेंच घर फोडल्याबद्दल, मनुष्यवधाबद्दल, किंवा राजाच्या मालमत्तेचा नाश केल्याबद्दलहि देहान्त शिक्षा देण्यांत येत असे. कर न देण्याबद्दल सुद्धां जबर शिक्षा होत असत. अशोकाच्या कारकीर्दीतहि या शिक्षांमध्यें कांहीं बदल झाला नाहीं असें दिसतें.
एखाद्या निरपराधी मनुष्याच्या छलाबद्दल अधिका-याला ४८ पणांचा दंड करावा व एखाद्या निरपराध्याचा हाल हाल करून वध केल्याबद्दल १००० पणांचा दंड करावा असें अर्थशास्त्रांत लिहिलेलें आहे.
ना ग र क आ णि प्र जा ग ण न.- लहानशा राज्याचे चार प्रांत करून प्रत्येक प्रान्तावर एक एक अधिकारी नेमावा असें अर्थशास्त्रांत लिहिलेलें आहे. हेंच तत्त्व राजधानीस व इतर मोठ्या शहरांनांहि लागू आहे. राजधानीचे चार भाग पडून त्या प्रत्येक भागावर एक एका 'स्थानिका' ची नेमणूक होत असे. या स्थानिकांनां मदतगार म्हणून १० पासून ४० घरांवर देखरेख करणारे 'गोप' नेमले जात असत. सर्व शहराची व्यवस्था 'नागरका' कडे असे, शहर अधिका-यांच्या वर 'प्रस्थित' व 'आगत' अशा सर्व माणसांवर नजर ठेवण्याची जबाबदारी असे. प्रत्येक गोपाला त्याच्या ताब्यांतल्या घरांतील मंडळींच्या, कुलाची, गोत्राची, उत्पन्नाची व खर्चाची पूर्ण माहिती असली पाहिजे. यामुळें मध्यवर्ती सत्तेला एखादा कर वाढवण्यास अगर इतर रीतीनें पैसे काढण्यास सोपें जात असे. प्रजागणनाचें कामहि याच अधिका-याकडे असे. आग लावणा-या मनुष्याला त्याच आगींत लोटून देण्याची शिक्षा होत असे. नगरारोग्याचें काम हेच अधिकारी पहात असत.
मौ र्यां च्या वे ळ चें न ग रा धि का री मं ड ळ.- चंद्रगुप्ताच्या साम्राज्यांतील नगराधिकारीमंडळाची व्यवस्था अधिक गुंतागुंतीची होती. हें अधिकारीमंडळ तीस लोकांचें असून त्याच्या हसा पोटकमिट्या होत्या. त्यांचीं कामें येणेंप्रमाणें:- (१) उद्योगधंद्याच्या कला; (२) परकीयांची बरदास्त; (३) जननमरणाची नोंद; (४) फुटकळ विक्री, विनिमय, वजन व मापें यांवर देखरेख व विक्रीच्या मालावर देखरेख; (५) तयार झालोल्या व विकलेल्या मालावर देखरेख; व (६) विक्रीच्या मालावर एकदशमांश हिस्सा गोळा करणें.
वरील व्यवस्थेची रूपरेषा जरी पाहिली तरी मौर्यकालीन नगरव्यवस्था फारच उच्च दर्जाची होती असें दिसून येईल; व त्यांतील बारीकसारीक अंतर्व्यवस्थेचें बारकाईनें परीक्षण केल्यास अशी उत्कृष्ट व्यवस्था ख्रिस्ती शकाच्या आरंभाच्या ३०० वर्षे अगोदर अस्तित्वांत हाती याबद्दल कौतुक वाटतें. कारण अकबराच्या वेळीं देखील अशी व्यवस्था नव्हती व ग्रीक नगरराज्यांत इतकी व्यवस्था असेल किंवा नाहीं याची शंकाच आहे.
क ला.- कलानिपुण कारागीर हे सरकारी नोकर म्हणून समजले जात असत, व त्यांनां जर कांहीं अपाय केला गेला तर अपाय करणा-याला जबर शिक्षा देण्यांत येत असे. या खात्यावरील अधिकारी लोकांकडेच कारागिरांचा पगार व कामाच्या वेळा ठरविणें, सामानाचा पुरवठा इत्यादि कामें असत.
प र की य लो क.- परराष्ट्रमंत्र्यांच्या मंडळाकडे, परस्थ लोकांची राहण्याची व्यवस्था करणें, त्यांच्यावर नजर ठेवणें, त्यांची योग्य त-हेनें पोंचवापोंचव करणें, व आजारी पडल्यास त्यांची काळजी करणें इत्यादि कामें असत. या खात्याच्या आस्तित्वावरून मौर्य राजांचें परराष्ट्रांशीं बरेंच दळणवळण असावें असें दिसतें.
ज न न म र ण.- जननमरणाच्या नोंदीचें खातें सरकारला कर बसविण्याचें काम सोपें व्हावें व तसेंच माहितीहि कळावी या हेतूनें अस्तित्वांत आलें होतें.
व्या पा र आ णि ज का त.- सर्व हिंदुस्थानांतील राजांची फार प्राचीन काळापासून या बाबतींत एकच पद्धत होती. खासगी मालावर पूर्ण नजर ठेवून त्यावर जकात बसविण्याची व अशा रीतीनें सरकारी मुद्रा मारण्याची चाल होती. ही मुद्रा हिंगुळाच्या रंगाची असे. चाणक्यानें याला अभिज्ञानमुद्रा असें म्हटलें आहे. माल तयार करणा-यानें कर देण्याचें नाकारल्यास त्याला जबर शिक्षा होत असे.
रा ज प्र ति नि धी.- अर्थशास्त्राप्रमाणें लहानशा राज्याचे सुद्धां चार प्रांत पाडून प्रत्येक प्रांताला एकेक अधिकारी असावा असा नियम होता. यावरून चंद्रगुप्ताच्या अवाढव्य साम्राज्याची व्यवस्था पहाण्याला बरेच अधिकारी असावेत पण अशोकाच्या पदरीं एवढ्या साम्राज्याची व्यवस्था चार राजप्रतिनिधीच पहात असत.
खा ते वि भा ग णी.- राज्याचा कारभार सुरळीत चालण्यासाठीं अर्थशास्त्रांत अनेक खातीं पाडण्याविषयीं चाणक्यानें प्रतिपादिलें आहे. अर्थशास्त्रांत सुमारें तीस खातीं पाडलेलीं आहेत. पण्याधक्ष, कुप्याध्यक्ष, नावध्यक्ष तसेंच सूताध्यक्ष, शुल्काध्यक्ष, आकराध्यक्ष, इत्यादि निरनिराळ्या खात्यांचे अध्यक्ष नेमलेले आढळून येतात. विशेष माहिती अर्थशास्त्रावरून कळेल.
लां च लु च प ती चे प्र का र.- वरीलप्रमाणें चोख व्यवस्था व उत्तम देखरेख असतांना सुद्धां लांचलुचपतीचे प्रकार राज्यांत चाललेले असावेत असें दिसतें. स्वतः चाणक्यानेंच असें म्हटलें आहे.
'यथा ह्यनास्वादयितुं न शक्यम् । जिव्हातलस्थं मधुवा विषंवा ।
अर्थस्तथाह्यर्थचरण राज्ञः । स्वल्पोऽप्यनास्वादयितुं न शक्यः ॥१॥
मत्स्या यथान्तः सलिले चरन्तो । ज्ञातुं न शक्याः सलिलं पिबंतः ॥
युक्तास्तथा कार्यविधौनियुक्ताः । ज्ञातुं न शक्या धनमाददाना ॥२॥
अपि शक्या गति र्ज्ञातुं पततां खे पतत्रिणामान तु प्रच्छन्नभावानां युक्तानां चरतां गतिः ॥३॥
(अर्थशास्त्र पान ७०)
यानंतर या लांचलुचपतीचे ४० प्रकार आहेत असें सांगितलेलें आहे. लांचलुचपती जो उघडकीला आणील त्यास मोठें बक्षिस ठेवलेलें असे.
हे रां चें खा तें.- सैन्याच्या खालोखाल हेरांच्या खात्यांचें महत्त्व असे. अनेक वेषांमध्यें हेर नेमलेले असत; व एकंदरीने अलीकडील जर्मन हेरखात्याप्रमाणें हेरांची व्यवस्था असे. खबुतरांच्या कडूनहि काम चालविलें जात असे. अर्थशास्त्रामध्यें हेरखात्याचें महत्त्व वर्णन केलेलें आहे. ग्रीक प्रवाश्यांनीं देखील त्यावेळीं हेरांचें किती महत्त्व होतें हें सांगितलें आहे. प्रांतिक ठिकाणांहून मुख्य सरकारकडे सर्व बातमी पाठविली जात असे; व वेश्यांनांहि हें काम दिलें जात असे. राजानें या हेरांच्या साहाय्यानें आपल्या प्रजेवर नजर ठेवावी असें अर्थशास्त्रांत म्हटलेलें आहे.
ज मि नी व री ल स त्ता.- जमिनीवरील सत्ता प्राचीन हिंदुस्थानांत कोणाकडे असे याचा उलगडा होत नाहीं. डूबॉयनें असें लिहिलें आहे कीं, 'मलबारशिवाय इतर ठिकाणीं राजाची जमिनीवर सत्ता असतें;' व हेंच मत हल्लीं मान्य झालेलें आहे; पण अर्थशास्त्रामध्यें तर असें स्पष्टच म्हटलें आहे कीं, 'श्रुतिस्मृतिवेत्त्यांनीं असें सांगितलें आहे कीं राजा हा जलस्थळांचा स्वामी आहे.' राजानें जमिनी, कर देणा-या मनुष्याला त्याच्या हयातीपर्यंतच द्याव्या. 'करदेभ्यः कृतक्षेत्राणि ऐकपुरुषिकाणि प्रयच्छेत् ।' असेंहि त्यांत स्पष्ट म्हटलें आहे. व जमिनी व पेरणा-यापासून त्या राजानें काढून घेऊन दुस-याला द्याव्या 'अकृषतामाच्छिद्यान्येभ्यः प्रयच्छेत' असें वचन आहे.
ज मी न म ह सू ल.- जमीन महसूल म्हणजे जमीनीसाठीं राजाला द्यावा लागणारा कर होय. राजाला चौथा हिस्सा द्यावा लागत असे. मौर्याच्या वेळीं धारेबंदीची पद्धत अस्तित्त्वांत होती किंवा नाहीं हें ऊन निश्चित नाहीं.
पा ट बं धा -या चें खा तें.- हिंदुस्थानांत पिकाला पाण्याची फार जरुरी असल्याकारणानें त्याच्याकडे फार लक्ष पुरविले जात असे. कालवे काढण्याची पद्धत अंमलांत होती व पाण्यावरील कर ठरलेला होता.
र स्ते.- मुख्य मुख्य रस्ते उत्तम रीतीनें बांधले जात असत आणि अंतर मोजण्याचे खांबहि उभारलेले असत. अर्थशास्त्रामध्यें रस्ते बांधणें हें राजाचें कर्तव्य म्हणून म्हटलें आहे व त्याच्या लांबीरुंदीचेहि नियम दिलेले आहेत. मौर्यांच्या वेळीं तक्षशिला व पाटलीपुत्र यांमध्यें मोठा राजरस्ता होता.
म दि रा पा न.- मदिरापान व विक्री यांनां मुळींच प्रतिबंध नव्हता. यावर व्यवस्था ठेवण्यासाठीं एक सुराध्यक्ष नेमलेला असे; व तो मदिरापानासंबंधींचा व विक्रीचा परवाना देत असे; व सरकारी कर वसूल करीत असे. दारूचे गुत्ते जवळ जवळ नसत; व दुकानांची व्यवस्थाहि चांगल्या प्रकारची ठेवावी लागत असे. 'पानागाराणि अनेक कक्ष्याणि विभक्तशयनासनवन्ति, पानोद्देशानि गन्धमाल्योदकवन्त्यृतुसुखानिकारयेत् ।' चाणक्यानें दारूचे सहा प्रकार वर्णन केलेले आहेत. उत्सवाच्या वेळेला व यात्रेच्या दिवशीं विशेष प्रकारचे परवाने मिळत असत. 'उत्सवसमायात्रासुचतुरहस्सौरिको देयः ।'
वर दिलेल्या एकंदर हकीकतीवरून मौर्यकालीन राज्यव्यवस्था कशा प्रकारची होती हें सहज दिसून येईल. अशा प्रकारची चोख व नमुनेदार व्यवस्था दोन अडीच हजार वर्षांपूर्वी होती हें वाचून सर्वांनां आश्चर्यच वाटेल. या सर्व माहितीचें प्रतिबंध आपणांला अर्थशास्त्रांत पहावयास मिळतें. अर्थशास्त्र हें त्यावेळच्या राज्यव्यवस्थेचें प्रतिबिंब आहे यांत शंका नाहीं. थोडक्या अपराधाबद्दल जबर शिक्षा, व हेरखात्याचें महत्त्व यामध्यें दिसून येत असल्यामुळें स्मिथ साहेबांनां फार राग आलासा दिसतो. पण प्रत्यक्ष ब्रिटिश राज्यांत देखील तोच प्रकार आढळून येतो. असो. अर्थशास्त्रावरून व इतर थोड्याशा प्रमाणांवरून मौर्यकालीन राज्यव्यवस्था फार उत्कष्ट प्रकारची होती असें प्रत्येकाला वाटल्यावांचून रहाणार नाहीं.