प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २६ वें.
यूरोपीय इतिहास व जागतिक इतिहास.

इटलीचें राजकारण.- फ्रँको- जर्मन युद्धापासून व विशेषतः बर्लिनची कांग्रेस झाल्यापासून इटालियन सरकार आपल्या परराष्ट्रीय धोरणाच्या बाबतींत अस्वस्थ व अनिश्चित बनले होतें. ऑस्ट्रियाच्या कक्षेंतून फ्रान्सनें त्याला सोडविलें खरें, पण तेव्हांपासून एकमेकांच्या मनांत एकमेकांविषयीं तेढ पडून राहिली. त्याला कारणेंहि पुष्कळ झालीं. म्हणून बाल्कन द्वीपकल्पाच्या बाबतींत मोठें यूरोपीय युद्ध होणार असें वाटलें तेव्हां इटली तटस्थ राहिला व आपणाकडे राष्ट्राराष्ट्रांतील न्याय निवडण्याचा अधिकार येईल अशी साहजीकच त्याला आशा वाटली. पण तसें कांहीं न होतां उलट बर्लिनच्या काँग्रेसमध्यें सर्व राष्ट्रांनां थोडाफार प्रसाद मिळाला तेव्हां इटली मात्र कोरडाच राहिला. आपलें अलिप्त राहण्याचें धोरण चुकीचें आहे असें तेव्हां त्याला कळून आलें व कोणाशी तरी निकट स्नेह करावा अशी इच्छा त्याच्या मनांत उद्भवली. पण सख्य कोणाशीं करावें हा विचार त्याला पडला. आणखी एका गोष्टीनें या विचाराला जोराचें चालन दिलें ती गोष्ट म्हणजे फ्रान्सनें ट्यूनिस आपल्या संरक्षणाखालीं ओढलें ही होय. वास्तविक ट्यूनिसवर ऐतिहासिक हक्काच्या व राष्ट्रीय हिताच्या दृष्टीनें इटलीचा ताबा असावायास पाहिजे होता. तेव्हां फ्रान्सच्या या अपकृत्यानें इटलीला परक्या राष्ट्रांच्या सख्याची जरूरी भासली व त्यामुळें १८८२ च्या मे महिन्यांत त्यानें वार्लेन व व्हिएन्ना सरकारशीं सख्याचा तह केला.