प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २६ वें.
यूरोपीय इतिहास व जागतिक इतिहास.

पूर्वयूरोपीय देशांचा प्रश्न.- फ्रान्स व ग्रेट ब्रिटन एक पक्षाचे होते. तरी स्पेन प्रकरणांत या दोघांची फूट होण्याचा प्रसंग एकदां आलेला होता. परंतु सुदैवानें तो टळला. पुढें (१८३०) फ्रान्सनें अलजीर्स जिंकून घेऊन आफ्रिकें फ्रेंच राज्याचा पाया घातला तरी ब्रिटनला त्याचें कांहीं वाटलें नाहीं. ही दोस्ती १८४० पर्यंत टिकली.

त्यावेळेस यूरोपच्या पूर्वेस असलेल्या देशासंबंधानें पुष्कळ भानगडीचे प्रश्न उपस्थित झाले. सुलतानी राष्ट्रें व सनदशीर राष्ट्रें यांच्यामध्यें तात्त्विक मतभेद उत्पन्न होऊन फूट पडली, व १८३९-४१ मधील इजिप्तच्या महंमदअल्ली पाशाच्या बंडामुळें उत्पन्न झालेल्या पूर्वेकडील संकटमय परिस्थितींत त्या राष्ट्रांच्या धोरणांत जो फरक पडला तोहि यामुळेंच. ग्रीक बंडाच्या काळीं टर्कीवर रशियानें स्वारी करूं नये म्हणून आस्ट्रियानें प्रयत्न केला पण तो फसला. १८२८ - १८२९ च्या रूसोतुर्की मोहिमानंतर आड्रियानोपलचा तह झाला व तुर्कस्तानचा सुलतान झारचा पूर्णपणें मांडलिक झाला. परंतु १८३२ मध्यें जेव्हां सुलतान महंमदानें निकोलास बादशाहाला इजिप्तच्या बंडखोरांपासून आपले संरक्षण करावें म्हणून विनंति केली तेव्हां झारला काळ्या समुद्रावर पूर्ण ताबा मिळाला. तेव्हां यूरोपतर्फें ग्रेटब्रिटन व फ्रान्स या दोन देशांनीं या गोष्टीचा निषेध केला. आस्ट्रिया व प्रशिया आपल्या फायद्याकरितां गप्प बसले. १८३३ मध्यें रशिया, आस्ट्रिया व प्रशिया या तिघांमध्यें तुर्क राष्ट्राच्या बचावार्थ तह झाला व एखाद्या मित्रराष्ट्राच्या विनंतीवरून या राष्ट्रसंघांखेरीज कोणालाहि त्याच्या अंतर्व्यवस्थेंत हात घालण्यास अधिकार नाहीं असें त्यांचें आपआपसांत ठरलें.

'पवित्र संघाची' ही पुनर्घटना संकुचित पायावर रचलेली होती. व तिचें चालकत्व बादशहा निकोलस याच्याकडे असल्याकारणानें तींत फेरफार करण्याचें सामर्थ्य कोणांतहि नव्हतें. हा बृहत्संग एकाएकीं मोडला नाहीं. त्यानें केलेले तह अमलांतहि होतेच. परंतु १८३० मध्यें फ्रान्समध्यें राज्यक्रांति झाली तेव्हां त्यांत ब्रिटिशांच्या धोरणामुळें फूट पडूं लागली. ग्रेटब्रिटनचा मुख्य प्रधान त्यावेळेला पामर्स्टन होता. त्याला या अंतराष्ट्रीय व्यवस्थेची चीड असून तो उघडपणें तसें बोलून दाखवी. ज्या राष्ट्रावर जुलूम होत असेल त्याचा आपण पक्ष घेऊं असें तो म्हणत असे. उलट जर इंग्लंड आणि फ्रान्स उघड बंड पुकारून यूरोपचें स्थैर्य उलथून पाडतील तर आपल्याला दैवी सत्तेचे संरक्षण करण्याचा हक्क असलाच पाहिजे असें झारनें प्रशियाच्या राजाला लिहिलें. ही तत्वांतील मोठी फूट स्पेनच्या द्वीपकल्पांत झालेल्या गडबडीच्या वेळीं या राष्ट्रांनीं जी दिशा पत्करली तीवरून उघड दृष्टोत्पत्तीस आली. स्पेनचा राजा सातवा फर्डीनंद मरण पावला (१८३३ सप्टेबर) वावारसासंबंधीं भांडणें सुरू झालीं व ती मोडून शांतता प्रस्थापित करण्यासाठीं ग्रेटब्रिटन, स्पेन, पोर्तुगाल व फ्रान्स यांचा दोस्तसंघ स्थापन झाला. (१८३४)
 
फ्रान्स व इंग्लंड यांची मैत्री फार दिवस टिकणारी नव्हती ही गोष्ट १८४० मध्यें फ्रान्सला वगळून ग्रेटब्रिटन आस्ट्रिया, प्रशिया आणि रशिया यांच्यामध्यें झालेल्या एकीच्या तहावरून दिसून येतें. पण पुन्हां १८४१ च्या जुलै महिन्यांत स्ट्रेटस कन्व्हेन्शनवर सर्वांच्या सह्या होऊन ही दुफळी थोडीफार बुजविण्यांत आली. या संघाच्या योगानें पुन्हां एकदां यूरोप एकमतानें वागूं लागल्यासारखें दिसूं लागलें.

पण जेव्हां १८४६ मध्यें फ्रॅकोचें स्वतंत्र प्रजासत्ताक राज्य क्रांतिकारक चळवळीचें केंद्र या सबबीवर रशियादि सुलतानी राष्ट्रांनीं मोडून टाकलें तेव्हां फ्रान्स ग्रेटब्रिटन यांनींच याचा इनकार केला व ज्यांनीं नियम करावे त्यांनींच ते मोडावे अशांतला हा प्रकार होतो असें त्यांच्या दृष्टोत्पततीस आणिलें. १८४६ पर्यंत इंग्लंड व फ्रान्स यांच्यामध्यें स्नेहसंवर्धनार्थ फार प्रयत्न झाला. राजांनी भेटी परतीभेटी दिल्या. पण पुन्हां व्हावयाचें तेंच झाल. लुई फिलिप बादशहा मोठा कारस्थानी असून स्पेनची गादी आपल्या वंशजाकडे रहावी याबद्दल त्याचा प्रयत्न चालू होता. ज्यांच्या आधारावर त्याची सत्ता टिकून होती त्या आपल्या लोकांशीं सलोख्यानें न वागतां क्रांतिकारक पक्षाचा पाठिंबा मिळविण्यास तो झटे. १८४७ मध्यें ग्रेटब्रिटनचें व आपल्या प्रजेचें न ऐकतां तो तीन सुलतानी शहांनां मिळाला. व जेव्हां १८४८ मध्यें पारीस येथें क्रांति सुरू झाली तेव्हां कांही हातपाय न झाडतां मध्यमर्गीय सत्ता लयास गेली.

१८४८ त आयर्लंडपासून डॅन्यूब नदीच्या किना-यापर्यंत एक मोठी राजकीय स्वरूपाची लाट उठली. यापूर्वीं स्वित्सर्लडांत उदारमतवाद्यांचा विजय, नेपल्स आणि पालेर्मोमध्यें विजयी राज्यक्रांत्या व पीडमाँटमध्यें नवीन शासनसंस्थेची घटना या गोष्टी घडून आल्या होत्या. सर्व देशांतून एकसमयावच्छेदेंकरून ज्या क्रांत्या या वेळीं घडून आल्या त्यांचीं कारणें निरनिराळ्या ठिकाणीं निरनिराळीं होती. फ्रान्समध्यें कामकरी वर्गाचा समाजसत्तावाद व मध्यम वर्गाचा विकासवाद यामध्यें झगडा होता व इंग्लंडमध्येंहि चार्टिस्ट लोकांची चळवळ कमीजास्तप्रमाणानें याच स्वरूपाची होती. उलट, जर्मनी, आस्ट्रियन साम्राज्य व इटली यामध्यें सनदगीर व राष्ट्रीय विचारांचें प्राबल्य होतें. या धामधुमींतून पूर्वींची राज्यव्यवस्था हळू हळू डोकें बाहेर काढूं लागली व पुराणमताचा विजय दिसूं लागला.

या १८४८ च्या मोठ्या उठावणीनंतर तीन वर्षांच्या आंत सर्व ठिकाणीं क्रांतीचीं भुतें पार गाडलीं गेलीं असें दिसलें. व्हिएन्नाच्या तहानुसार यूरोपांतील राज्यपद्धति पुनस्थापित झाल्यासारखी वाटली. पण वास्तविक हें पुनः प्रस्थापन केवळ वरवर होतें. वरील क्रांतिकारक वावटळीनें उडविलेली धूळ खाली बसते न बसते तोंच एक बोनापार्ट फ्रान्सच्या सिंहासनावर आरुढ झाला. सर्व यूरोपनें त्याच्या अधिकाराला मान्यता दिली. फ्रेच लोकांनांहि तो प्रिय होता; कारण त्यानें फ्रान्सची समाजसत्तेच्या संकटापासून मुक्तता केली. १८३० मध्यें मध्यम वर्ग अधिकारारूढ झाल्यापासून समाजसत्तावाद बळावत चालला होता. १८४८ मध्यें त्यानें राज्यक्रांति करून देखील तो स्वाधिकार प्रस्थापित करूं शकला नाहीं. तिसरा नेपोलियन पहिल्या नेपोलियनप्रमाणेंच चढत चढत बादशहा झाला. त्याचे विचार त्याच्या पूर्वजासारखेच होते. तेव्हां तो लवकरच यूरोपांतील शांतता मोडणारा होईल असें सर्व राष्ट्रांस वाटलें. -हाईन, आल्पस व पिरीनीज या फ्रान्सच्या ''नैसर्गिक'' मर्यादा व्हिएन्ना येथील तहामुळें संकुचित होत असल्यानें सहाजिकच फ्रान्स हा तह मानणार नाही असें दिसलें. राज्यक्रांतीच्या कालानंतर भौतिक सुधारणेचा काळ आला. यूरोपच्या पाठीवर आगगाड्यांचे जाळें पसरलें गेले. १८५१ त लंडनमध्यें पहिलें विश्वप्रदर्शन भरलें. तेव्हां यापुढें अंतराष्ट्रीय शांततेचा व सलोख्याचा काळ जाईल असें सर्वांनां वाटलें.