प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २६ वें.
यूरोपीय इतिहास व जागतिक इतिहास.
बिस्मार्क व जर्मन साम्राज्य.- पण १८६३ मध्यें पोलंडमध्यें बंडाळी होऊन फ्रान्सला आतांपर्यंत अनुकूल असा वहाणारा बारा प्रतिकूल वाहूं लागला. नेपोलियनला आपल्या प्रजेच्या आग्रहामुळें पोल लोकांचा पाठिराखा म्हणून पुढें यावें लागलें रशिया व ग्रेट ब्रिटन यांच्याशीं त्याचें वांकडें आलें. प्रशियानें रशियाला पोल लोकांचा पाडाव करण्याला मदत दिल्यापासून त्याचें वजन वाढलें. या वेळीं बिस्मार्क हा प्रशियाचा धुरीण होता. यूरोपियन राष्ट्रसंघाला कोणी विचारीत नव्हतें. डेन्मार्कचा सातवा फ्रेडरिक वारल्यावर श्श्लेसविन-होलस्टीनसंबंधीं प्रश्नाला तोंड लागलें. जर्मनी व डेन्मार्क यांमध्यें एल्ब डचीसंबंधानें तंटा उपस्थित झाला. एका बाजूला जर्मनी व दुस-या बाजूला सर्व यूरोप अशी स्थिति प्राप्त झाली. पण फ्रान्स व ग्रेटब्रिटन यासारख्या राष्ट्रांनीं सुद्धां पोलंड प्रकरणाच्या वेळेप्रमाणें शाब्दिक निषेधापलीकडे आस्ट्रिया-प्रशियाचें कांहीं एक केलें नाही. अशा रीतीनें प्रशियाचें बाल्टिक समुद्रांत वर्चस्व स्थापन झालें. या डेनो-जर्मन युद्धानंतर आस्ट्रो-प्रशियन युद्ध सुरू झालें (१८६६) व प्रेगच्या तहानें जर्मनीपासून आस्ट्रिया विभक्त होऊन प्रशियाच्या अधिपत्याखालीं उत्तरजर्मनसंघाची स्थापना झाली. इतकेंच नव्हे तर उत्तर समुद्रांत जर्मन सत्तेचा पाया दृढ होऊन भविष्यकाळीं इंग्लंडशीं होणा-या स्पर्धेचें बीज पेरलें गेलें.
प्रशियाची मोठ्या झपाट्यानें होणारी वाढ पाहून नेपोलियनला भीति पडली. तेव्हां त्यानें फ्रान्सची -हाईनची सरहद्द मिळविण्याचा तडजोडीचा प्रयत्न करून पाहिला. पण तो सिद्धीस गेला नाहीं. त्याचे इतर सरहद्द वाढविण्यासंबंधींचे बेतहि असेच फसले. जर्मनीशीं लढाई करण्याविषयीं त्याच्या प्रजेच्या त्याच्यामागें तगादा लागला; तेव्हा नाइलाजानें १९ जुलै १८७० या दिवशीं त्यानें जर्मनीबरोबर युद्ध पुकारलें. दक्षिण जर्मन संस्थानें व आस्ट्रिया यांकडून आपणाला मदत मिळेल ही नेपोलियनची आशा निष्फळ होऊन २ सप्टेबरला त्याला प्रशियास शरा जावें लागलें. पुढें फ्रेंच साम्राज्य नष्ट होऊन एक तात्पुरतें प्रजासत्ताक राज्य फ्रान्समध्यें स्थापण्यांत आलें. अलसेस लोरेन प्रांत जर्मनीला देऊन तह करण्यांत आला (१८७१).
या वेळीं हें जे जर्मन साम्राज्य बळावलें तें पुढें परवांच्या महायुद्धापर्यंत तसेंच टिकलें, इतकेंच नव्हे तर सर्व यूरोपवर त्यानें वचक बसविला. यूरोपच्या प्रादेशिक व्यवस्थेंत मोठी उलाथापालथ घडून आली. मुख्यतः १८६६ च्या युद्धानें आस्ट्रियन राजसत्तेची पुनर्घटना झाली, इटली संयुक्त होऊन स्वतंत्र राजयपद पावला; व पोपांची ऐहिक सत्ता लयास गेली. फ्रान्सच्या पाडावामुळें झालेली दुसरी विशेष गोष्ट म्हणजे १८५५ च्या पॅरिसच्या तहांत काळ्यासमुद्रासंबंधीं ज्या अटी रशियावर लादल्या गेल्या, त्या त्यानें आतां झुगारून देण्याचा बेत केला. या कामीं बिस्मार्कची त्याला फूस होती. ग्रेट ब्रिटननें अंतराष्ट्रीय विश्वासघाताच्या मुद्दयावर याचा इनकार केला. पण बिस्मार्कनें १८७१ मध्यें लंडन येथें एक परिषद भरवून मोठ्या मुत्सद्देगिरीनें यावर पाघरूण घातलें. असो.
जर्मनीला आपलें साम्राज्य चांगलें सुसंघटित होईपावेतों कोणा प्रतिस्पर्ध्याशीं टक्कर देण्याचें टाळणें भाग होतें. व या दिशेनें प्रयत्न म्हणून रशिया व आस्ट्रिया यांच्याशीं होती. होइतों तिनें सख्य राखण्याचा प्रयत्न केला. रशियापासून फारशी भीति नव्हती; कारण त्यानें बिस्मार्कला वेळोवेळीं त्याचे धाडसी बेत सफळ करण्याला मदतच केली होती व बिस्मार्कहि हें जाणून रशियाशीं वागत असे. पण आस्ट्रिया मात्र फ्रान्सचा पाडाव होईपावेतों जर्मनीवर दांत ओठ खात होता. पण पुढें आपली एकाकी स्थिति लक्षांत घेऊन त्यानेंहि बिस्मार्कशीं स्नेह केला. १८७२ मध्यें रशिया व आस्ट्रिया यांचे बादशहा बर्लिनच्या विल्यम बादशहहाला भेटण्यास आले व त्या ठिकाणीं बराच खल होऊन एकमेकांनीं एकमेकांला युद्धप्रसंगीं मदत देण्याचें ठरलें. अशा रीतीनें या दोन बलिष्ठ बादशहांची मैत्री नवजर्मनसाम्राज्याच्या प्रगतीला हितावह झाली.
हा या राष्ट्रांमध्यें झालेला सलोखा फार दिवस टिकणारा नव्हता. प्रत्येक जण आंतून स्वहितार्थ दुस-याला लुबाडण्याची मसलत करीतच होता, पण वरून मात्र स्नेह दाखवीत होता. फ्रान्सच्या बाबतींत रशिया व जर्मनी यांचा मतभेद होता. जर्मनीच्या मनांत फ्रान्सला जास्त खच्ची करावयाचा होता पण रशियाचें म्हणणें असें होतें कीं, जर्मन साम्राज्याच्या वेसण म्हणून फ्रान्स जोरकस राहिलेंच पाहिजे. तेव्हां रशियानें व ग्रेट ब्रिटननेंहि फ्रान्स करितां विल्यम बादशहाशीं रदबदली केली व त्यामुळें फ्रान्स बचावला व यूरोपची शांतता यावेळीं भंग पावली नाहीं. पण बिस्मार्कच्या मनांत रशियाविषयीं तेढ उत्पन्न होऊन तो रशियाला फ्रान्सच्या शत्रुत्वांत आपला मित्र म्हणून गणीना.
१८७५ च्या उन्हाळ्यांत हर्झेगोव्हिनामध्यें ख्रिस्ती स्लाव्ह लोकांनीं बंड केले. त्याला माँटेनिग्रो आणि सर्व्हिया यांनीं पाठबळ दिलें व रशिया आणि आस्ट्रिया यांचीहि आंतून सर्व्हियामाँटेनिग्रोला फूस होती. जेव्हां तुर्कसरकार व हे देश यांची लढाई जुंपली तेव्हां रशिया आणि आस्टिया यांनीं १८७६ मध्यें आपआपसांत करार करून लढाईचा शेवट बरावाईट झाल्यास काय करावयाचें तें ठरविलें. पण जेव्हां आपल्या संरक्षणाखालीं असलेल्या राष्ट्रकांचा पराभव होत आहे असें रशियानें पाहिलें तेव्हां तो त्यांच्या मदतींस धांवला. पण यामुळें लढाई थांबून तह झाला, व आस्ट्रो-रशियन करार रद्दी ठरला. हा करार बाजूला सारण्याला दुसरेंहि एक मोठें कारण झालें.
१८७६ च्या जून महिन्यांत तुर्की लोकांनीं बलयेरियांतील बंडाळी, भयंकर कत्तल व जुलूम करून जेव्हां मोडली तेव्हां यूरोपांतील सर्व राष्ट्रांनीं तुर्कस्थानाला तळ्यावर आणण्याचा व त्याच्या हस्तें देशांत सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला पण तो फसला. तेव्हां रशिया एकटा या कार्यास उद्युक्त झाला. त्यानें प्रथम जर्मनी व आस्ट्रिया यांचा पाठिंबा मिळविला, मग आशियामायनर व यूरोपमधील तुर्की मुलखावर हल्ला करून तुर्कांनां तह करणें भाग पाडलें. या सॅन स्टेफॅनोच्या तहाचीं कलमें आस्ट्रियाला न आवडून त्यानें यूरोपियन काँग्रेस जो निकाल देईल तो आपण मान्य करूं असा हेका धरिला. ग्रेट ब्रिटननेंहि त्याचा अनुवाद केला. बिस्मार्क ऑस्ट्रियाची समजूत पाडण्याला तयार होईना.
तेव्हां या प्रसंगीं रशियाची स्थिति फार चमत्कारिक झाली. आस्ट्रिया व इंग्लंड एक झालें तर कॉन्स्टंटिनोपलमधील आपल्या सैन्याशीं दळणवळण ठेवतां येणार नाहीं, कारण जलमार्ग इंग्लंडनें व स्थलमार्ग आस्ट्रियानें आपल्या ताब्यांत ठेविला होता. अशा वेळीं त्यानें इंग्लंडशी गुप्तपणें करार केरून बर्लिनकाँग्रेसची बैठक घडवून आणली. या बैठकींत सॅनस्टेफॉनो तहामध्यें थोडाफार फरक करण्यांत आला. रशिया व आस्ट्रिया, यांनां पाहिजे होते ते मुलुख मिळाले, सायप्रस ब्रिटिशांकडे आलें, पण रशियाला बिस्मार्कच्या तटस्थपणाचा बराच राग आला व त्यांच्यांतील सख्याचा तह मोडून उलट एकमेकांविरूद्ध दुस-या राष्ट्रांची मदत दोघेहि पाहूं लागले.
हा सख्यांत पडलेला बिघाड दोघांनांहि अनिष्ट असल्यानें १८८१ सालीं नवा रशियन बादशहा तिसरा अलेक्झांडर यानें जर्मनी व आस्ट्रिया या दोघांशींहि गोडींचें वर्तन ठेवून तीन वर्षांनीं पुढें होणा-या ''त्रिसम्राट संघाचा (थ्री एम्परर्स लोग)'' पाया घातला.