प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २६ वें.
यूरोपीय इतिहास व जागतिक इतिहास.

राज्यक्रांत्यांची लाट.- अशा रीतीनें यूरोपभर शांतता नांदावी म्हणून प्रयत्न झाले, संघ स्थापन झाले, काँग्रेस सभा भरविल्या परंतु कांहीं उपयोग झाला नाहीं. राष्ट्रसंघांनीं आपली पराकाष्ठा केली पण व्यर्थ. यूरोपांत पुन्हां पूर्वींसारखी अंतराष्ट्रीय अराजकता शिरूं लागली. कॅनिंगला ही गोष्ट पसंत पडली. प्रत्येक राष्ट्र स्वतःकरितां आहे एक दुस-याकरितां नाहीं. ईश्वर मात्र सर्वांकरितां आहे. राष्ट्राराष्ट्रांत उघडपणें चढाओढ असणें ही त्यांच्या उत्कर्षाला आवश्यक आहे असे त्याचें मत असे. अठरावें व एकोणविसावें शतक यांतील स्पर्धामध्यें अति महत्त्वाचा फरक ''राष्ट्र'' या कल्पनेंत होता. कॅनिंग व व्हिएन्ना येथें जमलेले मुत्सद्दी यांनीं ''राष्ट्र'' याचा अर्थ ''राज्य'' असाच केलेला होता. राष्ट्राच्या मर्यादा तहांनीं निश्चित केल्या असतील त्या समजावयाच्या व त्या पाळणें प्रत्येकाचें कर्तव्य होऊन बसतें. पण १९ व्या शतकांत या तहानें व्हिएन्ना येथील उभारलेली राजकीय इमारत मोडून पडली व पुढल्या पिढीपुढें न सुटलेले व कधीं न सुटणारे असे प्रश्न मांडून ठेविले. याच तत्त्वाला अनुसरून दक्षिण अमेरिकेंतली प्रजासत्ताक संस्थानांची स्वतंत्रता मान्य केली व ग्रीक बंडखोरांचे लढाऊ हक्क कबूल केले. मेटरनिक या तत्त्वाचा जबरदस्त पुरस्कर्ता होता. १८३० सालीं फ्रान्समध्यें जी राज्यक्रांति होऊन मध्यमवर्गीय शासनसंस्था स्थापन झाली त्याचें कारण राष्ट्रसंघानें यूरोपांत घडवून आणलेल्या शांततेमुळें देशांतील आर्थिक स्थिति सुधारून मध्यम वर्गाचे लोक वजनदार व महत्तवाकांक्षी झाले. जर्मनी व इटली यांनीं राज्यक्रांतींत फ्रान्सचें अनुकरण करण्याचा यत्न केला. परंतु त्यांनां यश आलें नाहीं. कारण त्यांची आर्थिक स्थिति फारशी सुधारली नव्हती. पण बेलजियम मात्र स्वतंत्र झाला (१८१५). ग्रेटब्रिटननें १८३२ सालीं 'रीफार्म बिल' पास केलें म्हणून त्यांत दंगाधोपा झाल नाहीं. १८३१-१८४१ पर्यंतच्या यूरोपांतल्या अंतराष्ट्रीय राज्यव्यवहारांत दोन गोष्टींमुळें मुख्यतः अनिष्ट फरक घडून येत होते.

(१) फ्रान्स आणि ग्रेट ब्रिटन या पश्चिमेकडील राष्ट्रांचा रशिया, आस्ट्रिया व प्रशिया या पौर्व राष्ट्रांशी विरोध;
(२) इजिप्तचा बादशहा महंमदअल्ली यानें बंड केल्यामुळें पूर्वेकडील प्रश्नांत उडालेला गोंधळ.