प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २६ वें.
यूरोपीय इतिहास व जागतिक इतिहास.
क्रिमियन युद्ध.- पण याच वेळेस पूर्वेस क्रिमियन युद्ध सुरू झालें. याला मूळ कारण ग्रीक व लॅटिन भिक्षूंमधील भांडण होय. पण रशिया व फ्रान्स ही राष्ट्रें या भांडणांत पडलीं व त्याला युद्धाचें स्वरूप आलें. ग्रेटब्रिटन जे या युद्धांत पडलें तें तुर्की साम्राज्याचें स्वहितार्थ रक्षण करण्याकरितां म्हणून. कारण रशिया जर भूमध्यसमुद्रापर्यंत आला असता तर हिंदुस्थानांतील ब्रिटिश साम्राज्याला धक्का पोंचला असता. पण क्रिमियाच्या युद्धानें त्याचा हेतु सफल झालेला दिसेना. कारण तुर्कस्थानची कुवत किती आहे हें पुढें दिसून आलेंच. पारीस येथें तह होऊन (१८५६) ही लढाई खलास झाली. या तहानें अंतराष्ट्रीय कायद्याचें महत्त्व वाढविलें. तुर्कस्तान हें समान दर्जाचें राष्ट्र म्हणून गणण्यांत येऊं लागलें व काळ्या समुद्रांत व्यापार करण्याला सर्व राष्ट्रांनां मोकळीक मिळाली. ही पॅरिसची काँग्रेस मागल्या सर्व काँग्रेसपेक्षां जास्त यशस्वी झाली. बृहत्संघा (ग्रँड अलायन्स) पासून हेग परिषदेपर्यंतच्या विचारविकासाच्या मार्गांतील हा एक टप्पा म्हणतां येईल.
क्रिमियन युद्धापासून नेपोलियन बादशहहाचा दर्जा वाढला. व पारिसलाहि मोठें महत्व प्राप्त झालें. १८५९ मध्यें फ्रान्स व इटली यांमध्यें सख्य घडून आलें व इटलीवरील आस्ट्रियाचा ताबा फ्रेंच्यांच्या मदतीनें झुगारून देण्यांत आला. फ्रान्सची ''नैसर्गिक सरहद्द'' परत मिळविण्याची नेपोलियनची महत्त्वाकांक्षा सफळ होण्याची ही वेळ होती. आल्पसची सरहद्द परत घेतल्यावर -हाईनविषयीं प्रश्न राहिला. या वेळी जर्मनींत फाटाफूट करून फ्रान्सला आपला कार्यभार साधतां येण्यासारखा होता. १८६२ त प्रशियानें फ्रान्सशीं व्यापारी तह केला.