प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २६ वें.
यूरोपीय इतिहास व जागतिक इतिहास.

फ्रान्समधील भयंकर राज्यक्रांति.- इकडे सर्व यूरोपांत लढाया चालू असतां, व त्रिराष्ट्रसंधि करून यूरोपला शांतता देण्याचा विचार होत असतां, तिकडे फ्रान्समध्यें १७८९ सालीं भयंकर राज्यक्रांति घडून आली. अमेरिकन वसाहतीनां फ्रान्सनें मदत केल्यामुळें बादशाही खजिना रिकामा पडला. व सोळाव्या लुईला ''स्टेट्सजनरल'' नांवाचे प्रातिनिधिक मंडळ बोलावणें भाग पडल. त्याच सालीं नेदर्लंडमध्यें दुस-या जोसेफनें केलेल्या सुधारणांविरुद्ध बंडाळी सुरू झाली व पोलंडमध्येंहि उमरावी सत्ता उलथून पाडण्यासंबंधीं अशीच खटपट चालली होती. प्रथमतः फ्रान्समधील राज्यक्रांति सौम्य स्वरूपाची होती. परंतु १७९१ मध्यें शासनमंडळ मोडल्यानंतर ही सौम्यता सपशेल पालटली. या वेळीं जिरांडी पक्ष फार बलिष्ठ होता. त्यानें एकदम राजसत्तेला शह देण्याचा धाक घातला. व यामुळें फ्रान्सला लढाईचा प्रसंग आला. लफायेत पक्ष राजाची सत्ता वाढविण्याकरितां लढाईंत अंग घेत होता. सन १७९२त फ्रान्सनें आस्ट्रियाशीं युद्ध जाहीर केलें. फ्रेंच लोकांनां दोन लढायांत पूर्णपणें यश आल्यामुळें --हाइन नदीपर्यंत त्यांनीं मजल गांठली. व बेलजम काबीज करून हॉलंडवर रोंख धरला. हालंड ग्रेटब्रिटनच्या बाजूचें असल्यामुळें फ्रान्सचें ग्रेटब्रिटनशीं युद्ध सुरू झाले (१७९३). या युद्धांत स्पेन, सार्डीनिया आणि टस्कनी पडल्यामुळें एकट्या फ्रान्सला सर्व यूरोपशीं लढण्याचा प्रसंग आला. दोस्त राष्ट्रांत असावा तितका एकोपा नव्हता. उलट फ्रेंच लोकांचा देशाभिमान व दृढनिश्चय अवर्णनीय असल्यामुळें त्यांनी दोस्तांची धूळधाण उडविली. सन १७९५ त दोस्त संघ मोडला व फक्त ग्रेट ब्रिटन आस्ट्रिया व सार्डीनिया यांनीं फ्रान्सशीं युद्ध चालू ठेविलें. इटालीवर नेपोलियन बोनापार्टनें हल्ले करून पूर्णपणें यश सपादिलें. तेव्हां आस्ट्रियानें कँपो फारमिओ येथें व सार्डीनियानें चिरास्को येथें तह करून फ्रेंचापासून आपली ब्रिटन मात्र उरलें. १७९९ त नेपोलियन इजिप्तमध्यें स्वारींत गुंतला आहे ही संधि साधून ग्रेटब्रिटन, रशिया व आस्ट्रिया यांनीं दुस-यांदा एकजूट केली. जरी फ्रेंचांनां इटालींतून हाकून लावण्यांत आलें तरी रशियनांची स्वित्सर्लंडमध्यें व इंग्लिशांची हॉलंडमध्यें पिच्छेहाट होण्याची राहिली नाहीं. इजिप्तमधून नेपोलियन बोनापार्ट परत आल्यावर फ्रेंच कॉन्सलेट स्थापण्यांत आलें व आस्ट्रियनांचा पाडाव झाल्यानंतर त्यांच्याशीं व इंग्रजांशीं तह करण्यांत आला. (१८०३). येथपर्यंत फ्रान्सच्या राज्यक्रांतीपासून यूरोपचा फायदा झाला व १८ व्या शतकांतील राज्यकारभाराच्या जुन्या कल्पना मुळांतच हादरल्या असें म्हणतां येईल. कँपो फॉरमिओ येथील तह झाल्यानंतर लवकरच जर्मनींत राज्यक्रांति झाली व रोमन साम्राज्य आतां शेवटचें लयाला गेलें. अशा रीतीनें सर्व यूरोपभर मोठी क्रांति घडून आली; पण अद्याप मध्य यूरोपांतील लोकांत एकराष्ट्रीयत्वाची भावना उद्भूत झाली नव्हती.