प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २६ वें.
यूरोपीय इतिहास व जागतिक इतिहास.

यूरोपपूर्वस्थ देशांच्या प्रश्नाची पुन्हां उचल.- वरील सर्व प्रश्नांपेक्षां मासिडोनियांतील अस्वस्थतेविषयींचा प्रश्न फार बिकट होता. येथें ग्रीक, बल्गेरियन व सर्व्हिवन या तीन प्रमुख बाल्कन जातींमध्यें आपसांत मोठें वैर माजलें होतें. शिवाय तिकडील मुलुखासंबंधानें यूरोपांतील बड्या राष्ट्राराष्ट्रांची व मुसुलमानांची चुरस होतीच. १९०३ मध्यें रशिया व आस्ट्रिया यांच्यामध्यें कांहीं करारमदारहि झाले पण त्यांचा उपयोग झाला नाहीं. ग्रीक सैन्यानें व बल्गेरियन सैन्यानें खेड्यापाड्यांतील गरीब लोकांच्या कत्तली केल्या; त्यामुळें १९०८ मध्यें एकंदर प्रकरण हातघाईवर आलें. बड्या यूरोपीय राष्ट्रांनीं आटोमन अधिका-यांच्या सहाय्यानें मध्यें पडण्याचा प्रयत्न केला, परंतु तुर्की सरकारनें विरोध केला. मुसुलमानी सत्ता झुगारून देण्याच्या उद्देशानें चालू असलेल्या वरील ख्रिस्ती लोकांतील आपसांतील कत्तली स्वस्थपणें पहात बसणें सुलतानास पसंत पडलें याबद्दल त्याच्याकडे दोष नाहीं. स्वतःचे हक्क नाहींसे करण्यास सुलतानाची मदत मिळणें शक्य कसें होणार? मासिडोनियावर सुलतानानेंच मुसुलमान गव्हर्नर नेमावा व जरूर तर त्याला काढून टाकण्यांचा अधिकार यूरोपीय राष्ट्रास असावा ही इंग्लंडची सूचनाहि कोणास मान्य होईना.

अशा परिस्थितींत १९०८ आक्टोबर मध्यें अकस्मात तुर्कस्तानांत राज्यक्रांति होऊन सर्वच परिस्थिति पार बदलली. तरूण तुर्कांनीं मिळविलेला विजय व त्यांनीं सुरू केलेली राज्यपद्धति या गोष्टीनीं जगाला चकित करून सोडिलें. पूर्वेकडील प्रश्न आतां सोयीनें सुटेल असा रंग दिसूं लागला. आक्टोबर ५ रोजीं फर्डिनांड राजानें आपण बल्गेरियाचा स्वतंत्र राजा झाल्याचें जाहीर केलें. नंतर दोन दिवसांनीं बोस्निया व हर्झेगोविना हे प्रांत आपल्या राज्यास जोडल्याचें फ्रॅन्सिस जेसिफ बादशहानें जाहीर केलें. ही गोष्ट आस्ट्रिया हंगेरीनें १८७१ मधील कराराच्या विरूद्ध केली. त्यामुळें इतर यूरोपीय राष्ट्रें तक्रार करूं लागली पण द्विराज साम्राज्याच्या बॅरन व्हान एड्रेंथल या जर्मन परराष्ट्रपधानानें मोठ्या हुषारीनें रशियाला व इतरांनां गप्प बसविलें. या वेळीं आस्ट्रियाहंगेरीला जर्मनीचें पूर्ण पाठबळ असल्यामुळें ग्रेटब्रिटन, फ्रान्स व रशिया दांत ओंठ खात युद्धाच्या तयारीस लागले असतांहि सर्व भानगड मोठ्या युक्तीनें मिटण्यांत येऊन तुर्कस्तानच्या सुलतानाला फक्त नुकसानभरपाई दिली गेली व बल्गेरियाचें स्वातंत्र्य कबूल करण्यांत आलें. याप्रमाणें तुर्कस्तानांतील यादवीचा फायदा जर्मनी व आस्ट्रिया यांनीं घेतला.