प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २६ वें.
यूरोपीय इतिहास व जागतिक इतिहास.
यूरोपीय राष्ट्रे व जगाची विभागणी.- या सलोख्याच्या परिणामासंबंधीं फ्रेंच लोकांनां जी मोठी आशा वाटत होती ती फलद्रूप झाली नाहीं. १९०४-०५ च्या रूसो -जपान युद्धानें रशिया अति निर्बल झाला व त्याचें यूरोपातील श्रेष्ठ स्थान जर्मनीकडे गेलें. तेव्हां फ्रान्सला असा दुर्बल मित्र काय कामाचा असें साहजिकच वाटून त्याच्या जागीं जर्मनी व इंग्लंड यांपैकीं कोणाला बसवावें हा विचार त्याला पडला. कोणाशींहि सख्याचा करार केला तरी नुकसानी सोसावी लागणारच. जर्मनीशीं सख्य केल्यास अलसेस व लोरेन हे आपले प्रांत परत मिळविण्याची आशा सोडावी लागणार व इकडे इंग्लंडकडे वळल्यास इजिप्तवरील त्याचें वर्चस्व कबूल करावें लागणार; तेव्हां या पेंचांत सांपडून शेवटीं फ्रान्सनें इंग्लंडशीं १९०४ मध्यें एक सामान्य करार केला व त्याअन्वयें इजिप्तमध्यें त्याला मोकळीक दिली; उलट इंग्लंडनें फ्रान्सला मोरोक्केंत स्वतंत्रता ठेविली.
अशा रीतीनें यूरोपखंडंतील राष्ट्राचें दोन वर्ग पडून, यूरोपांत शांतता व सत्तासमता राहिली. याचा परिणाम असा झाली कीं १९ व्या शतकाच्या अखेरपर्यंत वारंवार जी कांहीं भांडणें वगैरे उपस्थित झालीं त्यांची मीमांसा नीट लागली. यांत जे कांहीं महत्त्वाचे प्रश्न अंतर्भूत झाले होते त्यांचा निर्देश सविस्तरपणें केलेला बरा.
अ र्मे नि या.- १८७७-७८ च्या रूसोतुर्की युद्धानें अर्मेनियाची बाजू प्रामुख्यानें पुढें मांडिली. सॅन स्टेफॅनो व बर्लिन येथें झालेल्या तहांतून तुर्कीसरकारनें आर्मेनियन लोक रहात असलेल्या प्रांतांची सुधारणा व त्यांचें सर्काशियन व कुर्द लोकांपासून संरक्षण करण्याबद्दल कबूली दिली होती, पण तीप्रमाणें तुर्की सरकारची वागणूक मुळींच दिसेना. मुसुलमान व अर्मेनियन यांचें हाडवैर असल्यासारखें झालें. शिवाय आर्मेनियननांमध्यें जागृत होणारी राष्ट्रीयत्वाची भावना व त्यांचें संरक्षण करण्याची इतर यूरोपीय राष्ट्रांनीं पत्करलेली जबाबदारी यामुळें तर सुलतानाला ते साम्राज्याचे शत्रू असे भासूं लागले. पुष्कळ वर्षेंपर्यंत या गांजणुकीची उपेक्षा केल्यावर व आपल्या हितचिंतकांनां आपली पाठीराख करितां येत नाहीं असें पाहून आर्मेनियनांनीं बंड केलें. त्याचा परिणाम म्हणजे, १९७६ मध्यें बल्गेरियनांप्रमाणे यांचीहि कत्तल करण्यांत आली; पण बल्गेरियनांना मिळालें त्याप्रमाणें स्वांतत्र्य मात्र यांस मिळालें नाहीं. १८९५-९६ मध्यें ही जी अर्मेनियनांची कत्तल कॉन्स्टंटिनोपल व आशियामायनर मधील अनेक शहरें यांतून करण्यांत आली तिची वार्ता सर्वत्र पसरून सुलतानाला पुन्हां युद्धाचा धाक घालण्यांत आला. इंग्लंड व इटली यांनीं या कामीं पुढाकार घेतला. इतर राष्ट्रें मात्र कोरडी सहानुभूति व्यक्त करूं लागली. अशा स्थितींत सुलतानाला कांहींच जरब बसली नाही. कांहीं कागदी सुधारणा करून या यूरोपीयन राष्ट्रांनां त्यानें गप्प बसविलें. आर्मेनियनांचा छळ कमी नव्हे पण जास्तच चालू राहिला. यूरोपियन राष्ट्रांची नांवाची जूट मात्र कायम राहिली व युद्धाचें अरिष्ट टळलें.
क्री ट.- पूर्वेकडची भानगड उपस्थित करण्याचा दुसरा प्रयत्न ग्रीकांनीं केला. १८९७ मध्यें क्रीटबेट ग्रीसच्या राजाच्या अमलाखालीं आणण्याचा प्रयत्न झाला. तेव्हां इतर राष्ट्रांनीं त्याला हरकत घेतली व ग्रीकांनां आपलें सैन्य तेथून परत बोलावण्याविषयीं हुकूम केला पण ग्रीकांनीं तो मानला नाही. तेव्हां तुर्कस्तानानें आपल्या मुलुखांत ग्रीकांनीं प्रवेश केला म्हणून त्यांविरुद्ध लढाईचें शिंग फुंकलें व उभयतीमध्यें थोड्या चकमकीहि उडाल्या. हा रक्तापात टळावा. म्हणून राष्ट्रसंघानें मोठी खटपट करून तह घडवून आणला. या प्रमाणें दुस-यांदा या यूरोपीयन राष्ट्रसंघानें शांतता राखण्यांत यश मिळविलें.
आ फ्रि का.- जगाच्या निरनिराळ्या भागांत आपल्या वसाहती असाव्या अशी सर्व राष्ट्रांनां इच्छा असणारच व तीमुळें प्रतिस्पर्धी उत्पन्न होणारच. तेव्हां आफ्रिकेंत इंग्लंडची फ्रान्स व जर्मनी यांबरोबर वसाहतीसंबंधीं भांडणें झाल्यास नवल नाहीं. फक्त दक्षिण आफ्रिकेशिवाय इतर ठिकाणीं वसाहती स्थापण्याचा इंग्लंडचा मूळ उद्देश नव्हता; फक्त व्यापाराकरितां किना-यावरचीं कांहीं ठिकाणें त्याच्या ताब्यांत होतीं. पण फ्रान्स जेवहां मुलुखगिरी करून व्यापार वाढवूं लागला तेव्हां मात्र इंग्लंडला पूर्वींचें धोरण बदलून फ्रान्सचें अनुकरण करावें लागलें. आफ्रिकेची वाटणी करण्यांत इंग्लंड फ्रान्सला अनेक सवलती ठेवी पण भूमध्य समुद्राचीं दोन प्रवेशद्वारें मात्र आपल्या हातचीं जाऊं देण्याला तें तयार नसे. यामुळें इजिप्त व मोरोक्को यांसबंधीं या दोन राष्ट्रांमध्यें कायम भांडणें चालू राहाण्याची धास्ती होती. १८८२ मध्यें इजिप्तांत उद्भवलेलें आरबी पाशाचें बंड मोडून टाकण्याच्या कामीं इंग्लंडनें फ्रान्सची जेव्हां मदत मागितली तेव्हां फ्रान्सनें ती दिली नाहीं. इजिप्त आपल्या ताब्यांत कायमचें असावें अशी इंग्लंडची इच्छा नव्हती पण फ्रान्सनें तें बळकावूं नये म्हणून इंग्लंडला तें आपल्या संरक्षणाखालीं ठेवणें भाग होतें व या कारणाकरितांच एकदां इंग्लंड व फ्रान्स यांच्या दरमयान मोठें युद्ध होण्याचा प्रसंग आला होता.
मोरोक्को.- मोरोक्कोमध्यें फ्रान्स व इंग्लंड यांमधील चुरस कमी तीव्र होती पण वरच्या इतकीच चिकाटीची व त्रास दायक होती. तेथील सुलतानाच्या राज्याचा आपल्या उत्तर आफ्रिकेंतील फ्रेंच राज्यांत समावेश करण्याबद्दल फ्रान्सची धडपड चालू होती; उलट आपल्या व्यापारी चळवळीस धोका येऊं नये म्हणून फ्रान्सची सत्ता त्या प्रांतांत न बसावी अशी इंग्लंडची खटपट होती. अखेर १९०४ मध्यें इजिप्तप्रमाणें मोरोक्कोसंबंधानेंहि या दोन राष्ट्रांत तडजोड होऊन फ्रान्सला शांततेच्या मार्गानें मोरोक्कोंत सत्ता वाढविण्याची इंग्लंडनें परवानगी दिली. त्यांत जिब्राल्टरच्या दक्षिण किना-यावर मात्र फ्रान्सनें कोणतेंहि तटबंदीचें काम करूं नये अशी अट घातली. पुढें मोरोक्को प्रकरणांत फ्रान्सशीं जर्मनीनें विरोध सुरू केला, पण अखेर १९०९ सालीं त्या दोघांतहि तडजोड झाली. आफ्रिकेंतील मुलुखाच्या वाटणीसंबंधानें जर्मनीबरोबर इंग्लंडचाहि वाद कांहीं काळ चालून अखेर आपसांतील समजुतीनेंच प्रकरण मिटले. १८९० मध्यें व्हेलिगोलंड बेट जर्मनीला देऊन पूर्व आफ्रिकेंत ब-याच सवलती इंग्लंडनें मिळविल्या होत्या. दक्षिण पॅसिफिक महासागरांतील लढ्याचा निकाल १८८६ एप्रिलच्या अँग्लोजर्मन करारानें लावून आस्ट्रेलिया खंडाच्या उत्तर व पूर्व बाजूकडील बेटांवरील सत्ताक्षेत्राबद्दलची वाटणी ठरविण्यांत आली; आणि १८९९ मधील करारानें जर्मनीनें सामोया घेऊन टाँमा आर्चिपेलागोमधील सर्व हक्क सोडून इंग्लंडला दिले.
आ शि या.- आशियामध्येंहि मुलूख मिळवावा व आपआपल्या व्यापारधंद्याकरतां नव्यानव्या बाजारपेठा काबीज कराव्या या अहमहमिकेनें यूरोपमधील राष्ट्रांत वरचेवर तंटे उपस्थित होत आले आहेत. इंग्लंड व रशिया यांच्यामध्यें मध्य आशियावरील सत्तेसंबंधीं वाद चालू आहेत पण उभयतांच्या सरहद्दींच्या मर्यादा ब-याच निश्चित होत गेल्या तसतसे वाद कमी होत आले आहेत. १८७२-७३ मधील मुख्य करार होऊन नंतर १८८७ मधील करार (प्रोटोकोल) व १८९० मधील पामीरच्या सरहद्दीविषयक करारामुळें रूसो-अफगाण सरहद्द पूर्वेस चीनच्या साम्राज्यापर्यंत जाऊन भिडली. व तेणेंकरून रशिया व ब्रिटन यांच्या आशियांतील सरहद्दी निश्चित झाल्या. आशियांतील दुसरें भांडण इंग्लंड व फ्रान्स यांच्यामधलें. १८८५ मध्यें इरावती नदीच्या उगमाकडे प्रदेशांत फ्रेचांनीं पाऊल रोविलें; उलअ इंग्लंडनें शान संस्थानें व थिबा राजाचा मुलूख मिळून पूर्वेकडे मेकांगपर्यंत मुलूख आपल्या साम्राज्यास जोडला. त्यावर फ्रान्सनें इंडो-चायनांतील आपली सरहद्द पश्चिमेकडे पुढें ढकलून सयामच्या राज्यावर १८९३ मध्ये हल्ला चढविला व त्यामुळें इंग्लंडशीं संबंध आला. त्या प्रकरणाचा निकाल उभयतांनीं १८९६ जानेवारीच्या करारानें लावला व मेनाम दरीमधील संस्थान स्वतंत्र ठेवून तेथपर्यंत आपल्या सरहद्दी ठरविल्या. पूर्व चीनमध्येंहि या यूरोपीय राष्ट्रांचा लढा चालू होऊन त्याला अधिक बिकट स्वरूप आलें. चीनबरोबर मोठमोठ्या मुदतीचे करार करून प्रथम जर्मनी, नंतर रशिया व इंग्लंड व शेवटीं फ्रान्सनें चीनच्या मुलुखावर आपआपली सत्ता बसविली. त्या योगानें चिनी सरकारांत व चिनी लोकांत बरीच खळबळ उत्पन्न होऊन अखेर बॉक्सर बंड उद्भवलें व त्यामुळें १९०० मध्ये डेकीनमधील परराज्यांच्या वकिलातीवरहि हल्ले झाले.
१८९९-१९०१ मध्यें दक्षिण आफ्रिकेमध्यें बोअर युद्ध सुरू होऊन यूरोपमधील राष्ट्रांतील संबंध बिघडण्यास आणखी एक कारण उपस्थित झालें. यूरोपमधील बहुतेक देशांत इंग्लंडबद्दल प्रतिकूल मत माजून त्या संधींत ब्रिटिश साम्राज्याविरूद्ध भांडणारा राष्ट्रांचा एक संघहि बनेल असें चिन्ह दिसूं लागलें. परंतु ब्रिटिश सरकारच्या निश्चयी धोरणामुळें व वसाहतवाल्यांची साम्राज्यनिष्ठ अचल असल्यामुळें कोणतेंहि यूरोपीय राष्ट्र बोअर लोकांचा पक्ष घेण्यास धजावलें नाहीं, इतकेच नव्हे तर बोअर लोकांच्या मुलुखांत स्वांतत्र्य पण अंदाधुंदी माजून राहिल्यानें कोणत्याहि यूरोपीय राष्ट्राचें त्यांत हित नाहीं असेंहि सर्वांस मान्य झालें.