प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २६ वें.
यूरोपीय इतिहास व जागतिक इतिहास.

रशियन राजकारण - बिस्मार्कला फ्रँको'- रशियन सख्याची भीति वाटत असल्या कारणानें त्याने रशियाकडे पुन्हां मैत्रीचा तह करण्याविषयीं बोलणें लाविले. रशियालाहि निहिलिस्ट चळवळ्यांची धास्ती वाटत होती. जेव्हां त्यानें या तहाला कबूली दिली तेव्हां १८८४ सालीं आस्ट्रिया, जर्मनी व रशिया या तीघां सम्राटामध्यें तह घडून आला. या तहामुळें आस्ट्रिया- जर्मनीच्या इटलीबरोबर झालेल्या तहाला बाध येणारा नव्हता. हे तह घडवून आणण्यांत बिस्मार्कचा हेतु फ्रान्सला अगदीं विभक्त ठेवावयाचा व रशियाला आस्ट्रोजर्मनांच्या दाव्याला बांधून टाकण्याचा होता. शिवाय बाल्कन द्वीपकल्पाच्या भांडणांत आस्ट्रिया व रशिया यांचा न्याय निवडण्याची संधि त्याला मिळणार होती. हें त्रिसम्राटसंघाचें नवें रूप फार दिवस टिकणारें नव्हतें. शांततेच्या काळांत फक्त त्याचा अम्मल चालण्यासारखा होता. जेव्हां बल्गेरियाचा राजा रशियाविरूद्ध चडफड करूं लागला. व रशियाची ताबेदारी झुगारून देण्याचा प्रयत्न करूं लागला तेव्हां पुन्हां दुसरें बाल्कन युद्ध होतें की काय अशी भीति यूरोपभर पसरली व प्रसंगहि तसाच आला होता पण आस्ट्रियन सरकारच्या मध्यस्थीनें पुन्हां सर्वत्र समेट घडून आला. तथापि रशिया व बल्गेरिया यांच्यात वितुष्ट राहिलेंच.

बाल्कन द्वीपकल्पांत घडत असलेल्या या गोष्टीमुळें त्रिसम्राटसंघाला धक्का न बसणें अशक्य होतें. रशियाला जर्मनी आंतून आस्ट्रियाला आपल्याविरूद्ध फूस देतो असा बळकट संशय पूर्वीपासून होताच; तो पुढें दृढ झाला. रशियन व जर्मन वर्तमानपत्रांनीं तर उघड उघड याविषयीं खल चालविला. रशिया जर्मनीच्या मुत्सद्देगिरीच्या बंधनांतून सुटण्याची इच्छा करूं लागला. उलट बिस्मार्क हें बंधन जास्त घट्ट करूं पहात होता. पण १८९० सालीं त्रिसम्राटसंघाची मुदत जेव्हां संपली तेव्हां रशियानें पुन्हां अशा संघात हात गुंतवून घेण्याचें साफ नाकारलें.

फ्रान्स आणि रशिया यांच्यामध्यें एकमेकांला युद्धप्रसंगीं मदत करण्याचा कोठल्याहि प्रकारचा करारमदार नव्हता तरी हीं दोन राष्ट्रें मोठ्या युद्धाचा प्रसंग उद्भवल्यास एका बाजूनी होतील अशी सर्वांना खात्री होती. प्रथम बिचकत बिचकत पण पुढें धीटाईनें एकमेक परस्परसंबंध आणूं लागले. रशिया परस्परसंरक्षणार्थ सख्याचा करार करून टाकण्याला नाखूष दिसला; कारण त्याला फ्रान्स सरकाराच्या टिकाऊपणाविषयीं शंका होती. शिवाय असा करार केल्यास लगेच फ्रान्स जर्मनीवर चालून जाईल असें त्याला वाटलें. पण पुढे असा करार झाला असावा असें दिसतें. तो गुप्तपणें झाला असल्यानें त्याविषयीं नक्की माहिती नाहीं. १८९५ मध्यें फ्रान्सच्या अध्यक्षानें प्रथम उघडपणें या फ्रँकोरशियन सख्याचा उल्लेख केला, या तहाच्या भागींत रशियाचा वरचढपणा असल्यानें त्यानें फ्रान्सला फारसें उच्छृंखल होऊं दिलें नसावें.