प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २६ वें.
यूरोपीय इतिहास व जागतिक इतिहास.

काँगेस मार्फत शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न.- सरासरी २५ वर्षेंपर्यंत सारख्या लढाया चालू असल्यानें यूरोपला शांततेची अतिशय जरूरी होती. या वेळीं बहुतेक सर्व राष्ट्रें यूरोपांत शांतता कशी प्राप्त करून घेतां येईल या एकाच गोष्टीचा विचार करीत होतीं. शांततेचा विध्वंस एकटा फ्रान्स करतो असेंहि बहुमत झालें होतें. तेव्हां सर्वांनीं एक संघ निर्माण करून त्याचें नांव 'पवित्रसंघ' असें ठेविलें. तो तहाच्या स्वरूपाचा असून त्याजवर बादशाह पहिला अलेक्झांडर, बादशाहा फ्रान्सिस, प्रशियाचा राजा तिसरा फ्रेडरिक विलियम यांनीं सह्या केलेल्या होत्या (१८१५ सप्टेंबर २६) अशा त-हेची मध्यवर्ती शासनसंस्था स्थापण्यांत स्वतंत्र संस्थानांचें स्वातंत्र जातें म्हणून ग्रेट ब्रिटनचें या सबंधांतनें फारसें अनुकूल मत नव्हतें. कॅसलरीगनें एलाशापेलीच्या काँग्रेसमध्यें विरूद्ध बाजू घेतल्यानें ''पवित्र संघाला'' भूर्तस्वरूप प्राप्त झालें नाहीं.

सन १८१८ सालीं एलाशापेल येथें काँग्रस भरली. या सभेस येण्यास फ्रान्सला परवानगी दिली. व्हिएन्नाच्या सभेंत जी कामें करावयाचीं शिल्लक राहिलीं होतीं ती दुस-या वर्षीं फ्रांकफार्ट येथें भरणा-या मुत्सद्दयांच्या परिषदेंत निकालास निघावींत असें ठरलें. हीं कामें जर्मनींतील संस्थानांसंबंधीं होतीं.

या अवधींत इकडे यूरोपियन संघांतील शक्तिसमता ढळूं लागली. अलेक्झांडर बादशहा चुळबुळ करूं लागला. त्यामुळें तो नेपोलियनपेक्षांहि जास्त जगत्शांतताभंजक ठरेल असे ग्रेटब्रिटन वगैरेंना वाटूं लागलें. पण तो लवकरच देशांतील राज्यक्रांतिकारक चळवळीमुळें ताळ्यावर आला व ट्रोपौच्या काँग्रेसमध्यें त्यानें भाग घेतला. ट्रोपौची काँग्रेस १८२० मध्यें भरली होती. तींत रशिया, आस्ट्रिया व प्रशिया सामील होते. फ्रान्स व ग्रेट ब्रिटन आपल्या बाबतींत ट्रोपौच्या परिषदेचीं कलमें लागूं करतां यावयाचीं नाहींत म्हणून यावर सही करीनात. तेव्हांपासून दोस्तसंघांत फूट दिसूं लागली व ती पुढें वाढली व यूरोपचा राष्ट्रसंघ मोडला.