प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २६ वें.
यूरोपीय इतिहास व जागतिक इतिहास.

नेपोलियनचें वावटळ.- अमीन्सच्या तहाच्या पूर्वींच पिटनें प्रशिया व आस्ट्रिया यांच्यांत राष्ट्रीय भावना उत्पन्न करून नेपोलियनला अडथळा करण्याकरितां पुष्कळ चळवळ केली. परंतु त्याला त्याच्या हयातींत यश आलें नाही. उत्तरोत्तर नेपालियनचा विजय होत गेला व इंग्लंडलाहि तो शरण यावयाला लावील अशी स्थिति नेपोलियनला प्राप्त झाली नेपोलियननें दूरवर विचार करून इंग्लंडवर उघडपणें स्वारी करणें सुकर नाहीं असें ठरविलें व इंग्रज मालावर यूरोपांत बहिष्कार घालण्याचा प्रथम बर्लिन डिक्रीअन्वयें हुकूम सोडला. टिलसीट येथील तह झाल्यानंतर बाल्टिक समुद्रावरचें आधिपत्य संपादन करण्याचा व स्पेन आणि पोर्तुगाल यांनां ताब्यांत ठेऊन भूमध्यसमुद्रावरचें वर्चस्व मिळविण्याचा नेपोलियनचा विचार होता. त्याचप्रमाणें पूर्वेकडील खंड ग्रासून हिंदुस्थानांत वाढत चाललेली इंग्रज सत्ता समूळ नाहींशी करावयाची असा त्याचा बेत होता. इंग्रजांनां असें झाल्यास नाईल व ट्रॅफलगार या लढायांत मिळविलेल्या आरमारी विजयांचा कांहीं उपयोग न होऊन भूमध्यसमुद्रांत ब्रिटिश जहाजें फिरकणार नाहींत, हिंदुस्थानांतील ग्रेट ब्रिटनचा मुलूख संपुष्टांत येईल व उपासमार होऊन त्याला शरण यावें लागेल असे नेपोलियन मनांत मांडे खात होता. यूरोपच्या सुदैवानें ही नेपालियनची महत्त्वाकांक्षा सिद्धीत गेली नाहीं. त्याच्या वरील योजनेंत एका मागून एक सारखे अडथळे ग्रेट ब्रिटननें आणले. प्रथमतः १८०९ सालीं आस्ट्रियानें व नंतर १८१२ त रशियानें त्याचे बेत हाणून पाडिले. १८०७ सालीं कॅनिंगनें डॅनिश आरमार पकडून इंग्लंडला आणलें. हा नेपोलियनच्या महत्त्वाकांक्षी बेतांनां केलेला पहिला विरोध होय. १८०८ मध्यें बेलेनच्या लढाईंत ३०,००० फ्रेंच सैन्य शरण आलें. स्पेन, आस्ट्रिया व जर्मनी या देशांतील लोकांत राष्ट्रीय भावना जागृत होत जाऊन बळावत चालली होती पण हें त्याच्या लक्षांत आलें नाहीं. १८१० साली नेपोलियंनने आस्ट्रियाची मेरी लुई इजशीं लग्न लावलें व १८११ च्या मार्च २० ला त्याला एक मुलगा झाला. तेव्हां फ्रेंच साम्राज्य वंशपरंपरा आपल्या घराण्यांत रहावें असें त्याला वाटूं लागलें. या वेळीं नेपोलियनच्या राज्याचा विस्तार फार मोठा होता. शार्लमानचे राज्य देखील एवढें विस्तृत नव्हतें. पारिस येथें राजधानी असणारें नवें होली रोमन साम्राज्य स्थापण्याची कल्पना १८११ मध्यें मुळींच अशक्य कोटींतील ठरण्यासारखी नव्हती.

इटालींत व जर्मनींत नेपोलियननें फ्रेंच सत्ता प्रस्थापित केल्यामुळें राष्ट्रीय जागृति उत्पन्न झाली. प्रथम स्पेन देशांत तिचा प्रसार झाला. जर्मनींत तिचें अनुकरण होण्यास उशीर लागला नाहीं. स्पेनमधील विरोधक शक्तीला न जुमानतां व जर्मनींतील राष्ट्रीय चळवळीची प्रगति लक्षांत न घेतां रशियावर मोहीम करण्याचा जो त्यानें निश्चय केला ती त्याची अत्यंत मोठी चूक झाली. या स्वारींत त्याचें फार नुकसान न झालें. लागलीच रशिया, प्रशिया व आस्ट्रिया एक होऊन १८१३ मध्यें लिगझिग येथें नेपोलियनचा त्यांनीं पाडाव केला.

नेपोलियनचा पाडाव झाल तरी, राज्यक्रांतीच्या काळांत जुन्या राष्ट्रसंस्थांतून जे मोठे बदल करण्यांत आले होते ते पुन्हां पूर्वस्थितीला पोंचविण्याचें सामर्थ्य दोस्त राष्ट्रांमध्यें एकदम येणें शक्य नव्हतें. ज्याच्या हातीं यूरोपची घटना होती त्या चार महाराष्ट्रांचा उद्देश फ्रान्सला योग्य मर्यादेंत ठेवण्याचा व पुढील काळी पुन्हां कोणतेंहि एकटेंच राष्ट्र राष्ट्रांतील शक्तींचा समतोलपणा बिघडवूं शकणार नाही अशी काळजी घ्यावयाची, हा होता. या उद्देशाचा पहिला भाग, फ्रान्सच्या जुन्या राजघराण्याकडे राजसत्ता सोपवून पुन्हां राज्यक्रांति घडून येणार नाहीं. अशी यूरोपला त्यानें हमी देऊन सिद्ध होण्यासारखा होता. व दुसरा भाग राजसभा भरवून यूरोपची पुनर्घटना करण्यानें तडीस जाणार होता. व्हिएन्ना येथें ही राजसभा १८१४-१५ मध्यें भरली. बहुतेक सर्व देशांचे प्रतिनिधी प्रथमच या ठिकाणीं एकत्र मिळाले असून, नवीन युगाचा तो आरंभ असे यथार्थ म्हणतां येईल. येथपर्यंत सर्व ठीक झालें. परंतु हीं नवीन तत्त्वें कृतींत उतरेनात. पुष्कळ दिवसांपासून लोकांच्या मनांत राजाच्या संबंधानें ज्या कल्पना रूजलेल्या होत्या त्या एकाएकीं नाहींशा होण्यासारख्या नव्हत्या. राजा प्रजेवर राज्य करण्याकरितां व प्रजेचे हक्क संरक्षण करण्याकरितां परमेश्वराकडून पाठविला गेला आहे ही लौकिक जुनी समजूत कायम राहून राष्ट्राधिपतींमध्यें प्रजेच्या इच्छांनां न जुमानतां व फ्रेंच राज्यक्रांति झालीच नाहीं असें समजून जगाची वाटणी करण्यांत आली.

जेंटझच्या म्हणण्याप्रमाणें ''ही लुटीची विभागणी'' पुढील भांडणांनां साहजिकच कारणीभूत झाली. वासी येथील ग्रँड डवीसंबंधानें ज्या वेळेस वाद उत्पन्न झाला त्या वेळेस राजे लोकांत तीव्र मतभेद उत्पन्न होऊन अखेर मजल लढाईपर्यंत येऊन धडकली. आपलें वैयक्तिक हित यूरोपच्या हितापेक्षां गौण आहे याची या भांडत बसलेल्या राष्ट्रांनां जाणीव करून देण्यात नेपोलियनचें एल्बाहून पळून येणें अवश्यक होतें असे दिसलें. त्याच्या भीतीमुळें राष्ट्रें एक झाली व व्हिएन्नाच्या तहाच्या अटी नक्की करण्याच्या मार्गास लागलीं. नेपोलियनी सत्ता अखेरची धुळीस मिळविण्यारी जी वाटर्लूची लढाई झाली तिच्या आधीं थोडेच दिवस व्हिएन्नाच्या करारनाम्यावर सह्या करण्यांत आल्या होत्या.

व्हिएन्नाच्या राजसभेनें यूरोपमध्यें जी अंतर्व्यवस्था केली ती सरासरी अर्धे शतक पर्यंत चालली होती. मुख्यतः मध्ययूरोपांतच नेपोलियननें उलथापालथ करून सोडली असल्यामुळें त्या ठिकाणीं व्हिएन्ना काँग्रेसला बरेच मोठे फरक करावे लागले. पवित्र (होली) रोमन साम्राज्य पुन्हां स्थापण्याचा मुळींच प्रयत्न करण्यांत आला नाहीं. पण जर्मनी स्वतंत्र संस्थानांचा संघ बनवून त्या वेळीं हयात असलेल्या पूर्वींच्या सर्व साम्राज्यघटकांनां वांटून देण्यांत आला.

यूरोपच्या उत्तरेस व पूर्वेस बरेच महत्त्वाचे फेरफार झाले. ग्रेट ब्रिटनचा मात्र इतरांच्या मानानें फार थोडा फायदा झाला. परंतु तो कमी महत्त्वाचा नव्हता. ग्रेट ब्रिटनला माल्टा बेट मिळाल्याकारणानें भूमध्य समुद्रावर आपली सत्ता बसवितां आली व पुढें पारिसच्या तहानें (१८१५ नोव्हेंबर ५) ती वाढली.

नेपोलियनाचें पुनरागमन झालें नसतें तर फ्रान्सला या तहांतून उजळ माथ्यानें व राज्यक्रांतीच्या युद्धांत मिळविलेल्या कांहीं मुलुखासह बाहेर पडतां आलें असतें. नेपोलियनांचा दुस-यांदा पाडाव झाल्यानंतर फ्रान्सचे तुकडे तुकडे होण्याच्या बेतांत आले होते. पण १८ वा लुई जो आपल्या पूर्वजांकडून परंपरागत आलेल्या प्रदेशांचा राजा म्हणून कायम झाला त्याचे श्रेय रशियाचा पहिला अलेक्झांडर बादशहा व कॅसलरीग आणि वेलिंग्टन या इंग्लंडच्या मुत्सद्यांनां आहे त्यांनां राष्ट्राराष्ट्रास समतोलपणा राखावयाचा होता.