प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २६ वें.
यूरोपीय इतिहास व जागतिक इतिहास.

१८ व्या व १९ व्या शतकांतील यूरोपच्या इतिहासाचा अखिल जगाच्या इतिहासाशीं संबंध आहे. १८ व्या शतकांतील भौगोलिक शोधांनीं उपलब्ध झालेल्या भूभागांवर राजकीय सत्ता प्रसथापित करण्याकरितां प्रथम स्पेन, पोर्तुगाल, हॉलंड, फ्रान्स व इंग्लंड हे देश पुढें आले. पण त्यांच्यापैकीं पहिले तीन मागें पडून अखेर लढा फ्रान्स व इंग्लंड या दोन देशांत उरला. हा लढा जवळजवळ पाऊण शतक म्हणजे १७४० ते १८१५ पर्यंत चालला. यूरोपांतील सप्तवार्षिक युद्ध (१७५६-१७६३) हा या लढ्याचा पूर्वार्ध होय. आणि नेपोलियनबरोबरचीं युद्धें हा त्याचा उत्तरार्ध होय. ह्या दोहोंतहि इंग्लंड विजयी होऊन ब्रिटिश साम्राज्य सर्व जगभर पसरले. सप्तवार्षिक युद्धानें इंग्लंडच्या अमेरिकेंतील व हिंदुस्थानांतील साम्राज्याचा पाया घातला. युनैटेड स्टेटसच्या स्वातंत्र्ययुद्धानें इंग्लंडच्या मुत्सद्दीगिरीला साम्राज्यसंरक्षक नीतीचा उत्तम धडा शिकविला आणि नेपोलियनबरोबरच्या यु्द्धांनीं ब्रिटिश आरमाराची समुद्रावर सत्ता प्रस्थापित केली. साम्राज्यसंपादक आरमार व साम्राज्यसंरक्षक मुत्सद्दीगिरी या दोहोंच्या बलावर इंग्लंडनें १९ व्या शतकांत कानडा, दक्षिण आफ्रिका, हिंदुस्थान व आस्ट्रेलिया आणि इजिप्त या दूरदूरच्या देशांवर साम्राज्य स्थापलें. अशा रीतीनें इंग्लंडनें राजकीय सत्ता जगभर प्रस्थापित केली.

यूरोपीय राष्ट्रांचा अखिल जगाशीं प्रत्यक्ष संबंध येण्याची दुसरी बाब म्हणजे यूरोपीयांचा ख्रिस्तधर्मप्रसार व व्यापार. ख्रिस्तधर्मी लोक जगाच्या बहुतेक भागांत असून जगाच्या लोकसंख्येंत ख्रिस्त्यांची संख्या इतर कोणत्याहि धर्माच्या अनुयायांहून अधिक आहे. यूरोपीय व्यापाराची व्यप्ति तर शासनसत्ता व धर्मसत्ता याहूनहि अधिक आहे. फार काय पण यूरोपीयांचा काल जेथें जात नाहीं असा जगाचा एकहि भूभाग नसेल.

शिवाय यूरोपीयांचें हे अतिक्रमण केवळ एकपक्षीय आहे असें नाहीं. म्हणजे यूरोपीयेतर लोक यूरोपीयांशीं संबंध ठेवण्याच्या अगदीं विरूद्ध आहेत असें म्हणतां येत नाहीं. शासनशास्त्र, शास्त्रीय शोध व औद्योगिक प्रगति या तिन्ही बाबतींत यूरोपखंड फार पुढें गेलेलें असल्यामुळें इतर खंडांतील स्वतंत्र देशांनांहि यूरोपशीं आपण होऊन संबंध ठेवणें भाग पडतें. जपानचेंच उदाहरण घ्या, जपानदेश स्वतंत्र असूनहि स्वतःची सुधारणा करून घेण्याकरितां जपानला इंग्लिश, जर्मन, फ्रेंच, इटालियनं, अमेरिकन, वगैरे तज्ज्ञ लोक स्वदेशांत बोलावून त्यांच्या मदतीनें आपली प्रगति करून घ्यावी लागली. दळणवळणाचीं आधुनिक साधनें म्हणजे रेल्वे, तारायंत्रे, आगबोटी, व विमानें, यांनी सर्व खंडांनां एकत्र जोडल्याप्रमाणें झालें आहे. ज्ञानविषयक क्षेत्रांत तरी सर्व जग म्हणजे एकच खंड किंवा देश अशी भावना उत्पन्न झाली असून प्रत्येक देशाच्या ज्ञानविषयक संपत्तींत इतर प्रत्येक देशाला अंशभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अखिल जग म्हणजे एकच खंड असल्याचा प्रत्यय गेल्या महायुद्धानें प्रत्यक्ष आणून दिला. त्या युद्धाला पहिलें जागतिक युद्ध असें सार्थ म्हणतां येईल. त्या युद्धाचा वणवा सर्व खंडांत पसरला होता व त्याचे पश्चातपरिणाम सर्व जगाला भोंवले. सारांश प्रत्येक देशाला स्वतःला इतिहासबरोबरच अखिल जगाचाहि इतिहास अभ्यासिल्यावांचून यापुढें गत्यंतर नाहीं. असो; आतां प्रस्तुत प्रकरणांत यूरोपनें आपला प्रसार सर्व जगभर कसा पसरविला तें पाहूं.

विसाव्या प्रकरणांत यूरोपच्या इतिहासाचें कथासूत्र यूट्रेचच्या तहापर्यंत आलें आहे. 'यूट्रेच' च्या तहांत जरी कांहीं व्यंगें असलीं तरी एकंदरींत सर्व विल्हेवाट त्यामुळें उत्कृष्ट रीतीनें लागली. सन १७४० पर्यंत जरी लहान सहान लढाया होत होत्या तरी यूरोपमध्यें एकंदरीत शांताता नांदत होती. मुख्यत्वेंकरून अकराव्या शतकांत राजकीय बलाचा समतोलपणा नजरेस येत होता. सन १७१३ पासून १७४० पर्यंत बलिष्ठ राष्ट्रें आपापले संघ बनवून आपापलीं कार्यें घडवून आणीत होतीं. वसाहतींवर ग्रेटब्रिटनची सत्ता जास्त वाढूं देऊं नये म्हणून स्पेन व फ्रान्स यांचा सारखा प्रयत्न चालला होता आणि आस्ट्रियाचे सत्तेखालील इटालीमधलीं कांहीं ठाणीं आपल्याकडे असावीं म्हणून स्पेनची उत्कट इच्छा होती.